तुम्ही जर योगसाधना करत असाल तर, तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव या गोष्टींना अनुमती देता कामा नये. कारण तसे करणे याचा अर्थ ‘ज्ञान झाले पण त्यापाठोपाठ सक्षमता आली नाही’ असा होतो. एखादी गोष्ट असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीदेखील ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; अशा दुर्बलतेस कोणत्याही गंभीर तपस्येमध्ये थारा दिला जात नाही. अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट शिल्लक राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि क्षमता, शक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुम्ही पौरुषहीन, दुबळे, धैर्यहीन आणि सामर्थ्यहीन ठरता. अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण (अमुक एखादी गोष्ट करणे योग्य नाही हे) माहीत असूनदेखील, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते.
याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादी अळी दडून बसलेली असते तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, कसेही करून, त्याला शोधून नष्टच केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी चालवून दिलेली दुर्बलता ही पुढे जाऊन, कधीच सुधारता न येणाऱ्या अडचणींचे कारण ठरते.
– श्रीमाताजी (CWM 03 : 221)