कोणताहि योग जी शक्ति साधन म्हणून वापरतो, त्या शक्तीचे विशिष्ट स्वरूप त्या योगाच्या प्रक्रियेला येते – जसे की, हठयोगाची प्रक्रिया मानसिक – शारीरिक असते; राजयोगाची प्रक्रिया मानसिक आंतरात्मिक असते; ज्ञानमार्ग हा आध्यात्मिक व ज्ञानसाधक असतो; भक्तिमार्ग हा आध्यात्मिक, भावनिक व सौंदर्यशोधक असतो; कर्ममार्ग हा आध्यात्मिक आणि क्रियाशील असतो. प्रत्येक मार्ग त्याच्या त्याच्या विशिष्ट साधनशक्तीने दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करतो.
सर्व शक्ति अखेर एकाच शक्तीची रूपे असतात; ही एकच शक्ति म्हणजे आत्मशक्ति होय. प्राणाच्या, शरीराच्या, मनाच्या सामान्य प्रक्रियेत हे सत्य अगदी झाकले जात असते – प्रकृति आमच्या सामान्य कार्यात विभागणी, विस्कळीतपणा, वाटावाटी या पद्धतीचा अवलंब करीत असल्याने, आत्मशक्ति ही एकच खरी शक्ति आहे हे सत्य झाकले जाते ; तथापि, येथेहि शेवटी हे सत्य उघडकीस येतेच; कारण, भौतिक शक्तीच्या पोटी प्राणिक, मानसिक, आंतरात्मिक, आध्यात्मिक शक्ति गुप्त असते आणि एका शक्तीची (आत्मशक्तीची) ही रूपे भौतिक शक्ति शेवटी प्रकट करतेच करते.
प्राणिक शक्ति याचप्रमाणे तिच्या ठिकाणी गुप्त असलेली आत्मशक्तीची अनेक रूपे शेवटी प्रकट करून कामास लावते; मानसिक शक्ति ही प्राण व शरीर आणि त्यांच्या शक्ति व क्रिया यांजवर आधारलेली असते आणि तिच्या पोटी अविकसित किंवा अर्धविकसित अवस्थेत आंतरात्मिक व आध्यात्मिक शक्ति असते.
पण योगाने या शक्तींपैकी कोणतीहि शक्ति घेऊन, तिचे विस्कळीत वाटावाटीचे कार्य थांबवून तिला तिचे श्रेष्ठ रूप दिले, एकाग्र केले म्हणजे ती आत्मशक्तीचे रूप घेते आणि याप्रमाणे सर्व शक्ति मूलत: एकच शक्ति आहेत ही गोष्ट उघड होते.
मुळात एकच शक्ति (आत्मशक्ति) असते, म्हणून हठयोगाच्या प्रक्रियेने देखील शुद्ध आंतरात्मिक व आध्यात्मिक परिणाम घडून येतात; राजयोगाची प्रक्रिया आंतरात्मिक साधनाच्या द्वारा आध्यात्मिक परिणाम घडवते; त्रिमार्ग (ज्ञान, कर्म, भक्ति) साधनेच्या व साध्याच्या दृष्टीने केवळ मानसिक व आध्यात्मिकच आहे, असे भासले तरी, इतर मार्गाचे विशिष्ट परिणाम या मार्गाच्या वाटचालीतही अनुभवास येऊ शकतात; हे परिणाम आपोआप अनुभवास येऊ लागतात, हे परिणाम अगदी स्पष्टपणे प्रकट होतात किंवा त्याची शक्यता प्रकट होते.
आत्मशक्ति हीच सर्व शक्ति आहे या कारणामुळे ती जेव्हा एका दिशेने आपले अत्युच्च शिखर गाठते तेव्हा तिच्या इतरहि शक्यता, एक शक्ति म्हणून किंवा त्या शक्तीची संभाव्यता म्हणून दिसू लागतात. सर्व शक्तींची ही एकता, समन्वयात्मक योग शक्य कोटीतील आहे हेच सुचवते.
-श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 610-611)