Posts

कर्म आराधना – ५१

व्यावहारिक कर्म आपल्या योगाशी विसंगत नाही. शांती आणि ज्ञानाच्या आधारावर कर्म चालू राहिले पाहिजे. ते जाणीवपूर्वक आणि शांतचित्ताने केलेले असले पाहिजे. ज्यामध्ये खूप लोकांचा संबंध नाही, जे काम एकट्याने पूर्ण करणे शक्य आहे अशा प्रकारचे एखादे काम व्यक्ती हाती घेऊ शकते. उदाहरणार्थ, तशा प्रकारचे एखादे बौद्धिक काम किंवा एखादे शारीरिक काम हे या योगामध्ये करता येऊ शकते. अशी एक वेळ येऊ शकते की, जेव्हा सर्व कामधाम सोडून द्यावे लागेल; पण अशा स्थितीची उपयुक्तता तात्कालिक असते. त्या कालावधीमध्ये व्यक्तीने प्रकर्षाने एकाग्रतापूर्ण साधना केली पाहिजे.

दुसरी गोष्ट अशी की, व्यक्ती जेव्हा चेतनेच्या दुसऱ्या स्तरावर उन्नत होते तेव्हा तिचा समग्र दृष्टिकोनच बदललेला आहे, असे तिला आढळून येते. या अवस्थेमध्ये ती आधीचे बौद्धिक काम पूर्वीप्रमाणेच पुढे कायम करू शकेल असे नाही. उच्चतर चेतना कार्य करण्यास सुरुवात करेपर्यंत व्यक्तीला वाट पाहावी लागते. अर्थात, एकदा का व्यक्तीचे समग्र व्यक्तित्व रूपांतरित झाले की, तिला जीवनाच्या सर्व स्तरांचा स्वीकार करावा लागतो आणि उच्चतर चेतनेचे या जीवनात आविष्करण करावे लागते.

– श्रीअरविंद
[Evening talks : 179-180]