Posts

पूर्णयोग आणि बौद्धमत – १०

धम्मपद : तुम्ही स्वत:ला निष्काळजी बनू देऊ नका, किंवा इंद्रियोपभोगामध्येही रममाण होऊ नका. जो सावधचित्त आहे आणि ज्याने आपले चित्त ध्यानमग्न केले आहे, त्याला परमानंद प्राप्त होतो.

श्रीमाताजी : असावधानता ह्याचा खरा अर्थ म्हणजे, इच्छाशक्तीची शिथिलता की, ज्यामुळे व्यक्ती तिचे उद्दिष्ट विसरून जाते आणि जे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे त्यापासून दूर नेणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ व्यर्थ खर्च करते. त्यामुळे ती व्यक्ती एकप्रकारे मार्गात एकाच जागी थांबून राहते आणि बरेचदा तर ही शिथिलता व्यक्तीला मार्गापासून परावृत्त करते. अभीप्सेची ज्वालाच भिक्षूच्या असावधानतेचा निरास करते. दर क्षणाला त्याला ह्या गोष्टीची आठवण असते की, त्याच्या हाती असलेला अवधी अगदी अल्प आहे, त्यामुळे क्षणभरदेखील वेळ वाया न घालविता, शक्य तितक्या त्वरेने मार्गक्रमण केले पाहिजे. आणि जो अशा रीतीने सावध आहे, जो वेळ वाया घालवीत नाही, त्याच्यावरील सर्व बंधने, लहानमोठी सर्व बंधने एकापाठोपाठ एक गळून पडताना त्याला दिसतात. त्याच्या सर्व अडीअडचणी या सावधानतेमुळे नाहीशा होतात. आणि त्याचा हा दृष्टिकोन जर असाच कायम राहिला, आणि त्यातच त्याला संपूर्ण समाधान गवसू लागले तर, कालांतराने त्याला या सावधानतेतच इतका प्रगाढ आनंद अनुभवायला मिळतो की, लवकरच अशी वेळ येते की, जेव्हा तो सावधचित्त नसतो तेव्हा, त्याला चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागते, त्याला अस्वस्थ वाटू लागते.

ही वस्तुस्थिती आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती वेळ व्यर्थ न घालविण्याचा प्रयत्न करू लागते, तेव्हा वाया घालविलेला प्रत्येक क्षण हा तिच्यासाठी दुःखदायक असतो आणि त्यात तिला कोणताही आनंद लाभत नाही. आणि एकदा का तुम्ही या अवस्थेप्रत जाऊन पोहोचलात, प्रगती आणि रूपांतरणासाठीचे प्रयत्न ही तुमच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट बनली, तुम्ही तिचाच सातत्याने विचार करू लागलात, तर खरोखरच तुम्ही शाश्वत अस्तित्वाच्या, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याच्या मार्गावर आहात, असे समजायला हरकत नाही.

या आंतरिक विकासाच्या वाटचालीमध्ये एक क्षण असा निश्चितपणे येतो की, जेव्हा एकाग्रता साधण्यासाठी, ध्यानामध्ये, चिंतनामध्ये निमग्न होण्यासाठी आणि सत्यशोधनासाठी व त्याचे सर्वोत्तम आविष्करण करण्यासाठी – ज्याला बुद्धमार्गी लोक ‘ध्यान’ म्हणतात – ते करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत तर उलट, त्यामध्ये एक प्रकारची विश्रांती, आनंद, सुटकेचा मोकळा श्वास अनुभवास येतो आणि त्या अवस्थेमधून बाहेर पडून, ज्या गोष्टी खरोखरीच आवश्यक नाहीत, अशा गोष्टी करण्यासाठी वेळ खर्च करावा लागणे, यामध्ये वेळेचा अपव्यय आहे असे त्याला वाटू लागते; त्या गोष्टी त्याच्यासाठी भयंकर वेदनादायक वाटू लागतात. सर्व प्रकारच्या बाह्य गतिविधी, कृती ह्या अगदी अनिवार्यपणे आवश्यक अशा गोष्टींपुरत्याच सीमित होऊन, ईश्वरोपासना म्हणून केलेल्या कृतींपुरत्याच त्या शिल्लक राहतात. व्यर्थ, निरुपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टी, ज्या गोष्टी निश्चितपणे काळाचा व प्रयत्नांचा अपव्यय करणाऱ्या आहेत, त्या सर्व गोष्टी, तीळमात्रही समाधान देत नाहीत तर, उलट असमाधान व थकवा उत्पन्न करतात. जेव्हा तुमचे लक्ष त्या एकमेव उद्दिष्टावर केंद्रित झालेले असते तेव्हाच तुम्हाला आनंद वाटतो. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मार्गावर आहात, असे समजावे.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 209)