साधना, योग आणि रूपांतरण – २३७
तुम्ही जर मानवी प्रकृतीचे रूपांतरण (transformation) गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरबूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला श्रीमाताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (plasticity) आणि नि:शेष समर्पण या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.
श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, श्रीमाताजी तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी चैतन्यमय संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.
तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे, म्हणजे –
१) स्वयंपर्याप्त (self-sufficient) अज्ञानी मन जसे प्रश्नह विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.
२) ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक दिव्य प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देणारी असता कामा नये.
३) माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करत राहते आणि ती जशी शरीराच्या अंधकारमय गोष्टींमधील किरकोळ सुखाला चिकटून राहते तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी असता कामा नये. तसेच शरीराच्या कंटाळवाण्या दिनचर्येला, आळसाला किंवा त्याच्या जड निद्रेला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाच्या विरोधात शारीरिक चेतना जशी आकांडतांडव करते; तशी तुमची प्रकृती ही स्वत:च्या अक्षमतेला, जडतेला आणि तामसिकतेला हटवादीपणे चिकटून राहणारी असता कामा नये.
नि:शेष समर्पण आणि तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण हे तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभता घडवून आणेल. वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता या साऱ्या गोष्टींप्रत तुम्ही सातत्याने खुले राहिलात तर, तुमच्यामधील सर्व घटकांमध्ये चेतना जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही त्यानंतर अर्धचेतन चेतनेशी एकत्व न पावता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परमप्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 24-25)