साधना, योग आणि रूपांतरण – ०४
सन्मार्गाचे अनुसरण करण्याची ज्यांना इच्छा असते त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुरिच्छांचे हल्ले होण्याची शक्यता असते; (कारण) त्यांना ते समजत नाही आणि एवढेच नाही तर, त्यांना जे समजत नाही त्याचा ते बहुधा तिरस्कारच करतात.
लोक तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. आणि अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही, तर उलट दिव्य ‘चेतने’ने व दिव्य ‘कृपे’ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती खंबीर आहात, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य ‘चेतने’कडून व दिव्य ‘कृपे’कडून वापर केला जात आहे, हे त्यामागचे कारण असते.
म्हणून कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे; आणि तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये. उलट तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य ‘कृपे’चे कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी व्हायला पाहिजे आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घालण्यात आला होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 03 : 282)