अमृतवर्षा २८
(जगभरामध्ये युद्धाचे वारे वाहत आहेत. महायुद्धाची आशंकादेखील व्यक्त केली जात आहे. यत्रतत्र सर्वत्र कलियुगाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. हे पाहून सामान्य माणसाचे मन काहीसे भयभीत होत आहे. परंतु या सगळ्या पाठीमागेसुद्धा एक ‘ईश्वरी योजना’ कार्यरत असते, याचे अचूक भान जागविण्याचे कार्य श्रीअरविंदलिखित पुढील विचाराद्वारे होत आहे, यामध्ये प्रतिपादित करण्यात आलेली कलियुगाची सकारात्मक बाजू वाचकांच्या मनात एक आश्वासकता जागवेल असा विश्वास वाटतो.)
सध्याचे युग म्हणजे पापाचा प्रेरक आणि मनुष्याच्या प्रगतीचा मुख्य शत्रू असणाऱ्या कलीच्या राजवटीचा कालखंड आहे. कलीच्या या कालखंडामध्ये मनुष्याची सर्वाधिक अधोगती होते आणि त्याचे सर्वाधिक पतनही याच कालखंडामध्ये होते. परंतु त्याचवेळी या कलियुगामध्येच अडथळ्यांशी लढा देत सामर्थ्यसंपादन देखील करता येते. तसेच जुन्या गोष्टी नष्ट करून नवनिर्मितीसुद्धा या कलियुगातच करता येते. ही प्रक्रिया कलियुगामध्ये घडताना दिसते.
जगाच्या उत्क्रांतीदरम्यान ज्या अनिष्ट, अमंगल घटकांचा विनाश केला जाणार आहे; हे नेमके तेच घटक असतील की जे त्यांच्या अतिरिक्त वाढीद्वारे वगळले जाणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला, नवसृष्टीची बीजे रुजवली जाणार आहेत, ती अंकुरित होणार आहेत. आणि येणाऱ्या सत्ययुगामध्ये, याच बीजांमधून वृक्ष निर्माण होणार आहेत.
तसेच, ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये एका ग्रहाच्या महादशेमध्ये इतर ग्रह त्यांच्या अन्तर्दशेचा आनंद घेतात, त्याचप्रमाणे कलियुगामध्ये, सत्य, त्रेता, द्वापार आणि कलि ही चारही युगं पुनःपुन्हा आपापल्या अन्तर्दशेचा आनंद घेतात. या चक्राकार घडामोडीच्या माध्यमातून, कलियुगामध्ये एक मोठे पतन घडून येते, त्याच्या पाठोपाठ ऊर्ध्वगामी विकास होतो, मग परत मोठे पतन, त्यानंतर पुन्हा ऊर्ध्वगामी वाटचाल होते; या सगळ्यामधून ‘ईश्वरा’ चे हेतू सिद्धीस जातात.
द्वापार आणि कलियुगाच्या या संधिकाळात, ‘ईश्वर’ आपल्या अवताराच्या माध्यमातून अनिष्टाची घटकांची अतिरिक्त वाढ होऊ देण्यास मुभा देतो. तो या अनिष्ट घटकांचा विनाश करतो, चांगल्या बीजांचे रोपण करतो आणि त्यांच्या अंकुरणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतो, आणि त्यानंतर कलियुग सुरू होते.
सत्ययुग अवतरण्यासाठी उपयोगी पडेल असे गुप्त ज्ञान आणि अशी कार्यपद्धती श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितली आहे. कलियुगामध्ये जेव्हा सत्ययुगाची अन्तर्दशा येते तेव्हा जगभरात गीतोक्त धर्माचा प्रचार-प्रसार होणे अपरिहार्य असते.
तसा काळ आता आला आहे, आणि म्हणूनच, काही थोड्या प्रज्ञावंत आणि सुविद्य व्यक्तींपुरतीच मर्यादित न राहता, आता गीतेला परदेशामध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्येसुद्धा मान्यता मिळू लागली आहे.
(लेखनकाळ : १९०९-१०)
ही मालिका येथे समाप्त होत आहे.
– श्रीअरविंद [CWSA 09 : 94-95]