अजून काही आंतरिक संघर्षदेखील असतात. ती भांडणे असतात. तुमच्याच विविध भागांमध्ये परस्परांमध्ये आंतरिक संघर्ष असतो. समजा, एकाचवेळी तुमच्यातील एखाद्या भागाला विश्रांती आवश्यक असते आणि दुसऱ्या एखाद्या भागाला काम करावेसे वाटत असते अशावेळी, तुम्ही हे प्रकरण कसे हाताळणार? (आणि हे असे बरेचदा घडते) ते भांडायला सुरुवात करतात. एकाला जे हवे आहे ते तुम्ही केलेत, तर त्याला दुसरा विरोध करतो. आणि अशावेळी तुम्हाला त्यांच्यामध्ये सुसंवाद राखायचा झाला तर, तुम्हाला मध्यम मार्ग शोधून काढावा लागतो.
आणि कधीकधी तर असेही होते की, जर तुम्ही या शारीरिक गोष्टींमध्ये अजून प्राणिक आणि मानसिक गोष्टींची भर घातलीत, (मी कल्पना करत बसणाऱ्या मनाविषयी किंवा स्वतंत्र अशा प्राणाविषयी बोलत नाहीये. मी शरीराच्याच मानसिक आणि प्राणिक भागांविषयी बोलत आहे. कारण एक शारीरिक प्राण आणि शारीरिक मन देखील असते; आणि हे शारीरिक मन व शारीरिक प्राण हे सर्वात वाईट असतात, त्यांचे संघर्ष सदासर्वकाळ चालूच राहतात आणि त्यांना थांबविण्यामध्येच तुम्हाला खूप जास्त कष्ट पडतात – ते चालूच राहते, चालूच राहते.)
जर त्यांच्यामध्ये काही वादविवाद असतील, म्हणजे मन, प्राण आणि शरीर यांमध्ये जर काही संघर्ष असतील तर, तुमच्या स्वतःमध्येच एक रणक्षेत्र असते. आणि हे रणक्षेत्रच मग सर्व संभाव्य आजारांचे निमित्तकारण ठरते. ते खूप आक्रमकपणे मारामारी करतात. एकाला एक हवे असते, दुसऱ्याला ते नको असते, मग ते भांडणं करतात आणि तुमची अवस्था जणु काही एखाद्या आंतरिक वादळामध्ये सापडल्यासारखी होते. त्यातून तुम्हाला ताप येऊ शकतो किंवा मग तुम्हाला आतूनच थंडी वाजायला लागते आणि मग त्यावर तुमचे काहीच नियंत्रण राहत नाही.
शारीरिक आजारपणाची जी अनेकविध कारणे आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कारण कोणते असेल तर ते हे की, शरीर अस्वस्थ होऊ लागते, ते भयकंपित व्हायला लागते आणि मग ही भीती वाढत जाते, अधिकाधिक वाढत जाते आणि मग तुम्हाला असे वाटू लागते की, तुम्हाला कधीच परत समतोल प्रस्थापित करता येणार नाही, यामुळे तुमची फसवणूक होते. अशा परिस्थितीत त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरून विसंवाद आहे हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे, आणि तुमच्यामधीलच या लोकांचा एकमेकांशी ताळमेळ कसा घालायचा हे तुम्हाला कळले पाहिजे. हे सारे ‘कार्यप्रणालीतील असमतोल’ असतात.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)