Posts

कर्म आराधना – ३६

कर्म करत राहिल्यामुळे आंतरिक अनुभूती आणि बाह्य विकास यांच्यामध्ये संतुलन राखण्यास मदत होते; तसे न केल्यास, एकांगीपणा निर्माण होण्याची आणि प्रमाणबद्धता व संतुलनाची कमतरता वाढीस लागण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे तर, ‘ईश्वरा’साठी देखील कर्मसाधना करणे आवश्यक असते, कारण सरतेशेवटी, त्यामुळेच बाह्य प्रकृतीमध्ये आणि बाह्य जीवनामध्ये, आंतरिक प्रगती आणणे साधकाला शक्य होते आणि त्यामुळेच साधनेच्या समग्रतेस मदत होते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 240]

सर्व आजार हे संतुलनातील बिघाड दर्शवितात. याला कोणताही अपवाद नाही, पण या संतुलनातील बिघाडांचे अनेक प्रकार असतात. मी आत्ता फक्त शरीराबद्दलच बोलत आहे, मी प्राणाच्या नाडीगत आजारांबद्दल किंवा मानसिक आजारांबाबत बोलत नाहीये. ते आपण नंतर पाहू. आत्ता आपण फक्त या गरीबबिचाऱ्या लहानशा शरीराबद्दल बोलत आहोत. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व आजार, अगदी सर्व आजार, मग ते कोणतेही असू देत, मी त्यामध्ये अगदी अपघातसुद्धा समाविष्ट करेन, ह्या साऱ्या गोष्टी संतुलन बिघडल्यामुळे होतात.

म्हणजे असे की, तुमच्या शरीराचे सगळे अवयव, सगळे सदस्य आणि तुमच्या शरीराचे सर्व भाग हे एकमेकांशी सुसंवादी स्थितीत असतील तर, तुम्ही पूर्ण निरोगी स्थितीत असता. पण जर का कोठे अगदी थोडेसेही असंतुलन घडून आले तर, लगेच तुम्ही थोडेसे किंवा जास्त आजारी पडता, अगदी खूप जास्तसुद्धा आजारी पडता, अन्यथा मग अपघात तरी घडून येतो. जेव्हा जेव्हा आंतरिक असंतुलन असते, तेव्हा नेहमीच या गोष्टी घडून येतात.

पण तेव्हाही, तुम्ही शारीरिक संतुलनाला प्राणाच्या आणि मनाच्या संतुलनाची जोड दिली पाहिजे. सर्व प्रकारच्या गोष्टी सुरक्षितपणे करता येणे शक्य व्हावे यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत कोणताही अपघात घडून येऊ नये म्हणून, तुमच्याकडे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक असे तिहेरी संतुलन असायलाच हवे; आणि ते संतुलन केवळ प्रत्येक भागातच असून उपयोगाचे नाही; तर पुन्हा ते तीनही भाग परस्परांशीही सुसंवादी असायला हवेत.

…इथेच या समस्येचे निराकरणही आहे. अशी असंख्य संयुगे (combinations) असतात आणि परिणामतः आजारपणाची कारणेही असंख्य असतात आणि अपघातांची कारणेही अगणित असतात. तरीही आपल्याला समजून घेणे सोपे व्हावे म्हणून, आपण त्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)