Posts

तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये स्वतःचे एकत्रीकरण अधिक दृढपणे केले पाहिजे. तुम्ही जर स्वतःला सतत विखरत (disperse) राहिलात आणि आंतरिक वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलात, तर सामान्य बाह्यवर्ती प्रकृतीच्या क्षुद्रतेमध्ये आणि ती प्रकृती ज्या गोष्टींप्रति खुली आहे अशाच गोष्टींच्या प्रभावाखाली राहाल. तुम्ही सतत वावरत राहाल.

अंतरंगामध्ये राहून जीवन जगायला शिका, तसेच नेहमी अंतरंगात राहून, श्रीमाताजींशी नित्य आंतरिक संपर्क ठेवून कृती करायला शिका. सुरुवातीला ही गोष्ट नेहमी आणि समग्रपणे करणे कठीण वाटू शकेल, परंतु व्यक्ती जर नेटाने तसे करत राहिली तर तसे करता येणे शक्य असते, आणि असे करायला शिकणे ही किंमत चुकती करूनच, व्यक्तीला ‘योगा’मध्ये सिद्धी प्राप्त होऊ शकते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 227]

एकदा का एखाद्याने योगमार्गामध्ये प्रवेश केला की, मग अगदी काहीही झाले, किंवा कोणत्याही अडचणी उद्भवल्या तरी ध्येयापर्यंत जाण्याचा निश्चय दृढ ठेवायचा, एवढी एकच गोष्ट त्याने करायची असते. खरेतर, योगाची परिपूर्ती कोणीही स्वतःच्या क्षमतेद्वारे करू शकत नाही – तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या महत्तर ‘शक्ती’द्वारेच ही परिपूर्ती होऊ शकते – सर्व प्रकारच्या चढउतारांमध्ये, त्या ‘शक्ती’ला नेटाने केलेल्या आवाहनामुळे ही परिपूर्ती होऊ शकते. तुम्ही अगदी सक्रियपणे ‘अभीप्सा’ बाळगू शकत नसलात तरीदेखील, साहाय्य लाभावे म्हणून श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख राहा – ही एकच गोष्ट अशी आहे की, जी नित्य केली पाहिजे.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 294]

कर्म आराधना – ३५

एखादी व्यक्ती हिमालयात निघून गेली तर, ती स्वतःला अक्रिय ध्यानासाठी (inactive meditation) सुयोग्य बनवू शकेल, पण ती जीवन जगण्यासाठी आणि ‘श्रीमाताजीं’ची सेवा करण्यासाठी काहीशी अपात्र ठरण्याची शक्यता आहे, आणि असे झाले तर, पुढच्या जन्मामध्येही तिचे ते व्यक्तित्व तसेच कायम राहील. (हिमालयात निघून जाणे इ.) हा निव्वळ पारंपरिक कल्पनांचा प्रभाव आहे, त्यांचा पूर्णयोगात काहीही उपयोग नाही. या इथल्या जीवनात, ‘श्रीमाताजीं’च्या जवळ राहून, कर्म करत असतानाच, व्यक्तीने ‘श्रीमाताजीं’चे परिपूर्ण साधन बनण्यासाठी स्वतःला सुपात्र बनविले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 246]

साधनेची मुळाक्षरे – २३

(श्रीअरविंद The Mother या ग्रंथामध्ये श्रीमाताजींचे स्वरूप उलगडवून दाखवीत आहेत, त्या ग्रंथातील हा अंशभाग…)

त्या एकमेवाद्वितीय आद्य विश्वातीत ‘शक्ती’चे – ‘श्रीमाताजीं’चे स्थान सर्व विश्वांच्या वर असते आणि त्या स्वतःमध्ये ‘परम ईश्वरा’ची शाश्वत चेतना बाळगून असतात. त्या एकट्या, परम ‘शक्ती’ आणि अनिर्वचनीय अशी ‘उपस्थिती’ स्वतःमध्ये साठवून असतात; जी ‘सत्यं’ आविष्कृत होणे आवश्यकच आहेत अशा ‘सत्यां’ना त्यांनी साद घातलेली असते; अशी सत्यं त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतलेली असतात; श्रीमाताजींच्या अनंत चेतनेच्या प्रकाशामध्ये गुप्त असणारी अशी जी सत्यं असतात, ती ‘सत्यं’ ‘परमरहस्या’मधून त्या खाली आणतात आणि श्रीमाताजी स्वत:च्या सर्वसामर्थ्यवान शक्तीमध्ये व असीम जीवनामध्ये आणि विश्वगत शरीरामध्ये, त्या सत्यांना शक्तिरूप प्रदान करतात. ‘परमेश्वर’ श्रीमाताजींमध्ये शाश्वत ‘सच्चिदानंद’ म्हणून कायमस्वरूपी आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे तो विश्वांमध्ये ‘ईश्वर-शक्ती’ या एका आणि दुहेरी चेतनेमध्ये आणि ‘पुरुष-प्रकृती’ या दुहेरी ‘तत्त्वां’द्वारे आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे त्याने ‘विश्वां’मध्ये आणि विविध ‘स्तरां’वर, ‘देवदेवता’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ यांच्या माध्यमातून मूर्तरूप धारण केले आहे; आणि ज्ञात तसेच अज्ञात विश्वांमधील सर्वकाही त्यांच्याचमुळे साकार झाले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 14-15)

साधनेची मुळाक्षरे – ११

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’च्या संकल्पनेवर, प्रतिमेवर किंवा नामावर, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी म्हणून आणि त्यांनी आपले मन, प्राण व कर्म यांचे नियंत्रण करावे म्हणून अभीप्सा बाळगणे.

परंतु मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी, प्रथम प्रकृतीचे शुद्धीकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 225-226)

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास हवे, म्हणजे मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाश व सामर्थ्यानिशी त्या व्यक्तीमध्ये कार्य करतील, जेणेकरून त्या व्यक्तीस साधना करता येईल. महान पूर्णयोगी बनण्याची, अतिमानसिक व्यक्ती बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या दिशेने स्वत:ची किती वाटचाल झाली आहे ह्याची स्वत:शीच विचारणा करणे हीदेखील एक चूकच आहे. श्रीमाताजींविषयी भक्ती बाळगणे आणि स्वत:ला त्यांच्याप्रत समर्पित करणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे तसे बनण्याची इच्छा बाळगणे हा योग्य दृष्टिकोन आहे. उरलेल्या सर्व गोष्टी ठरविणे आणि त्या तुमच्यामध्ये घडवून आणणे ह्या गोष्टी श्रीमाताजींनीच करावयाच्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151-152)

मी जेव्हा प्रथमच भारतात जपानच्या बोटीतून आले, त्या बोटीवर दोन पाद्री होते. ते दोघेही भिन्न पंथांचे होते. रविवारचा धार्मिक कार्यक्रम कोणी करावयाचा ह्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. बऱ्याच वेळाने त्यापैकी एकाने माघार घेतली, दुसऱ्याने कार्यक्रमाला सुरुवात केली. बोटीवर हा कार्यक्रम जिथे होणार होता तिथे जाण्यासाठी खाली उतरून जावयाचे होते. मला वाटते, तेव्हा आम्ही लाल समुद्रातून प्रवास करीत होतो. त्या दिवशी खूप उकाडा होता, पण सर्वांनी जाकीटे घातली होती, टाय लावले होते, चामडी बूट घातले होते, डोक्यावर टोप्या घातल्या होत्या, हातामध्ये बायबल ग्रंथ धरलेला होता. सगळे जण तयार होऊन रांगेने जणू काही मिरवणूकच निघाली असावी अशा रीतीने त्या ठिकाणी गोळा झाले. बोटीवरचे जवळपास सर्व लोक त्यामध्ये मोठ्या धार्मिकतेने सहभागी झाले. प्रार्थना संपली आणि लगेचच कोणी बारमध्ये, कोणी पत्ते खेळण्यामध्ये, कोणी काही तर कोणी काही करण्यामध्ये गुंगून गेले.

नंतर ते पाद्री माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्ही प्रार्थनेला आला नाहीत?”

मी म्हटले, “माझा धर्मावर विश्वास नाही.”

ते म्हणाले,”अच्छा! म्हणजे तुम्ही जडवादी आहात तर!”

मी म्हटले,”नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही नाराज व्हाल, त्यापेक्षा न बोलणेच बरे.”

त्यांनी खूप आग्रह केल्यावर मी त्यांना सांगितले,”तुम्ही आणि इतर लोकही प्रामाणिक आहेत असे मला वाटत नाही. तुम्ही केवळ एक सामाजिक कर्तव्य व सामाजिक प्रथा म्हणून प्रार्थना केलीत, त्यामध्ये ईश्वराशी संपर्क साधण्याचा कोणताही भाव नव्हता.”

ते म्हणाले, “पण ते तर आम्हाला जमत नाही.”

मी म्हणाले, “म्हणूनच तर मी तेथे आले नाही. कारण मला त्यात स्वारस्य वाटत नाही.”

– श्रीमाताजी

(CWM 08:149)

(एका आश्रमवासी साधकाने सांगितलेली ही आठवण.)

मी तेव्हा आश्रमात नुकताच राहिला आलो होतो. दुपारी एका आश्रमवासी साधकाने संभाषणाच्या ओघात मला सांगितले की, “काही लोकांना वाटते की मोठमोठे ग्रंथ वाचणे, प्रवचने ऐकणे, तासनतास ध्यानधारणा करणे म्हणजे साधना. परंतु मी म्हणतो की, जर तुम्हाला श्रीमाताजी काय आहेत हे खरोखरी जाणून घ्यावयाचे असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काम केले पाहिजे, तरच तुम्हाला त्यांच्या शक्तिस्रोताचा प्रत्यय येईल.” त्याच्या या शब्दांचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला आणि श्रीमाताजींसाठी काम करावयाचे असे मी मनोमन ठरवून टाकले.

नंतर सुमारे एका वर्षानंतरची गोष्ट. माझ्या सोबत एक पगारी कामगार आणि एक मुलगा होता. कामगार होता, तो होता तंत्रज्ञ. आणि मी होतो अगदीच नवीन, मदतनीस मुलाचे काम असावयाचे ते शिडी इकडून तिकडे हलविण्याचे, तो मुलगा बरेच दिवस गैरहजर असायचा. त्याच्या गैरहजेरीत ‘शिडी हलविण्यासारखे क्षुल्लक काम मी का करावे’ या भावनेने तंत्रज्ञ त्याला हातदेखील लावत नसे. अशाने कामाचा खोळंबा होऊ लागला, तेव्हा मी श्रीमाताजींना सुचविले, “आम्हाला दुसरा एक मदतनीस मुलगा देता का?”

त्या म्हणाल्या, “शिडी उचलायला अजून कोणाची मदत कशास पाहिजे? तुम्ही दोघे मिळून एक शिडी उचलू शकत नाही?” नाही म्हटले तरी ‘मी त्यांचा वरिष्ठ आहे’ असा एक भाव माझ्याही मनात होताच. पण श्रीमाताजींचे म्हणणे मान्य करावयाचे मी ठरविले.

दुसऱ्या दिवशी मदतनीसाची वाट न पाहता मी एकटाच शिडी हलवू लागलो. हे पाहून नाईलाजाने का होईना, पण त्या कामगारानेही शिडी उचलण्यास हातभार लावला. अशाप्रकारे, आपल्या सहकाऱ्यांकडून काम कसे करवून घ्यावयाचे ह्याचा धडाच श्रीमाताजींनी मला दिला होता.