मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, ”काय हे? मी आता चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे घडते ते तुम्हालाच शिकविण्यासाठी की, व्यक्तीने काहीतरी हेतू बाळगून चांगले असता कामा नये, म्हणजे इतर लोक तुमच्याशी चांगले वागावेत म्हणून तुम्ही चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगले असण्यासाठीच चांगले असावयास हवे.
नेहमीसाठी तोच धडा आहे : जितकं काही चांगले, जितके उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. अगदी ह्या दृष्टिकोनामुळेच, म्हणजे चांगल्या कृतीसाठी, सत्कार्यासाठी काहीतरी बक्षिसाची अपेक्षा बाळगायची, जीवन सुखकर बनेल असे वाटते म्हणून चांगले वागायचे, ह्या अशा गोष्टींमुळेच सत्कार्याची किंमत नाहीशी होऊन जाते. चांगुलपणाच्या प्रेमापोटी तुम्ही चांगले असला पाहिजेत, तुम्ही न्यायाच्या प्रेमापोटी न्यायी असला पाहिजेत; तुम्ही पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच पवित्र व शुद्ध असावयास हवे आणि निरपेक्षतेच्या प्रेमापोटीच निरपेक्ष असावयास हवे, तरच तुम्ही मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.
(CWM 03 : 264-265)
रुपांतरणाचा हा योग करणे हे सर्व गोष्टींमध्ये सर्वाधिक खडतर आहे. जर का व्यक्तीला असे वाटत असेल की, मी या पृथ्वीवर केवळ त्याचसाठी आलो आहे, मला दुसरेतिसरे काहीही करावयाचे नाही, फक्त तेच करावयाचे आहे आणि तेच माझ्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे; मग कितीही रक्ताचे पाणी करावे लागले, कितीही दुःखे सहन करावी लागली, संघर्ष करावा लागला, तरी ते तितकेसे महत्त्वाचे नाही, ”मला तेच हवे आहे, दुसरेतिसरे काहीही नको”, अशी स्थिती असेल तर मात्र गोष्ट निराळी ! अन्यथा मी म्हणेन, ”सुखी असा, चांगले वागा, तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे. चांगले वागा म्हणजे समजूतदार असा, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जगत आहात, ती अपवादात्मक अशी परिस्थिती आहे, हे जाणून असा आणि सामान्य जीवनापेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक सत्य जीवन जगायचा प्रयत्न करा. म्हणजे मग या चेतनेचा काही अंश, त्याचा प्रकाश, त्याचा चांगुलपणा या जगामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी तुम्ही संमती देऊ शकाल आणि ते खूप चांगले असेल.”
(CWM 07 : 200)
तोंडात असलेल्या गोड पदार्थापेक्षा एखाद्या सत्कृत्याची गोडी ही हृदयाला अधिक गोड वाटते. सत्कृत्याविना एखादा दिवस घालविणे म्हणजे आत्म्याविना एक दिवस घालविण्यासारखे आहे.
(CWM 15 : 225)
व्यक्तीने अंत:करणामध्ये नेहमी सद्भाव व प्रेम बाळगले पाहिजे आणि तिने समचित्ततेने, समतेने सर्वांवर त्याची पखरण केली पाहिजे.
(CWM 14 : 186)
स्वच्छ दृष्टी व सर्वसमावेशकता असणारी, कोणत्याही वैयक्तिक प्रतिक्रियांपासून मुक्त असणारी, अथक अशी परोपकारिता, हा ईश्वरावर प्रेम करण्याचा व या भूतलावर त्याची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
(CWM 14 : 187)