Tag Archive for: व्यावहारिक जीवन

विचार शलाका – ०७

अहंकार स्वत:चा अधिकार सोडण्यास नकार देतो त्यामुळेच जीवनात नेहमी सर्व तऱ्हेची कटुता येते.

*

सारे जे काही घडत असते, ते आपल्याला केवळ एकमेव धडा शिकविण्यासाठीच घडत असते; तो म्हणजे, जर आपण अहंकाराचा त्याग केला नाही तर शांती ना आपल्याला मिळेल, ना इतरांना! आणि तेच, जीवन जर अहंकारविरहित असेल तर तो एक अद्भुत चमत्कार ठरतो.

*

अहंकाराच्या लीलेविना कोणतेही संघर्ष झाले नसते. आणि नाटके करण्याची प्राणाची प्रवृत्ती नसती तर जीवनात नाट्यमय घटनाही घडल्या नसत्या.

*

तुमच्या अडचणींच्या प्रमाणावरूनच तुम्हाला किती अहंकार आहे ते तुमचे तुम्हाला कळते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 257-258)

विचार शलाका – ०५

कण्हणेविव्हळणे, रुदन करणे अशा गोष्टींमध्ये पृष्ठस्तरावरील प्रकृतीला आनंद मिळत नाही – पण तिच्या आत असे काहीतरी असते की जे, हसू आणि आसू, आनंद व दुःख, मौजमजा व वेदना यांच्या लीलेमध्ये – वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर, या अज्ञानाच्या लीलेमध्ये रस घेते. काही माणसांमध्ये ते काही प्रमाणात पृष्ठभागावरच दिसून येते. जीवनातील दु:खभोगापासून संपूर्ण सुटकेचा प्रस्ताव जर तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलात, तर त्यांच्यातील बहुतेक जण तुमच्याकडे साशंकपणे बघू लागतील. कारण ‘आनंद’, शांती, समाधान यांव्यतिरिक्त जीवनात काहीच नसेल, तर तसे जीवन त्यांना भयंकर कंटाळवाणे वाटेल – अनेकांनी तर तसे बोलूनही दाखविले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 178-179)

विचार शलाका – ०१

दुःखभोग हे आपल्या पापकर्माची किंवा आपल्यातील वैरभावाची शिक्षा म्हणून आपल्या वाट्याला येतात असे नाही – तसे समजणे ही चुकीची कल्पना आहे. अज्ञानदशेतील जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून जसे सुख किंवा सुदैव अनुभवास येते त्याप्रमाणेच दुःखभोग देखील वाट्यास येतात. आपल्याला आपल्या सत्यचेतनेपासून आणि परमेश्वरापासून विलग करणाऱ्या अज्ञानाचे अटळ परिणाम म्हणजे हर्ष-वेदना, आनंद-दुःख, सुदैव-दुर्दैव ही द्वंद्वे होत. केवळ परमेश्वराकडे परतण्यानेच दुःखभोगापासून आपली सुटका होऊ शकते. गतजन्मांतील कर्म अस्तित्वात असतात आणि बव्हंशी जे घडते ते त्यामुळेच; पण सर्वच गोष्टी काही त्याचे परिणाम नसतात. कारण आपण आपल्या स्वतःच्या चेतनेने आणि प्रयत्नांनी आपल्या कर्मांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. ज्याप्रमाणे भाजणे हा आगीशी खेळण्याचा स्वाभाविक परिणाम असतो त्याप्रमाणे दुःखभोग हा आपल्या गतकालीन प्रमादांचा निव्वळ स्वाभाविक परिणाम असतो; दुःखभोग ही आपल्या गतकालीन प्रमादांची शिक्षा नसते. अशा काही अनुभवाच्या माध्यमातून, जीव हा त्याच्या साधनांद्वारे शिकत असतो आणि जोपर्यंत तो परमेश्वराकडे वळण्यास तयार होत नाही, तोपर्यंत तो विकसित होत राहतो, वृद्धिंगत होत राहतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 670)

सद्भावना – ३०

जोवर तुमच्यामध्ये दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता.

तुम्ही कायमच तुमच्या हृदयात सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि प्रगाढ शांतीने आणि समतेने त्यांचा सर्वांवर वर्षाव केला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 191)

सद्भावना – २९

साधे असणे खूप चांगले असते, फक्त सदिच्छा बाळगायची, आपल्याला करता येणे शक्य असेल ती उत्तमातील उत्तम गोष्ट आपण करायची आणि ती गोष्ट शक्य तेवढ्या सर्वोत्तम रीतीने करायची. त्यासाठी फार वेगळे असे काही करण्याची गरज नाही; फक्त प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची. आणि आपण काय केले पाहिजे आणि आपण कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या विश्वातील सारे काही जो जाणतो त्या ‘ईश्वरा’लाच घेऊ द्यायचा, हे किती छान आहे! मग आपल्याला कोणतीच चिंता उरत नाही, आणि मग आपण अगदी पूर्णपणे आनंदी राहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 248)

सद्भावना – २८

एखादी गोष्ट चुकीची आहे हे माहीत नसताना जर ती गोष्ट तुमच्याकडून घडली असेल तर, तेव्हा तुम्ही ती चूक अज्ञानापोटी केलेली असते आणि म्हणून हे साहजिकच आहे की, नंतर जेव्हा तुम्हाला ती गोष्ट चुकीची होती हे समजते, आणि जेव्हा तुमचे अज्ञान नाहीसे झालेले असते तसेच तुमच्यापाशी सद्भाव असतो तेव्हा, तुम्ही तीच चूक परत करत नाही, आणि एवढेच नाही तर, ज्या परिस्थितीत ती चूक पुन्हा घडण्याची शक्यता असते त्या परिस्थितीतूनच तुम्ही बाहेर पडलेले असता.

पण अमुक एक गोष्ट चुकीची आहे हे तुम्हाला माहीत असूनही, जेव्हा तुम्ही ती चूक करता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्यामध्ये कुठेतरी, काहीतरी अशी विकृती आहे की, जिने गोंधळ किंवा दुरिच्छा यांची निवड केलेली असते. किंबहुना, तिने ईश्वर-विरोधी शक्तींच्या बाजूने राहण्याची जाणूनबुजून निवड केलेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306)

सद्भावना – २१

व्यक्तीने अगदी दक्ष आणि पूर्णपणे स्व-नियंत्रित असले पाहिजे, पूर्ण धीरयुक्त असले पाहिजे आणि कधीही अपयशी न होणारी सद्भावना तिच्याकडे असली पाहिजे. व्यक्तीकडे विनम्रतेची अगदी छोटीशी मात्रा का असेना, पण व्यक्तीने तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि स्वतःकडे असलेल्या प्रामाणिकतेवर कधीच संतुष्ट असता कामा नये. व्यक्तीला नेहमीच अधिकाची आस असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 440)

सद्भावना – २०

विद्यार्थ्यांसमोर आदर्श उदाहरण ठेवा. ते जसे घडावेत असे तुम्हाला वाटते तसे आधी तुम्ही स्वतः बना. तुम्ही निरपेक्षपणाचे, सहनशीलतेचे, आत्म-नियंत्रणाचे, स्वतःच्या छोट्याछोट्या वैयक्तिक नापसंतींवर मात करण्याचे, सातत्यपूर्ण चांगल्या खेळकर विनोदाचे, सातत्यपूर्ण सद्भावनेचे, इतरांच्या अडचणी समजून घेण्याचे उदाहरण त्यांच्या नजरेसमोर ठेवा; स्वभावातील समत्वाचे उदाहरण त्यांना घालून द्या की, ज्यामुळे मुलं भयमुक्त होतील. भीतीमुळेच ती कपटी, अप्रामाणिक आणि इतकेच काय पण धूर्तसुद्धा बनतात, आपल्याला शिक्षा होईल या भीतीने ती तशी बनतात. मात्र तुमच्याबद्दल जर त्यांना विश्वास वाटला तर ते तुमच्यापासून काहीही लपविणार नाहीत आणि मग ते निष्ठावान व प्रामाणिक व्हावेत यासाठी तुम्ही त्यांना साहाय्य करू शकाल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासमोर आदर्श उदाहरण ठेवले पाहिजे! श्रीअरविंद त्याविषयी म्हणतात, व्यक्तीमध्ये सर्व परिस्थितीत अविचल राहील अशी चांगली विनोदबुद्धी असली पाहिजे, स्वतःला विसरून जाण्याची क्षमता असली पाहिजे; व्यक्तीने स्वतःच्या छोट्याछोट्या त्रासदायक गोष्टी इतरांवर लादता कामा नयेत, व्यक्ती दमलेली असेल किंवा अस्वस्थ असेल, तेव्हासुद्धा तिने चिडचिडे, अधीर होता कामा नये. यासाठी काहीशा पूर्णत्वाची, आत्म-नियंत्रणाची आवश्यकता असते, की जे साक्षात्काराच्या मार्गावरील एक मोठे पाऊल असते. खरा अग्रणी (leader) बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या अटींची परिपूर्ती जो कोणी करेल, मग भलेही तो लहान मुलांच्या एखाद्या छोट्याशा गटाचा नायक का असेना, तो योगसिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनेबाबत पुष्कळच प्रगत झालेला असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 81)

सद्भावना – १९

जीवन योग्य पद्धतीने जगणे ही एक अतिशय अवघड कला आहे आणि व्यक्तीने अगदी लहान असतानाच ती कला शिकायला प्रारंभ केला नाही, आणि तसे वागण्याचा प्रयत्न केला नाही तर, व्यक्तीला ती कला कधीच चांगल्या प्रकारे अवगत होत नाही. स्वतःच्या शरीराचे आरोग्य सुस्थितीत राखणे, मन शांत ठेवणे आणि अंतःकरणामध्ये सद्भावना बाळगणे – या गोष्टी चांगले जीवन जगण्यासाठी अपरिहार्य आहेत – सुखदायी जीवन जगण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत असे मी म्हणत नाही, किंवा असामान्य जीवन जगण्यासाठी त्या आवश्यक आहेत असेसुद्धा मी म्हणत नाहीये, केवळ योग्यप्रकारे जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या गोष्टी आहेत. आपल्या मुलांना हे शिकविण्याची काळजी घेणारे कितीजण असतील, याची मला शंकाच आहे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 152)

सद्भावना – १८

अहंकारावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचा पाया झाला पाहिजे, विशेषतः जे जबाबदारीच्या पदांवर आहेत आणि ज्यांना इतरांची काळजी घ्यावी लागते अशांच्या बाबतीत तर त्याची अधिकच आवश्यकता असते. जो प्रमुख आहे त्याने नेहमी उदाहरण घालून दिले पाहिजे, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून ते ज्या गुणांची अपेक्षा बाळगतात ते गुण प्रमुखांनी नेहमीच स्वतः आचरणात आणले पाहिजेत. पदाधिकारी हे समजूतदार, सहनशील, चिकाटी असणारे, सहानुभूती असणारे आणि प्रेमळ, मैत्रीपूर्ण सद्भावना असणारे असले पाहिजेत. अहंभावातून स्वतःसाठी मित्र जिंकणारे नकोत तर, दयाळूवृत्तीने, इतरांना समजून घेण्याच्या आणि मदत करण्याच्या भूमिकेतून मित्र संपादन करणारे असावेत. खरा नेता बनण्यासाठी स्वतःला विसरणे, स्वतःच्या आवडीनिवडी आणि अग्रक्रम विसरणे या गोष्टी आवश्यक असतात.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 164)