Posts

तंत्रमार्गातील समन्वय

तंत्रशास्त्र जी साधना उपयोगात आणते ती स्वरूपतः समन्वयात्मक साधना आहे. हे एक महान विश्वव्यापी सत्य आहे की, अस्तित्वाला दोन ध्रुवटोके आहेत आणि या ध्रुवटोकांची मौलिक एकता, हे अस्तित्वाचे रहस्य आहे.

ब्रह्म आणि शक्ति, आत्मा आणि प्रकृति ही ती दोन ध्रुवटोके होत; प्रकृति ही आत्म्याची शक्ति आहे, किंवा असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल की, आत्मा शक्तिदृष्टीने प्रकृति हे नाव धारण करतो, प्रकृति या नावाने ओळखला जातो; हे महान सत्य तंत्रशास्त्राने उपयोगात आणले आहे.

तांत्रिक पद्धतीत मानवाच्या प्रकृतीला उन्नत करून, तिला आत्म्याच्या व्यक्त शक्तीचे रूप देणे हे साध्य असते; तंत्र हे मानवाची संपूर्ण प्रकृति हातात घेऊन तिचे आध्यात्मिक रूपान्तरण करू पाहते.

तंत्राच्या साधन-संभारात हठयोगाची जोरदार प्रक्रिया आहे; नाडीचक्रे उघडणे, कुंडलिनी शक्ति जागृत करून ब्रह्माच्या दिशेने या चक्रांतून तिची यात्रा घडवणे ही हठयोगाची प्रक्रिया विशेषेकरून आहे; त्यात राजयोगाची सूक्ष्म शुद्धीकरण, ध्यान, एकाग्रता ही प्रक्रिया आहे; तसेच इच्छाशक्तीचा आधार, भक्तीची प्रेरकशक्ति, ज्ञानसाधनेची गुरुकिल्ली यांचा आपल्या कार्याला गति देण्यासाठी तंत्रशास्त्र उपयोग करते. याप्रमाणे तंत्र-साधना हठादि सर्व योगांच्या भिन्न भिन्न शक्ति आपल्या कार्यासाठी एकत्र करते, परिणामकारक रीतीने एकत्र करते;

परंतु येथेच ती थांबत नाहीं; आणखी दोन दिशांनी तंत्र आपली समन्वयी प्रवृत्ति प्रकट करते; ते सामान्य योगपद्धतीत दोन गोष्टींची भर घालते; मानवी व्यवहाराच्या प्रेरक हेतूंना, मानवी गुणांना व वासनांना तंत्र हातांत घेते व त्यांना कठोर शिस्त लावून, आत्म्याच्या शासनाखाली त्यांनी वागावे अशी व्यवस्था ते प्रथम करते व नंतर ते दिव्य आध्यात्मिक पातळीवर त्यांना घेऊन जाते, त्यांना दिव्य, आध्यात्मिक रूप देते, ही एक गोष्ट.

दुसरी गोष्ट ही की, आपल्या योगसाध्यांत केवळ मुक्तीचा अंतर्भाव न करता भुक्तीचाहि अंतर्भाव ते करते; तंत्रेतर योगपद्धती मुक्ति हे आपले एकमेव साध्य मानतात; भुक्ति म्हणजे आत्मशक्तीने जगाचा उपभोग घेणे हे तंत्रेतर योगांना साध्य म्हणून मान्य नाही. त्यांना साध्याकडे जाताजाता मार्गात उपभोग घेणे, अंशत: प्रसंगाने उपभोग घेणे मान्य आहे. एकंदरीने तंत्राची योग-पद्धति इतर पद्धतींहून व्यापक आहे, धैर्यशाली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 611-612)