Posts

इसवी सन १९१४. ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या नियतकालिकामध्ये, पाँडिचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या श्री. अरविंद घोष यांच्या ‘आर्य’ मासिकाविषयीचे निवेदन आले होते, आणि ते निवेदन तेव्हा नवयुवक असलेल्या अंबालाल पुराणी यांच्या वाचनात आले. त्यांनी त्याची वर्गणी भरली. तत्पूर्वी बडोद्याच्या ‘दांडिया बाजार’ येथे झालेली लोकाग्रणी असलेल्या श्री. अरविंद घोष यांची व्याख्याने त्यांनी ऐकलेली होती. पुराणी तत्कालीन स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेले होते. गुजराथमध्ये कार्यरत असणाऱ्या त्यांच्या एका छोट्या गटाने भारताची स्वातंत्र्यप्राप्ती हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कार्याला सुरुवातही केलेली होती. भारताचे स्वातंत्र्य हे अंतिम साध्य नसून, भारताच्या सांस्कृतिक आत्म्याच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असणारी ती पूर्वअट आहे, असे अंबालाल पुराणी यांचे विचार होते. त्यामुळे स्वामी श्रद्धानंद, पंडित मदन मोहन मालवीय, रविन्द्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी या सगळ्या नेत्यांच्या तुलनेत त्यांना श्री. अरविंद घोष यांचे विचार अधिक तर्कशुद्ध आणि अधिक समाधानकारक वाटले. श्री. अरविंद घोष यांच्या विचारांशी पुराणी यांना एक आत्मीय जवळीक जाणवू लागली. आणि त्यांच्याच परवानगीने इ. स. १९१६ साली ‘आर्य’मधील लिखाणाचे श्री. पुराणी यांनी गुजराथीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली. इ. स. १९०७ साली सुरत काँग्रेसच्या निमित्ताने झालेल्या भेटीत पुराणी यांच्या बंधुना श्री. अरविंद घोष यांनी क्रांतिकार्याची काही योजना सांगितली होती. ती प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची एकदा परवानगी घ्यावी, अशी आवश्यकता अंबालाल पुराणी यांना जाणवली.

डिसेंबर १९१८ साली श्रीअरविंद यांना भेटण्यासाठी म्हणून, पुराणी ‘आर्य’ मासिकाच्या कार्यालयात जाऊन पोहोचले. श्रीअरविंदांचे वास्तव्य तेव्हा तेथेच होते. पुराणी सकाळी आठ वाजता तेथे पोहोचले आणि भेटीची वेळ ठरली होती दुपारी तीनची.

*

(श्री. अंबालाल पुराणी स्वत: या भेटीची साद्यंत हकिकत येथे सांगत आहेत…)

मी जेव्हा श्रीअरविंदांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा ते वरच्या मजल्यावर असलेल्या व्हरांड्यामध्ये बसलेले होते. त्यांच्या समोर एक छोटे टेबल होते आणि त्या पाठीमागे असलेल्या एका लाकडी खुर्चीमध्ये ते बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्याभोवती एक आध्यात्मिक आभा पसरलेली मला जाणवली. त्यांची दृष्टी अंतःकरणाचा ठाव घेणारी होती. आधी झालेल्या पत्रव्यवहाराच्या निमित्ताने ते मला ओळखत होते. बडोद्यामध्ये माझ्या भावासोबत झालेल्या त्यांच्या भेटीची आठवणही मी त्यांना करून दिली. ती भेट ते विसरले नव्हते. मी त्यांना असे सांगितले की, आता आमचा गट क्रांतिकार्यासाठी सुसज्ज झालेला आहे. (आम्हाला संघटित होण्यासाठी अकरा वर्षांचा कालावधी लागला होता.) श्रीअरविंद काही काळ स्तब्ध राहिले. नंतर त्यांनी मला माझ्या साधनेसंबधी काही प्रश्न विचारले. त्यांना मी काय करतो, ते सांगितले आणि म्हणालो की, “साधना वगैरे सगळे ठीक आहे. परंतु जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, तोपर्यंत माझ्या चित्ताची एकाग्रता होणे कठीण आहे.”

श्रीअरविंद म्हणाले, “भारत स्वतंत्र होण्यासाठी कदाचित क्रांतिकार्याची आवश्यकता भासणार नाही, असे दिसते.”

“पण त्याशिवाय ब्रिटिश सरकार भारतातून कसे निघून जाईल?” मी त्यांना विचारले.

“तो एक वेगळाच प्रश्न आहे. पण कोणत्याही क्रांतिकारक कृतीची आवश्यकता न भासता भारत स्वतंत्र झाला तर? मग तुम्हाला तुमची योजना प्रत्यक्षात आणण्याची गरजच काय? तेव्हा तुम्ही आता आपले लक्ष योगसाधनेवर केंद्रित केलेले बरे,” ते म्हणाले.

“भारतभूमीच्या धमन्यांमध्येच साधना आहे. त्यामुळे, मला असे वाटते की, भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा, हजारो लोक योगसाधनेसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतील. परंतु आजच्या घडीला या जगामध्ये, सत्याविषयी किंवा आध्यात्मिकतेविषयी, आमच्यासारख्या गुलामांकडून कोण ऐकून घेईल?” मी विचारले.

ते म्हणाले, “स्वातंत्र्य मिळवायचेच आहे हे भारताने अगोदरच निर्धारित केले आहे आणि त्या उद्दिष्टाप्रत कार्य करण्यासाठी आवश्यक ती नेतेमंडळी आणि कार्यकर्ते भारताला निश्चितपणे मिळतील. परंतु योगाची हाक काही प्रत्येकालाच येत नाही. तेव्हा, तुम्हाला जर ती हाक आलेली आहे, तर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करणे बरे नाही का? आणि याउपरही तुम्हाला जर क्रांतिकारक कृतिकार्यक्रम हाती घ्यायचा असेल तर, तुम्ही तो खुशाल हाती घ्या, पण मी मात्र त्याला संमती देणार नाही.”

तेव्हा मी म्हणालो की, “पण आमच्या क्रांतिकारक चळवळीचा प्रारंभ तुम्हीच करून दिला होतात, आणि त्यामागची प्रेरणादेखील तुमचीच होती. तर मग आता त्याची अंमलबजावणी करतेवेळी मात्र त्याला संमती देण्यास तुम्ही नकार का बरे देत आहात?”

“कारण एकेकाळी मी तसे कार्य केलेले आहे आणि मला त्यातल्या अडचणींची चांगली कल्पना आहे. आदर्शवादाने भारावून जाऊन, उत्साहाच्या भरात, तरुण मुले या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येतात. परंतु या गोष्टी दीर्घकाळ टिकून राहात नाहीत. शिस्तीचे पालन करणे आणि त्यात निभाव लागणे हे अतिशय कठीण होऊन बसते. एकाच संघटनेमध्ये छोटेछोटे गट निर्माण होतात, त्यांच्यामध्ये गटबाजी सुरु होते, इतकेच काय पण माणसांमध्येसुद्धा आपापसात शत्रुत्व वाढीस लागते. नेतृत्वासाठी स्पर्धा सुरु होते. आणि अशा या संघटनांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच सरकारचे काही हस्तक बेमालूमपणे मिसळून गेलेले असतात. आणि त्यामुळे अशा चळवळी प्रभावीरीतीने कार्य करू शकत नाहीत. कधीकधी त्या इतक्या हीन पातळीवर उतरतात की त्यांच्यामध्ये पैशावरूनसुद्धा भांडणे सुरु होतात”, ते शांतपणाने म्हणाले.

“पण समजा, साधनेचे महत्त्व हे काकणभर अधिक आहे, असे मी मान्य केले आणि मी त्यावर लक्ष केंद्रित करायचे असे अगदी बुद्धिपूर्वक ठरविले तरी, आता माझी अडचण अशी आहे की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी काहीतरी केलेच पाहिजे, असे मला खूप तीव्रपणे वाटते आहे. या विचारांनी गेले अडीच वर्षे मला सुखाची झोपसुद्धा लागलेली नाही. तसाच जोरकस प्रयत्न केला तरच मी शांत राहू शकेन, असे मला वाटते. भारताच्या स्वातंत्र्यावरच माझे सारे लक्ष खिळलेले आहे. आणि ते मिळाल्याशिवाय मला झोप लागणेसुद्धा अवघड आहे.” असे मी सांगितले.

श्रीअरविंद दोन ते तीन मिनिटे स्तब्ध राहिले. ती दोनतीन मिनिटे मला खूप मोठी वाटली. नंतर ते म्हणाले, ” भारत स्वतंत्र होईल अशी खात्री तुम्हाला समजा कोणी दिली तर?”

“पण अशी खात्री कोण देऊ शकेल?” मला माझ्या स्वतःच्याच प्रश्नामध्ये शंकेचा आणि आव्हानाचा सूर जाणवला.

परत ते दोनतीन मिनिटांसाठी स्तब्ध राहिले. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, “समजा मी तुम्हाला तशी खात्री दिली तर?”

मी एक क्षणभर थांबलो आणि माझ्या मनाशीच विचार करून म्हटले, “तुम्ही खात्री दिलीत, तर मग मात्र मी ते मान्य करेन.”

अत्यंत गंभीरपणे ते उद्गारले, “तर मग, भारत स्वतंत्र होईल अशी खात्री मी तुम्हाला देतो.”

माझे काम झाले होते – माझा पाँडिचेरीच्या भेटीचा हेतू सफल झाला होता. माझा वैयक्तिक प्रश्न आणि आमच्या गटाची समस्या अशा रीतीने सुटली होती. त्यानंतर बडोद्यातील परिचितांविषयी काही गप्पागोष्टी झाल्या.

आता माझी निरोप घेण्याची वेळ आली. पुन्हा एकदा माझ्या मनात भारताच्या स्वातंत्र्यासंबंधीचा प्रश्न उफाळून आला. निघण्यासाठी मी जेव्हा उठलो तेव्हा तो प्रश्न मला मनात तसाच दाबून ठेवता आला नाही – कारण माझ्यासाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न होता, “भारत स्वतंत्र होईल अशी खरंच तुम्हाला खात्री आहे?” मी पुन्हा एकदा त्यांना विचारले. माझ्या स्वतःच्याच या प्रश्नाचा खरा गर्भितार्थ मला तत्क्षणी तरी जाणवला नव्हता. वास्तविक, त्यांनी मला खात्री दिली होती आणि तरीसुद्धा माझ्या मनातील शंकांचे पूर्णतः निरसन झाले नव्हते, मला वचन हवे होते.

श्रीअरविंदांची चर्या अतिशय गंभीर झाली. खिडकीमधून पलीकडे दिसणाऱ्या आकाशामध्ये दूरवर त्यांची नजर खिळली. नंतर त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि समोरच्या टेबलावर अत्यंत ठाशीवपणाने आपली मूठ काहीशी आपटत ते म्हणाले, “माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा, उद्याच्या उगवत्या सूर्याइतकेच भारताचे स्वातंत्र्य निश्चित आहे. तसा ईश्वरी आदेश अगोदरच निघालेला आहे. – आता तो प्रत्यक्षात उतरायला फार काळ लागणार नाही.”

मी त्यांच्यासमोर नतमस्तक झालो.

आगगाडीमध्ये परतीच्या प्रवासात असताना, सुमारे दोन-अडीच वर्षानंतर प्रथमच मला अगदी निवांत झोप लागली. माझ्या मनामध्ये त्या दृश्याने आयुष्यभरासाठी घर केले. ते चित्र असे – एका छोट्या टेबलापाशी आम्ही दोघे उभे आहोत, माझा कळकळीचा प्रश्न, त्यांची ती ऊर्ध्वाभिमुख खिळलेली नजर, आणि त्यांचा तो धीरगंभीर पण ठाम असा आवाज, ज्यामध्ये जगाला हादरवण्याची ताकद होती, आणि त्या टेबलावर घट्ट आवळलेली त्यांची ती मूठ, जी ईश्वरी सत्यावरील त्यांच्या आत्म-विश्वासाची निदर्शक अशी खूण होती.

संपूर्ण जगभरामध्ये कलियुग असेल, लोहयुग असेल पण भारतमातेचे हे सद्भाग्य आहे की, तिची मुले सत्यज्ञानी आहेत, आणि त्यांची त्या सत्यावर अविचल श्रद्धा आहे आणि प्रसंगी त्यासाठी प्राण पणाला लावण्याचीदेखील त्यांची तयारी असते. आणि मला वाटते, या महत्त्वपूर्ण गोष्टीमध्येच भारताचे आणि संपूर्ण विश्वाचे दिव्य सद्भाग्य सामावलेले आहे!

(Evening talks : 16-19)

*

वाचक मित्रांनो, हा प्रसंग घडला आहे इ. स. १९१८ मध्ये; म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी साधारण एकोणतीस वर्षं आधी आणि याला म्हणतात, ‘क्रांतदर्शित्व’.
स्वातंत्र्यसैनिक बनू पाहणाऱ्या अंबालाल पुराणी यांचे येथे मन-परिवर्तन झाले आणि पुढे ते आयुष्यभर श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी बनून, अंधाराशी झुंज देणाऱ्या प्रकाश-सेनेचे सैनिक बनले.

भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि श्रीअरविंद यांची १५० वी जयंती या सुवर्ण-मुहूर्तावर उद्यापासून आपण – ‘क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला भारत’ – ही मालिका सुरु करत आहोत.

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

गेले काही दिवस आपण अमर्त्यत्व, शरीराचे रूपांतरण, अतिमानस यासंबंधीचे तत्त्वज्ञान समजावून घेतले. आपण पाहिले की, अतिमानसिक देहाच्या चार वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे दीप्तिमानता (luminosity). अशा देहाचे विवेचन करताना श्रीमाताजींनी म्हटले आहे की, ”अंततः तो देह दीप्तिमान होऊन जाईल, त्याच्या प्रत्येक पेशीमधून अतिमानसिक उज्ज्वलता प्रस्फुरित होत राहील. सूक्ष्म दृष्टी खुली होण्याइतपत ज्यांचा विकास झाला आहे केवळ अशा व्यक्तींनाच नव्हे; तर अगदी सामान्य माणसालादेखील ही प्रभा जाणवेल. अगदी हरएक व्यक्तीसाठी ती गोष्ट उघड सत्य असेल, अगदी शंकेखोर माणसाची सुद्धा ज्यामुळे खात्री पटेल असा तो रूपांतरणाचा स्थायी पुरावा असेल.”

तत्त्वज्ञान स्वरूपातील हे विधान, श्रीअरविंदांनी देह ठेवला तेव्हा मूर्त झालेले आपणास आढळते. ‘रूपांतरणाचा स्थायी पुरावा’ असे त्याचे वर्णन करता येईल. आयुष्यभर ज्या कारणार्थ देह झिजवला, किंबहुना देहधारणाच ज्या कारणार्थ घडली, ज्या कारणार्थ अवतार घेतला त्या अतिमानसिक प्रकाशाचे अवतरण स्वतःच्या देहामध्ये करून, तो देह श्रीअरविंदांनी या पृथ्वी-चेतनेच्या रूपांतरणासाठी विसर्जित केला.

“दिव्य चेतना प्राप्त करून घेणे आणि दिव्यत्वामध्ये जीवन जगणे म्हणजे स्वयमेव अमर्त्यत्व आणि शरीरसुद्धा दिव्य बनविणे आणि ते ईश्वरी कार्यासाठीचे व दिव्य जीवनासाठीचे सुयोग्य साधन बनविणे, ही त्याची (अमर्त्यत्वाची) भौतिक अभिव्यक्ती असेल” – असे श्रीअरविंदांचे सांगणे आहे. हे केवळ सांगणे नाही, हे केवळ पोकळ तत्त्वज्ञान नाही तर त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीअरविंद!

शंकेखोर मनाला याची खात्री कशी पटावी? श्रीअरविंदांनी दि.०५ डिसेंबर १९५० रोजी रात्री ०१ वाजून २६ मिनिटांनी देह ठेवला आणि नंतर दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी सायंकाळी ०५ वाजता म्हणजे सुमारे शंभर तासांनी त्यांना समाधीस्थ करण्यात आले. या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांच्या देहामध्ये विघटनाच्या कोणत्याही खाणाखुणा दिसत नव्हत्या, विघटनाचा लवलेशदेखील आढळून येत नव्हता.

“श्रीअरविंदांच्या देहामध्ये अतिमानसिक प्रकाशाचे संघनीकरण झालेले आहे, आणि म्हणून जोवर त्यामध्ये विघटनाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत तोवर तो देह तसाच ठेवण्यात येईल”, अशी घोषणा श्रीमाताजींनी केली होती.

पाँडिचेरी हा भारताचा पूर्व किनारा, उष्णकटिबंधीय प्रांत, आणि अशा प्रांतांमध्ये कोणत्याही बाह्य अथवा कृत्रिम उपायांचा अवलंब न करता, एखाद्याने देह ठेवल्यानंतर त्या देहाचे विघटन न होता तो टिकून राहणे, हेच शास्त्रज्ञांसाठी आणि डॉक्टरांसाठी देखील थक्क करणारे असे आश्चर्य होते. आणि त्याची नोंद त्यावेळच्या डॉक्टरांनी, प्रशासकांनी, वृत्तपत्रांनीसुद्धा घेतली होती. ‘प्रचंड भौतिकतावादाच्या या युगात आत्माच्या वर्चस्वाचे अविनाशी साक्षीदार’ अशा शब्दात सुविख्यात ‘हिंदु’ या वृत्तपत्राने या घटनेची नोंद घेतली होती. शंकेखोर व्यक्तींना, बुद्धिवाद्यांना मिळालेला हा एक भक्कम पुरावा होता.

देहाचे विघटन तर नाहीच, उलट शांतपणे ध्यानस्थ पहुडलेल्या देहाला व्यापून असणारा निळसर, सोनेरी दीप्तिमानतेचा अनुभव तेथील उपस्थितांना येत होता, त्याची वर्णने प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवली आहेत. श्रीअरविंदांनी देह ठेवल्यानंतर आश्रमाच्या छायाचित्रकाराने काढलेले त्यांचे छायाचित्र आजही त्याची साक्ष देत आहे. (आजच्या post सोबत ते छायाचित्र दिले आहे आणि ते बघितल्यावर कोणालाही वाटावे की, जणूकाही श्रीअरविंद झोपलेले असताना कोणीतरी त्यांचे छायाचित्र घेतले आहे की काय?)

श्रीअरविंदानी देह ठेवण्यापूर्वी एक वर्ष आधी, अतिमानस अवतरणाच्या त्यांच्या जीवितकार्याबद्दल, श्रीमाताजी आणि त्यांची चर्चा झाली होती. तेव्हा या कार्यासाठी आवश्यकता भासल्यास आपले बलिदान देण्याची तयारी श्रीमाताजींनी दर्शविली होती, परंतु श्रीअरविंदांनी त्यांना सांगितले होते, “जर तशीच आवश्यकता भासली तर ते बलिदान मी करेन, तुम्ही अतिमानस अवतरणाचे आणि रूपांतरणाचे आपले कार्य चालू ठेवा.” आणि खरोखरच श्रीअरविंदांनी पुढे देह ठेवला आणि श्रीमाताजी त्यानंतर २३ वर्षे श्रीअरविंदप्रणित अतिमानस अवतरणाचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत करत राहिल्या. श्रीमाताजींचे प्राणोत्क्रमण हा देखील श्रीअरविंदांप्रमाणेच, मानवाच्या अमर्त्यत्वाच्या वाटचालीमधील महत्त्वपूर्ण टप्पा मानावा लागेल असाच आहे.

श्रीअरविंदांनी देह ठेवला ही वैश्विक परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती नव्हती किंवा मोक्षादी स्वार्थासाठी परलोकामध्ये निघून जाणेदेखील नव्हते, तर ते एक वीरमरण होते. पृथ्वीची जडभौतिक चेतना आणि अतिमानसिक चेतना यांमधील ते युद्ध होते. आज या पृथ्वीचेतनेमध्ये शरीर, प्राण आणि मन जसे स्थायी आहेत तशी अतिमानसिक चेतना या पृथ्वीचेतनेमध्ये स्थायी करायची तर त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचा निर्धार करून, प्राणपणाने दिलेली ती झुंज होती. पृथ्वी-चेतनेच्या उत्थानासाठी केलेला तो दिव्य त्याग होता.

या दिव्य त्यागाचे वर्णन करताना श्रीमाताजी म्हणतात, “ज्यांनी आमच्या साठी इतके काही केले, ज्यांनी कार्य केले, ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी दु:खभोग सहन केले, ज्यांनी आशा बाळगली, ज्यांनी खूप चिकाटी बाळगली; ज्यांनी सर्वासाठी संकल्प केला, सर्वासाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्यांनी आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले; त्यांच्याप्रत आमची अनंत कृतज्ञता! त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की, आम्हाला त्यांचे कधीही विस्मरण होऊ नये; अगदी एक क्षणदेखील आपण हे विसरू नये की, आपण सारे त्यांचे ऋणी आहोत.” श्रीअरविंदांच्या समाधीवर कोरलेली ही वाक्यं आपल्याला त्यांच्या कार्याची सतत आठवण करून देत राहतात.

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

प्रकृतीमध्ये खडकाकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून पशुकडे, पशूकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या भौतिक प्रकृतीच्या दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशुच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. परंतु त्याच्या भौतिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित. प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. पशूच्या दृष्टीने जसा मानव,त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची जाणीव मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल.

मानवाला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक जाणिवेमध्ये जगणारा मानव हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, सत्य-चेतना प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी मानवाला सांगितले. ही सत्यचेतना, जिला ते ‘अतिमानस’ (SupraMental consciousness) असे संबोधत असत, ती चेतना स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 116)

श्रीमाताजी : मी जेव्हा जपानहून परत येत होते तेव्हा एक घटना घडली. मी समुद्रामध्ये बोटीवर होते आणि असे काही घडेल अशी अपेक्षाही नव्हती. (मी माझ्या आंतरिक जीवनामध्ये व्यस्त होते, परंतु शरीराने मी बोटीवर राहात होते.) तेव्हा एकदम, एकाएकी, पाँडिचेरीपासून समुद्रामध्ये दोन मैलावर असताना, हवेतील वातावरण अचानकपणे बदलले आणि मला जाणवले की, आम्ही श्रीअरविंदांच्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. तो अगदी भौतिक, सघन असा अनुभव होता.

पाँडिचेरीमध्ये मला ह्याच्या अगदी बरोबर उलट अनुभवसुद्धा आलेला आहे. अनेक वर्षांनंतर मी जेव्हा प्रथमच मोटरकारने बाहेर पडले होते, तेव्हाचा हा अनुभव आहे. मी त्या तलावाच्या पलीकडे थोडीशीच गेले असेन, अचानक मला वातावरणातील बदल जाणवला. इथे जी समृद्धी, ऊर्जा, प्रकाश, शक्ती होती ती अचानक सर्वच्या सर्व कमी कमी होत गेली आणि नंतर तर ती नाहीशीच झाली होती. मी तेव्हा मानसिक किंवा प्राणिक चेतनेमध्ये नव्हते तर, मी तेव्हा पूर्णपणे भौतिक चेतनेमध्ये होते. जे कोणी शारीरिक चेतनेबाबत संवेदनशील असतात त्यांना हा फरक खूप स्पष्टपणे जाणवतो. आणि मी तुम्हाला खात्री देते की, ज्याला आपण आश्रम असे म्हणतो तेथे शक्तीचे जे संघनीकरण झालेले आहे, तसे संघनीकरण शहरात किंवा परिघवर्ती गावांमध्येसुद्धा कोठेही नाहीये.

– श्रीमाताजी

एखादी चूक घडली आणि त्याची प्रांजळ कबुली गुरुपाशी दिली तर, ती चूक पुन्हा न करण्याचा तुमचा निर्धार हा फक्त तुमचाच राहात नाही कारण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, ईश्वरी व्यवस्थाच तुम्हास अनुकूल अशा पद्धतीने कार्यकारी होते.

मी प्रथम पाँडिचेरी येथे श्रीअरविंदांना भेटले तेव्हाचा हा प्रसंग आहे. मी गाढ ध्यानावस्थेत होते, अतिमानसातील गोष्टी मी पाहात होते. त्या गोष्टी जशा असावयास हव्यात तशाच होत्या, पण काही कारणाने त्या आविष्कृत होत नव्हत्या. जे काही मी पाहिले, ते मी श्रीअरविंदांना सांगितले आणि विचारले त्या गोष्टी आविष्कृत होतील का? ते फक्त एवढेच म्हणाले, ‘हो.” आणि त्याक्षणी मला असे दिसले की, अतिमानसाने या पृथ्वीला स्पर्श केला आहे आणि ते प्रत्यक्षीभूत होण्यास प्रारंभ झाला आहे. जे सत्य आहे ते वास्तवात उतरविण्याची ताकद काय असते, ह्याचा पहिला अनुभव मला येथे पाहावयास मिळाला.

तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे येऊन असे म्हणाल की, “मला या मिथ्यत्वापासून सुटका करून घ्यावयाची आहे” आणि जर तुम्हाला ‘हो’ असे उत्तर मिळाले तर, तुमच्यामध्येही ते सत्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तीच शक्ती कार्यकारी होईल.

– श्रीमाताजी

श्रीअरविंदांच्या राजकीय कार्याने प्रभावित होऊन, क्रांतिकारक कार्य करण्याची परवानगी घेण्याच्या हेतूने, त्यांना पाँँडिचेरी येथे प्रथमच भेटावयास गेलेल्या श्री.अंबालाल पुराणी यांनी सांगितलेली ही हकिकत :

श्रीअरविंदांनी मला माझ्या साधनेविषयी विचारले.

मी म्हणालो, “साधना वगैरे ठीक आहे पण जोवर भारताला स्वातंत्र्य प्राप्त होत नाही तोवर मला इतर कशावरही लक्ष केंद्रित करणे अवघड आहे.”

तेव्हा श्रीअरविंद म्हणाले, “कदाचित भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकार्याची आवश्यकता भासणार नाही. जर भारत त्याशिवायच स्वतंत्र होणार असेल तर तुम्ही साधनेवर, योगावर लक्ष का केंद्रित करत नाही? भारताचा स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार पक्का झाला आहे आणि त्यामुळे त्या उद्दिष्टपूर्तीसाठी झटणारे पुष्कळ जण मिळतील पण योगाची हाक सर्वांनाच येत नाही. आणि जर तुम्हाला ती हाक आली आहे तर तुम्ही योगसाधनेवर लक्ष केंद्रित करणे योग्य नाही का?”

तेव्हा मी म्हणालो, “पण गेली दोन वर्षे माझे सारे लक्ष स्वातंत्र्यप्राप्तीकडे लागलेले आहे. ते मिळाल्याशिवाय मला सुखाची झोपदेखील लागणार नाही.”

माझ्या मन:चक्षूसमोर होते, एकेकाळी ज्यांनी भारतामध्ये प्रथमच संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होते ते श्री. अरविंद घोष. आणि तेच श्रीअरविंद आता पाँडिचेरीला योगसाधनेमध्ये निमग्न होते. श्रीअरविंद दोनतीन मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते, मग त्यांनी विचारले, ”भारत स्वतंत्र होणार आहे अशी खात्री तुम्हाला देऊ केली तर?”

तेव्हा मी म्हणालो, “पण मला अशी खात्री कोण देऊ शकेल?”

श्रीअरविंद माझ्याकडे पहात म्हणाले, “समजा मी दिली तर?”

मी म्हणालो, “जर तुम्ही मला खात्री दिलीत तर मी मान्य करेन.”

तेव्हा ते गंभीरपणे म्हणाले, “मग मी तुम्हाला खात्री देतो की, भारत स्वतंत्र झालेला असेल.”

दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा मी त्यांना विचारले, “खरंच तुम्हाला खात्री आहे?”

तेव्हा श्रीअरविंद गंभीर झाले आणि खिडकीतून पलीकडच्या अवकाशात पहात राहिले. नंतर माझ्याकडे पाहून समोरील टेबलावर आपली मूठ आपटत ते म्हणाले, “उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याइतकेच हे निश्चित आहे. निर्णय केव्हाच झाला आहे, तो प्रत्यक्षात उतरायला आता फार काळ लागणार नाही.”

आमची ही भेट झाली ते साल होते इ.स. १९१८. मी त्यांना वंदन करून शांतपणे बाहेर पडलो. दोन वर्षांनंतर प्रथमच मला सुखाची झोप लागली होती. *

(भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ऑल इंडिया रेडिओ वरून प्रसारित करण्यात आला. तो येथे देत आहोत.)

१५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस! भारतासाठी हा जुन्या युगाच्या अंताचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा संकेत आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर त्याचे मोल आशिया आणि अखिल विश्वासाठी देखील आहे. मानवतेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निर्धारित करण्यामध्ये ज्या शक्तीचा मोठा वाटा असणार आहे, अशा एका नव्या शक्तीचा, अकथित अशी क्षमता असलेल्या एका नव्या शक्तीचा, राष्ट्रसमूहांमध्ये प्रवेश होत असल्याचे हे द्योतक आहे.

माझ्या जीवनामध्ये ज्या जागतिक घडामोडी पाहता याव्यात अशी माझी मनीषा होती, जरी तेव्हा त्या स्वप्नवत वाटत होत्या तरी, त्या मला आजच्या ह्या दिवशी फळाला येताना दिसत आहेत वा त्यांची सुरुवात तरी झाली आहे किंवा त्या त्यांच्या परिपूर्तीच्या मार्गावरती तरी आहेत. या निमित्ताने, माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माझ्यामध्ये ज्या ध्येयांची, आदर्शाची रुजवण झाली होती, त्या ध्येयांचा, आदर्शाच्या सार्थकतेचा प्रारंभ झालेला मला दिसत आहे, अशी मी व्यक्तीश: उद्घोषणा करू शकतो; कारण ही ध्येयधोरणं भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ही ध्येयधोरणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारताचे भावी कार्य आहे, हे असे कार्य आहे की, जेथे भारताने नेतृत्व स्वीकारणे आवश्यकच आहे.

कारण मला नेहमीच असे वाटत आले आहे आणि तसे मी सांगत आलो आहे की, भारताचा उदय होतो आहे तो केवळ त्याचे स्वत:चे भौतिक हेतू म्हणजे त्याचा विस्तार व्हावा; महानता, शक्तिसामर्थ्य, समृद्धी ह्या गोष्टी त्याला साध्य व्हाव्यात म्हणून नाही, अर्थात त्याकडेही भारताने दुर्लक्ष करता कामा नये, किंवा इतरांप्रमाणे इतरेजनांवर प्रभुत्व संपादन करावे म्हणूनही भारताचा उदय होत नाहीये तर ईश्वरासाठी, या जगतासाठी, अखिल मानवी वंशाला साहाय्य करण्यासाठी, त्यांचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा उदय होतो आहे.

ही ध्येयं आणि आदर्श त्यांच्या स्वाभाविक क्रमाने अशी आहेत :
१) भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती.
२) आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान, मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे.
३) मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की, जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यत: ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल; ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल.
४) भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणारी साधने ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल.

भारत स्वतंत्र झाला आहे पण त्याला एकात्मता साध्य झालेली नाही, एक भंगलेले, विदीर्ण झालेले स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. एकवेळ तर असे वाटून गेले की, भारत पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या सत्तेपूर्वी जसा विभिन्न राज्याराज्यांमध्ये विभागलेला होता तशाच अराजकतेमध्ये जाऊन पडतो की काय. परंतु सुदैवाने हे विनाशकारी पुनर्पतन टाळता येईल अशी एक दाट शक्यता अलीकडे विकसित झाली आहे. संविधान सभेच्या समजुतदार, मूलगामी धोरणामुळे उपेक्षित वर्गाच्या समस्या ह्या कोणत्याही फाटाफूटीविना वा भेगाळल्याविना दूर होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु हिंदु आणि मुस्लीम यांतील जुने जातीय भेद हे देशाच्या दृष्टीने एका कायमस्वरूपी राजकीय भेदाभेदाची मूर्तीच बनून, दृढमूल झालेले दिसत आहेत. तोडगा निघालेली ही आत्ताची परिस्थिती हा कायमचाच उपाय आहे असे काँग्रेस आणि राष्ट्र धरून चालणार नाहीत किंवा एक तात्पुरता उपाय आहे, ह्या पलीकडे फारसे महत्त्व ते त्याला देणार नाहीत, अशी आशा आहे. कारण असे झाले नाही तर, भारत गंभीररित्या दुर्बल होईल, कदाचित लुळापांगळाही होईल. अंतर्गत कलहाची शक्यता तर कायमच भेडसावत राहील, किंवा कदाचित एखादे नवे आक्रमण वा परकीय सत्तेचा विजय अशा धोक्यांची शक्यताही संभवते.

या देशाची फाळणी नष्ट व्हायलाच पाहिजे. दोन्ही देशांमधील ताणतणाव कमी करून, शांती आणि सद्भाव यांविषयीच्या गरजेबद्दलची चढतीवाढती जाणीव बाळगून, एकत्रित आणि एकदिश होऊन केलेल्या कृतीची वाढती गरज लक्षात घेऊन, किंवा ह्याच हेतूसाठी अस्तित्वात आलेल्या एकात्मतेच्या साधनाद्वारे ही फाळणी नष्ट होईल अशी आशा बाळगता येईल.

कोणत्याही मार्गाने का असेना ही भेदात्मकता, ही फाळणी नाहीशी व्हायलाच पाहिजे आणि ती नाहीशी होईलच. कारण त्याविना भारताचे भवितव्य हे खरोखर दुर्बल आणि निराशाजनक असेल. परंतु ते कदापिही तसे असता कामा नये.

आशिया खंडाचा उदय होत आहे आणि या खंडातील बहुतांशी भाग हे स्वतंत्र झाले आहेत किंवा ह्या घडीला ते स्वतंत्र होत आहेत; त्यातील इतर काही अंकित भाग हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडत आहेत, लढा देत आहेत. अगदी थोड्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि त्या आज ना उद्या केल्या जातीलच. तेथे भारताला त्याची भूमिका पार पाडावीच लागेल आणि भारताने पूर्ण सामर्थ्यानिशी आणि क्षमतेनिशी ती भूमिका पार पाडायला सुरुवात देखील केली आहे; आणि त्यातून भारताच्या अंगी असणाऱ्या संभाव्यतेच्या मोजमापाचा आणि राष्ट्रसमूहांच्या समितीमध्ये तो जे स्थान प्राप्त करून घेईल त्याचा निर्देश होत आहे.

समग्र मानवजात आज एकात्म होण्याच्या मार्गावर आहे. तिची ही वाटचाल सदोषपूर्ण अशी, अगदी प्रारंभिक अवस्था ह्या स्वरूपात असली तरी, असंख्य अडचणींशी झगडा देत, परंतु सुसंघटितपणे तिची वाटचाल चालू आहे. आणि त्याला चालना मिळालेली दिसत आहे आणि इतिहासाचा अनुभव गाठीशी धरला, त्याला मार्गदर्शक केले तर विजय प्राप्त होत नाही तोवर ती गती अगदी अनिवार्यपणे वाढवत नेली पाहिजे. अगदी येथेसुद्धा भारताने त्याची महत्त्वाची भूमिका बजावयाला सुरुवात केली आहे, आणि केवळ सद्यकालीन तथ्यं आणि नजीकच्या शक्यता एवढ्यापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता भारत जर, भविष्याचा वेध घेऊ शकला आणि ते भविष्य निकट आणू शकला तर, आणि तसेच, एक व्यापक मुत्सद्देगिरी विकसित करू शकला तर मग, स्वत:च्या निव्वळ अस्तित्वानेही भारत, मंदगती व भित्रे तसेच धाडसी व वेगवान प्रगती करणारे यांच्यामध्येसुद्धा फरक घडवून आणू शकेल. यामध्ये एखादे अरिष्टसुद्धा येऊ शकते, हस्तक्षेप करू शकते वा जे काही घडविण्यात आलेले आहे त्याचा विध्वंसही करू शकते, असे घडले तरीसुद्धा अंतिम परिणामाची निश्चित खात्री आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये, एकत्रीकरण ही प्रकृतीच्या विकासाची एक आवश्यकता आहे, एक अपरिहार्य अशी हालचाल आहे आणि त्याच्या परिणामाविषयी, साध्याविषयी सुरक्षित भाकीत करता येणे शक्य आहे. एकत्रीकरणाची राष्ट्रांसाठी असलेली आवश्यकता पुरेशी स्पष्ट आहे, कारण त्याच्याशिवाय ह्यापुढील काळात छोट्या समूहांचे स्वातंत्र्य कधीच सुरक्षित राहू शकणार नाही आणि अगदी मोठी, शक्तिशाली राष्ट्रदेखील अबाधित राहू शकणार नाहीत. भारत, जर असा विभागलेलाच राहिला तर त्याला त्याच्या सुरक्षिततेची खात्री बाळगता येणार नाही. आणि म्हणूनच सर्वांच्या हितासाठी सुद्धा हे एकीकरण घडून यावयास हवे. केवळ मानवी अल्पमती आणि मूर्ख स्वार्थीपणाच ह्याला आडकाठी करेल.

एक आंतरराष्ट्रीय वृत्ती आणि दृष्टिकोन वाढीला लागावयास हवा; आंतरराष्ट्रीय रचना, संस्था ह्या वाढीस लागावयास हव्यात, राष्ट्रीयत्व तेव्हा स्वत:च परिपूर्ण झालेले असेल; अगदी दुहेरी नागरिकत्व किंवा बहुराष्ट्रीय नागरिकत्वासारख्या घडामोडीदेखील घडून येतील. या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये संस्कृतींचा ऐच्छिक संगमदेखील दिसू लागेल आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेमधील आक्रमकता नाहीशी झाल्याने, ह्या साऱ्या गोष्टी या एकात्मतेच्या स्वत:च्या विचारसरणीशी अगदी पूर्णत: मिळत्याजुळत्या आहेत, असे आढळून येईल. एकतेची ही नवी चेतना संपूर्ण मानवी वंशाचा ताबा घेईल.

ह्या विश्वाला भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. सतत चढत्यावाढत्या प्रमाणात भारताची आध्यात्मिकता युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही चळवळ वाढतच राहील. काळाच्या आपत्तींमध्ये भारताकडे जगाचे अधिकाधिक डोळे मोठ्या आशेने वळत आहेत. केवळ भारताच्या शिकवणुकीचाच नव्हे तर भारताच्या अंतरात्मिक आणि आध्यात्मिक साधनापद्धतींचाही ते उत्तरोत्तर अधिकाधिक आश्रय घेत आहेत. उर्वरित जे काही आहे ती अजूनतरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की, ज्याने भारतातील आणि पाश्चात्त्य देशांमधील पुरोगामी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर, मार्गामध्ये ज्या अडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक भीषण अडचणी या मार्गावर आहेत; परंतु अडचणी ह्या त्यांवर मात करण्यासाठीच असतात आणि जर ईश्वरी इच्छा तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच. येथे देखील, जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक जाणिवेतूनच उदयास यावयास हवे, यांमध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो. आणि त्याची व्याप्ती वैश्विक असणेच भाग आहे, त्याची केंद्रवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी मी हा आशय आपणापुढे मांडू इच्छितो. हा विचारांचा धागा पूर्णत्वास जाईल किंवा नाही, तो किती प्रमाणात पूर्णत्वास जाईल, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 474)

श्रीअरविंदांनी जेव्हा बडोद्यामधील प्राध्यापकपदाची नोकरी सोडून दिली तेव्हा साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटले. पण एक आनंदही होता की, त्यांचे आवडते शिक्षक हे आता देश पातळीवरील नेते बनलेले होते. श्री. कन्हैयालाल मुन्शी हे या विद्यार्थ्यांमधील एक होते. भारतीय संस्कृतीची पुनस्थापना करण्याच्या हेतूने त्यांनी पुढील काळात भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

मुन्शी विद्यार्थिदशेत असताना त्यांनी, प्राध्यापक श्रीअरविंद घोष यांना एक प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करीत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पर्वतराजी, नद्या, जंगले यासाऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक जितीजागती माता आहे या भावाने तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा.”

……ह्याच मुन्शीजींनी आपल्या साहित्यातून, वेदकाळातील सरस्वती नदीच्या किनारी वसणाऱ्या आर्यांचे जीवन चित्रित केले आहे. चाळीस वर्षांनंतर मुन्शीर्जीची श्रीअरविंदांशी पुन्हा भेट झाली. तेव्हा मुन्शीर्जीना श्रीअरविंदांचे पूर्णत: वेगळे रूप दिसून आले. ते रूप कसे होते ह्याचे वर्णन त्यांनी केले आहे, ” मी ज्यांचा मनोमन दूरून आदर करत असे ते माझे शिक्षक आता माझ्या समोर नव्हते, किंवा ज्यांच्या शिकवणुकीचा जीवनामध्ये मला वेळोवेळी उपयोग झाला होता ते मुनीवर्यही माझ्या दृष्टीसमोर नव्हते तर समोर एक एकसंध, परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. आसक्ती, प्रकोप, आणि भीती यांचे परिवर्तन शक्ती, सौंदर्य आणि शांतीमध्ये झाले होते. आर्य संस्कृतीची सारभूत कल्पनाच जणू मानवी रूपात मूर्त झाली होती.”

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

श्री अरविंद घोष यांना क्रांतिकार्यासाठी अटक करण्यात आली. तेव्हा ते काहीसे विचलित झाले. पुढील तीन दिवस तसेच निघून गेले; तेव्हा त्यांच्या अंतरंगातून आवाज आला, “थांब आणि काय होते ते पाहा.” मग ते काहीसे शांत, स्थिरचित्त झाले.

त्यांना तेथून अलीपूरच्या तुरुंंगात नेण्यात आले. त्यांना आठवले की, सुमारे महिन्याभरापूर्वीच त्यांना हातातील सर्व कामे बाजूला ठेवून एकांतवासात जाण्याचा आदेश मिळाला होता. पण प्राणप्रिय असलेल्या देशकार्यापासून ते स्वत:ला दूर करू शकले नव्हते. तेव्हा देवाने त्यांना सांगितले, “जी बंधने तोडण्याचे तुझ्यामध्ये सामर्थ्य नव्हते, ती बंधने मी तुझ्यासाठी तोडली आहेत. मला तू काही अन्य कार्य करणे अपेक्षित आहे.” श्रीअरविंदांच्या हाती भगवद्गीता देण्यात आली.

पुढे तुरुंगात फिरण्यासाठी म्हणून त्यांना सकाळी व संध्याकाळी अर्धा तास कोठडीबाहेर सोडण्यात येऊ लागले. ते जेव्हा त्या तुरुंगाच्या उंच भिंतीकडे पाहू लागले तेव्हा, तिच्या जागी त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले, कोठडीच्या बाहेर ते ज्या झाडाखाली फिरत असत तेथेही त्यांना जाणीव झाली की, ते झाड नसून वासुदेवच आहे. ते झोपत असत त्या कांबळ्यामध्ये तसेच तुरुंगाच्या गजांमध्येदेखील त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले. तुरुंग, त्यातील चोर, दरोडेखोर, खुनी या साऱ्यासाऱ्यांंमध्येही त्यांना त्याच एकमेवाद्वितीय वासुदेवाचे दर्शन घडले. त्यांच्या खटल्याची सुनावणी करण्यासाठी त्यांना मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले तेव्हा, तेथेही त्यांची तीच जाणीव टिकून होती. त्या मॅजिस्ट्रेटमध्येही त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले.

भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणत होते, “सर्व माणसांमध्ये माझा निवास असतो आणि त्यांच्या कृतीचे नियमन मी करतो. माझे संरक्षण अजूनही तुझ्यासोबत आहे, या खटल्याची सारी जबाबदारी माझ्यावर सोपव.”

…… श्री.अरविंद घोष यांना आलेला ‘वासुदेवः सर्वम् इति’ हा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.

आधार : (CWSA-08:05)

श्रीअरविंद भारतात आल्यानंतर, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. ‘इंदुप्रकाश’मध्ये त्यावर टीका करणारी “New Lamps for Old” ही लेखमाला त्यांनी लिहिली होती. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये, इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते; त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः इंग्रज सरकारचे!

तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्या. महादेव गोविंद रानडे यांनी “असे जहाल लिखाण लिहू नये,”असे संपादकांना सांगितले. तसे प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे, अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा श्रीअरविंदांनी राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली. तरीही शासनाची त्यांच्यावर वक्र दृष्टी राहिलीच.

‘वंदे मातरम्’ ह्या वृत्तपत्राच्या लेखनामध्ये श्रीअरविंदांचा हात आहे असा ब्रिटिश सरकारला संशय होता आणि त्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकार अगदी उत्सुक होते. श्रीअरविंदांच्या नावाने अटक वॉरंट निघाले, तेव्हा ते स्वतःच पोलिसांना शरण गेले.

या घटनेने आजवर गुप्तपणे कार्यरत असलेले श्रीअरविंद एका रात्रीत नेते म्हणून प्रसिद्धीस आले. तेव्हा भारतभरातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. ‘मराठा’ वृत्तपत्रात लो.टिळकांनी लिहिले, “कोणी सांगावे जे कृत्य आज राजद्रोह म्हणून गणले जात आहे, ते उद्या दैवी सत्य म्हणून गणले जाईल.”

दि.०८ सप्टेंबर १९०७ च्या अंकात रवीन्द्रनाथ टागोरांनी श्रीअरविंदांना अभिवादन करणारी कविता बंगालीतून लिहिली.

श्रीअरविंदांच्या विरुद्ध कोणताही आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे पुढे, त्यांची निर्दोष सुटका झाली. तेव्हा रवीन्द्रनाथ टागोर त्यांना भेटण्यास गेले आणि चेष्टेत म्हणाले, “काय हे? तुम्ही तर आम्हाला फसविलेत.”

तेव्हा श्रीअरविंद हसून म्हणाले, “तुम्हाला त्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.” आणि खरोखर, पुढे लवकरच म्हणजे ०२ मे १९०८ मध्ये श्रीअरविंदांना परत अटक करण्यात आली.

(Sri Aurobindo-a biography and a history by K.R.Srinivasa Iyengar)