Posts

मानसिक अस्तित्वाच्या आणि चैत्य प्राणाच्या शुद्धिकरणाच्या द्वारे, आध्यात्मिक मुक्तीसाठी लागणारी भूमी तयार करण्याचे काम केले जात असते – खरे तर शरीर आणि शारीरिक प्राण यांची शुद्धी देखील संपूर्ण सिद्धीसाठी आवश्यक असते पण तूर्तास शारीरिक शुद्धीचा प्रश्न आपण बाजूला ठेवू.

मुक्तीसाठी आवश्यक पूर्वअट आहे ती म्हणजे शुद्धी. सकल शुद्धी ही एक प्रकारची सुटका असते, मुक्ती असते; कारण शुद्धी म्हणजे बंधनात टाकणाऱ्या, बांधून ठेवणाऱ्या, अपूर्णता आणि गोंधळ यांनी अंधकार निर्माण करणाऱ्या गोष्टी फेकून देणे असते.

इच्छा-वासनांच्या शुद्धिमुळे चैत्य प्राणाची मुक्ती साध्य होते, चुकीच्या भावभावना आणि त्रासदायक प्रतिक्रिया यांच्या शुद्धीकरणातून हृदयाची मुक्ती साधली जाते. इंद्रिय-मनाच्या मळभ आणणाऱ्या संकुचित विचारांच्या शुद्धिकरणातून बुद्धीची मुक्ती साधली जाते आणि केवळ बौद्धिकतेच्या शुद्धीतून विज्ञानाची (Gnosis) मुक्ती साधली जाते. पण ह्या साऱ्या साधनभूत मुक्ती आहेत.

आत्म्याची मुक्ती ही अधिक व्यापक आणि अधिक मूलभूत स्वरुपाची असते; ही मुक्ती म्हणजे मर्त्यतेच्या मर्यादांमधून बाहेर पडून, चैतन्याच्या अमर्याद अशा अमर्त्यतेत खुले होणे असते.

काही विचारप्रणालींनुसार, मुक्ती म्हणजे सर्व प्रकृतीला नाकारणे, शुद्ध केवल अस्तित्वाची एक शांत स्थिती, निर्वाण किंवा विलोपन, आपल्या प्राकृतिक अस्तित्वाचे कोणत्यातरी अव्याख्येय अशा केवलामध्ये विलयन करणे हे होय. परंतु परमानन्दामध्ये निमग्न होऊन त्यातच राहणे, निष्क्रिय शांतीची विशालता, आत्म-विलोपनाद्वारे होणारी सुटका किंवा त्या ‘केवला’मध्ये स्वत:ला बुडवून टाकणे हे काही आमचे ध्येय नाही. फार फार तर, मुक्तीचा गर्भितार्थ आम्ही असा घेऊ शकतो की, आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी अपरिहार्य आणि सिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या प्रकारच्या सर्व अनुभवांमध्ये सामायिक असणारा आंतरिक बदल यातून दर्शविला जातो.

तेव्हा आपल्याला असे दिसून येईल की, मुक्तीमध्ये नेहमीच दोन गोष्टी अध्याहृत असतात – तिला नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन बाजू असतात – पहिली म्हणजे अस्वीकार करणे आणि दुसरी म्हणजे ग्रहण करणे. मुक्तीची नकारात्मक बाजू म्हणजे महत्त्वाच्या बंधांपासून सुटका, कनिष्ठ आत्म-प्रकृतीच्या प्रधान-गाठींपासून सुटका; तर सकारात्मक बाजू म्हणजे अधिक उच्चतर अशा अध्यात्मिक अस्तित्वाकडे उन्मीलित होणे किंवा त्या उच्चतर अस्तित्वामध्ये विकसित होणे.

पण ह्या प्रधान-गाठी आहेत तरी कोणत्या – मन, हृदय, चैत्य जीवनशक्ती ह्यांच्या साधनभूत गाठींच्या अधिक सखोल अशा वळणा-वाकणापेक्षा भिन्न अशा कोणत्या गाठी आहेत त्या? भगवद्गीतेमध्ये आपल्यासाठी त्यांचा निर्देश करण्यात आला आहे आणि इतकेच नव्हे तर, गीतेमध्ये त्यांचा वारंवार, जोरकसपणे उल्लेख केलेला आहे; त्या चार गोष्टी म्हणजे इच्छा-वासना, अहंकार, द्वैत, आणि प्रकृतीचे त्रिगुण; कारण गीतेनुसार, वासनारहितता, अहंकार-विरहितता, मन, आत्मा व चैतन्य यांचा समतोल आणि निस्त्रैगुण्य (त्रिगुणातीत) ह्या चार गोष्टी असणे म्हणजे स्वतंत्र असणे, मुक्त असणे होय. गीतेमधील हे वर्णन आपण स्वीकारायला हरकत नाही कारण ह्या विस्तृत वर्णनामध्ये सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश झालेला आहे.

मुक्तीची सकारात्मक बाजू म्हणजे, आत्म्यामध्ये वैश्विकता असणे, ईश्वराच्या चैतन्याशी विश्वातीत ऐक्य साधणे, सर्वोच्च दिव्य प्रकृतीने संपन्न असणे – म्हणजे असे म्हणता येईल की, ईश्वरासारखे होणे किंवा आपल्या अस्तित्वाच्या कायद्याने त्याच्याशी एकत्व पावणे. मुक्तीचा संपूर्ण व सर्वांगीण अर्थ हा असा आहे आणि चैतन्याची परिपूर्ण मुक्ती देखील ह्यातच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 674-675)