Posts

तंत्रमार्ग व पूर्णयोग - साम्यभेद

 

आम्ही जी समन्वयपद्धती स्वीकारली आहे, त्यामध्ये तंत्रपद्धतीहून वेगळे तत्त्व आहे; योगाच्या शक्यतांचा विचार वेगळ्या तऱ्हेने करून, हे वेगळे तत्त्व आम्ही उपयोगात आणले आहे. तंत्राचे समन्वयाचे साध्य गाठावयास आम्ही वेदांताच्या पद्धतीपासून प्रारंभ केला आहे. तंत्रपद्धतीत शक्ति ही सर्वाधिक महत्त्वाची मानतात, आत्मा गाठावयास शक्तीचा गुरुकिल्लीसारखा उपयोग करतात; आमच्या समन्वयांत आत्मा हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे; शक्ति उन्नत करावयाचे रहस्य आत्म्याच्या ठिकाणी आम्हाला सापडते.

तंत्रपद्धती तळातून आपल्या कार्याला सुरुवात करते; शिखराकडे ती चढत जाते, व या चढण्यासाठी पायऱ्यांची शिडी करते; ही पद्धती आरंभाला शक्ति (कुंडलिनी) जागृत करण्यावर भर देते, जागृत शक्तीने शरीराच्या नाडीचक्रांतून क्रमश: वर चढावे, ही सहा चक्रे उघडावी यावर जोर देते; ही चक्रे उघडणे म्हणजे आत्म्याच्या शक्तीचे प्रांत क्रमश: खुले करणे असते.

पूर्ण योगामध्ये इतर योगांच्या सामान्य साध्यांत भर घातली जाते. सर्व योगांचे सामायिक साध्य आत्म्याची मुक्ति हे आहे; मानवी आत्मा जो स्वाभाविक अज्ञानात आणि मर्यादित क्षेत्रात पडला आहे, त्याची त्यातून मुक्ति व्हावी, त्याला आध्यात्मिक अस्तित्व लाभावे, त्याची त्याच्या उच्चतम आत्म्याशी अर्थात ईश्वराशी एकता व्हावी, हे सर्व योगांचे सामायिक साध्य आहे; पण त्या योगांमध्ये हे साध्य आरंभीची एक पायरी म्हणून नव्हे तर, ते एकमेव अंतिम साध्य आहे असे मानतात; त्या योगांत आध्यात्मिक अस्तित्वाचा भोग नसतोच असे नाही – तो असतो; पण त्याचे स्वरूप, मानवी व वैयक्तिक अस्तित्वाचे शांत आत्मिक अस्तित्वात विलीन होणे, हे असते किंवा दुसऱ्या उच्च लोकांत आध्यात्मिक भोग भोगणे, हे असते.

तंत्रपद्धती मुक्ति हे आपले अंतिम साध्य मानते; परंतु हे एकच साध्य तिला नसते – तिच्या मार्गात दुसरे एक साध्य तिला असते; आध्यात्मिक शक्ति, प्रकाश, आनंद हा मानवी अस्तित्वांत पूर्णत्वाने यावा व पूर्णत्वाने भोगला जावा हे तिचे मार्गातील साध्य असते; या पद्धतीत परमश्रेष्ठ अनुभूतीचे ओझरते दर्शनहि सापडते : मुक्ति आणि विश्वगत कर्म व आनंद यांचा संयोग या परमश्रेष्ठ अनुभूतीत प्रतीत होतो; या संयोगाला विरोधी आणि या संयोगाशी विसंवादी असणाऱ्या सर्व गोष्टींवर अंतिम विजय साधक मिळवू शकतो, या गोष्टीचे तंत्रपद्धतीला ओझरते दर्शन झाले आहे.

आमच्या आध्यात्मिक शक्यतांसंबंधी ही विशाल दृष्टि घेऊन, आम्ही आमच्या योगाला आरंभ करतो; या दृष्टीत आणखी एका गोष्टीची आम्ही भर घालतो; ही भर घालण्याने, आमच्या योगाला अधिक पूर्ण सार्थकता आणली जाते. ही भर अशी की, आम्ही मानवाचा आत्मा केवळ व्यक्तिभूत, केवळ सर्वातीताशी एकता साधण्यासाठी योग-प्रवास करणारा केवळ व्यक्तिभूत आत्मा आहे, असे मानीत नसून तो विश्वात्मा देखील आहे, सर्व जीवात्म्यांतील ईश्वराशी व सर्व प्रकृतीशी एकता साधण्याचे सामर्थ्य असलेला विश्वव्यापी आत्मा देखील आहे, असे मानतो आणि या विस्तृत दृष्टीला अनुरूप व्यवहाराचा पूर्ण पाठिंबा देतो.

मानवी आत्म्याची वैयक्तिक मुक्ति, आध्यात्मिक अस्तित्व, जाणीव (चेतना), आनंद या बाबतीत ईश्वराशी या आत्म्याची वैयक्तिक एकता (एकरूपता) हे ह्या पूर्ण-योगाचे पहिले साध्य नेहमीच असावे लागते.

योगाचे दुसरे साध्य मुक्त आत्म्याने मुक्तपणे ईश्वराच्या विश्वात्मक एकतेचा भोग घेणे हे असते;

पण या दुसऱ्या साध्यांतून तिसरे एक साध्य निघते ते हे की, ईश्वराच्या द्वारा सर्व जीवांशी जी एकता, त्या एकतेला व्यावहारिक रूप देणे; अर्थात ईश्वराचे मानवतेच्या संबंधांत जे आध्यात्मिक साध्य आहे, त्या साध्याच्या संबंधात सह-अनुभूतिपूर्वक ईश्वराचे सहकारी होणे.

वैयक्तिक योग येथपर्यंत आला म्हणजे, त्याची वैयक्तिकता, विभक्तता निघून जाते, आणि तो सामूहिक योगाचा एक भाग होतो; या सामूहिक योगाचे साध्य मानवजातीचे दिव्य प्रकृतीमध्ये उत्थापन करणे हे असते.

मुक्त वैयक्तिक आत्मा ईश्वराशी आत्मत: व प्रकृतितः एकरूप झाला म्हणजे त्याचे प्राकृतिक अस्तित्व मानवजातीच्या आत्मपूर्णत्वाचे साधन बनते – या साधनाच्या बळावर मानवजातीत ईश्वराची दिव्यता पूर्णपणे बहरू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 612-614)