Posts

विचार शलाका – २४

शरीराकडे ते जणू प्रेत आहे असे समजून पाहाणे, हे संन्यासवाद्यांचे लक्षण आहे. हा निर्वाणाचा मार्ग आहे. ही संकल्पना ऐहिक जीवनाच्या संकल्पनेशी मिळतीजुळती नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असला पाहिजे, चैतन्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच तो शरीरामध्येही असला पाहिजे. देह हा चैतन्याने बनलेला असतो, त्यामुळे देह हा देखील ‘ईश्वरा’चेच रूप आहे. मी या विश्वातील सर्व वस्तुमात्रांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहतो. येथील सर्व काही हे ‘ब्रह्म’च आहे, ‘वासुदेव’, ‘ईश्वर’ हाच सर्व काही आहे, (सर्वम् इदम् ब्रह्म, वासुदेवं सर्वमिति) ही दृष्टी वैश्विक आनंद मिळवून देते. आनंदाच्या सघन लहरी अगदी शरीरामधूनही उठत राहतात. या अवस्थेत, आध्यात्मिक भावनेने भरलेले असतानासुद्धा, व्यक्ती हे ऐहिक जीवन, वैवाहिक जीवन जगू शकते. प्रत्येक कृतीमध्ये व्यक्तीला दिव्यत्वाचा आनंददायी आत्माविष्कार आढळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 367)

प्रश्न : माणसं जर मृत्यूच पावली नाहीत, तर वाढत्या वयाबरोबर त्यांचे शरीर निरूपयोगी होणार नाही का?

श्रीमाताजी : नाही, तुम्ही चुकीच्या बाजूने पाहात आहात. त्यांच्या शरीराचा ऱ्हास झाला नाही तरच ते मृत्युपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतील. शरीराचा ऱ्हास होतो त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांचे शरीर निरुपयोगी होते त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांना मृत्यू नको असेल तर, त्यांचे शरीर निरुपयोगी होता कामा नये… शरीराचा ऱ्हास होतो, प्रकृती खालावत जाते आणि नंतर पूर्णतः त्याला उतरती कळा लागून, अंतीमत: ते नाश पावते म्हणूनच मृत्यू आवश्यक होऊन बसतो. परंतु शरीरानेसुद्धा अंतरात्म्याच्या (Inner being) प्रगमनशील वाटचालीचे अनुसरण केले, चैत्य पुरुषाला (Psychic being) असते तशीच प्रगतीची आणि पूर्णत्वाची जाणीव शरीरालासुद्धा झाली तर, शरीर मृत पावण्याची कोणतीच आवश्यकता उरणार नाही. वय वाढत गेले म्हणून शरीराचा ऱ्हास होण्याचे काहीच कारण नाही. प्रकृतीचा हा केवळ एक नित्य-परिपाठ, सवय आहे. ‘सद्यस्थिती’त जे काही घडत आहे, त्याचा हा एक केवळ परिपाठ आहे. आणि नेमके हेच मृत्युचे कारण आहे.

…जर शरीर टिकून राहायचे असेल तर, त्याचा ऱ्हास होता कामा नये. तेथे क्षीणता असताच कामा नये. त्याने या एका बाजूवर विजय प्राप्त करून घेतला पाहिजे, तो म्हणजे, त्याचा ऱ्हास न होता, त्याचे रूपांतर झाले पाहिजे. त्याचा जर ऱ्हास होणार असेल तर अमर्त्यत्वाची शक्यताच उरत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 111-115)

मृत्युला त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व नाही, तर मृत्यू म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या ऱ्हासकारक तत्त्वाचा केवळ परिणाम आहे. आणि ते तत्त्व आधीपासूनच तेथे अस्तित्वात असते – ते जडभौतिक प्रकृतीचाच एक भाग आहे. परंतु त्याच बरोबर, मृत्यू अटळ आहे, असेही नाही. एखाद्याकडे जर आवश्यक ती चेतना आणि ती शक्ती असेल तर, शरीराचा -हास आणि मृत्यू अटळ नाहीत.

परंतु, ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विनाशकारक तत्त्वच समूळ नाहीसे होईल अशा रितीने, ती चेतना आणि ती शक्ती समग्र जडभौतिक प्रकृतीमध्ये उतरविणे, ही सर्वाधिक कठीण गोष्ट आहे.

*

विकासक्रमामध्ये (evolution) मृत्यू आवश्यक आहे कारण शरीर याहून अधिक प्रगती करू शकत नाही – चेतनेची जी प्रगती किंवा विकास चालू आहे त्यासाठी हे शरीर यापुढे साधन म्हणून पुरे पडू शकणार नाही. – त्यामुळे चेतनेला तिचे शारीरिक साधन बदलून नवे साधन धारण करावे लागेल. आत्म्याचे विकासानुगामी साधन (plastic instrument) बनावे यासाठी शरीरामध्ये काही उतरविता आले तर मग मृत्यूची आवश्यकताच शिल्लक राहणार नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 310-311), (CWSA 28 : 310)

प्रश्न : शारीरिक देह हा संरक्षण म्हणून कशा रितीने कार्य करतो?

ज्या जडतेबद्दल आपण आपल्या देहाला नावं ठेवत असतो त्या त्याच्या जडतेमुळेच हा शारीरिक देह संरक्षणाचे काम करत असतो. शरीर सुस्त, असंवेदनशील, निबर, अलवचीक आणि कठीण असते; बाजूने मजबूत तटबंदी असलेल्या गडकोटाप्रमाणे ते असते. तर प्राणिक जगत मात्र द्रवरूप असते, त्यातील गोष्टी प्रवाही असतात, त्या एकमेकांत मिसळत असतात, त्या परस्परांमध्ये प्रविष्ट होत असतात; समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे अखंडपणे एकमेकींमध्ये मिसळत असतात, बदलत असतात, त्यांची घुसळण होत असते त्या लाटांप्रमाणे हे सारे असते. तुम्ही जर अतिशय शक्तिशाली अशा आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने या प्राणिक जगताचा विरोध करू शकला नाहीत तर, त्याच्या या प्रवाहीपणासमोर तुम्ही संरक्षणविहीन असता; अन्यथा ते तुमच्यामध्ये आतपर्यंत जाऊन मिसळते आणि त्या आक्रमक प्रभावाला थोपवू शकेल असे तुमच्याकडे काहीच नसते. परंतु देह हस्तक्षेप करतो, देह तुम्हाला प्राणिक जगतापासून तोडतो, अलग ठेवतो. त्या जगताच्या शक्तींच्या पूरापासून रोखणारा देह म्हणजे जणू एक धरणच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 48)

आपल्याला असे आढळून येते की, जर आपण प्रयत्न केला तर, मनामध्ये शरीरापासून अलग होण्याची शक्ती आहे. मन शरीरापासून केवळ कल्पनेनेच नव्हे, तर कृतीनेही अलग होऊ शकते; शरीरापासून ते भौतिक दृष्टीने, किंबहुना प्राणिक दृष्टीनेही अलग होऊ शकते.

शरीरविषयक गोष्टींसंबंधी एक प्रकारची अलिप्त वृत्ती धारण करून, मनाच्या या अलगपणाला आपण ही बळकटी दिली पाहिजे. शरीराचे झोपणे किंवा जागे राहणे या गोष्टींना अनाठायी महत्त्व दिल्यामुळे, त्याच्याबद्दल निष्कारण वाटणारी काळजी आपण सोडून दिली पाहिजे; शरीराचे हालणे-चालणे किंवा विसावा घेणे, शरीराचे सुख किंवा दुःख, त्याचे आरोग्य किंवा अनारोग्य, त्याचा जोर किंवा थकवा, त्याचा आराम किंवा अस्वस्थता यासंबंधाने काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे; शरीर काय खातेपिते यासंबंधानेही काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे. आपण आपले शरीर सुस्थितीत ठेवू नये असा ह्याचा अर्थ नव्हे; परंतु अतिरेकी संन्यासी व्रते आपण टाळली पाहिजेत; शरीराची जाणूनबुजून हेळसांड करणे हेसुद्धा आपण टाळले पाहिजे.

इत्यर्थ असा की, आपण भूक, तहान, अस्वस्थता, अनारोग्य या शरीराच्या अवस्थांमुळे आपल्या मनाचा क्षोभ होऊ देऊ नये; शारीरिक आणि प्राणिक प्रवृत्तीचा माणूस शरीरविषयक गोष्टींना जे महत्त्व देतो, ते आपण देऊ नये. द्यायचेच असेलच तर, त्याला दुय्यम स्थान द्यायला हरकत नाही आणि तेही, शरीराचा ‘साधन’ म्हणून उपयोग आहे हे लक्षात ठेऊनच ! शरीर एक साधन आहे म्हणून जे महत्त्व त्याला द्यावयाचे तेही मर्यादित ठेवावे, ते फुगवून त्याला निकडीच्या गोष्टींचे स्वरूप येईल असे करता कामा नये. उदाहरणार्थ, आपण काय खातोपितो यावर मनाची शुद्धता अवलंबून असते अशी वृथा कल्पना आपण करू नये. (एक मात्र खरे की, काही एका अवस्थेमध्ये खाण्यापिण्यासंबंधी नियंत्रणे आपल्या आंतरिक प्रगतीसाठी उपकारक ठरतात.) तसेच, आपले मन वा जीवन केवळ खाण्यापिण्यावरच अवलंबून असते, अशी वृथा कल्पनाही आपण बाळगता कामा नये.

खाणेपिणे ही फक्त एक सवय आहे, निसर्गाने लावलेली ती व्यवस्था आहे; प्रकृतीने मन किंवा प्राण व खाद्यपेय यांजमध्ये एक संबंध निर्माण करून, तो रूढ केला आहे इतकेच; त्यामुळे त्यापेक्षा त्याला अधिक काही मूल्य आहे असे समजण्याची गरज नाही.

वस्तुत: मानसिक व प्राणिक अस्तित्वाच्या उर्जेमध्ये, कोणत्याही प्रकारे घट न होऊ देता, नव्या पद्धतीने, सध्याच्या सवयीच्या उलट पद्धतीने, अन्नसेवनाचे प्रमाण आपण किमान पातळीवर आणू शकतो.

परंतु त्याहीपेक्षा, विवेकपूर्ण प्रशिक्षणाने, मन व प्राण यांना, शारीरिक पोषणाच्या किरकोळ मदतीवर विसंबून ठेवण्यापेक्षा, त्यांचा ज्यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध आहे अशा, मानसिक व प्राणिक शक्तीच्या गुप्त झऱ्यांवर विसंबून राहण्याचे प्रशिक्षण देऊन, त्यांना उर्जेच्या अधिक मोठ्या स्त्रोतांकडे वळविता येणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 343-344)