Posts

समर्पण – ०८

(खरे समर्पण आणि तामसिक समर्पण यातील फरक श्रीअरविंद येथे स्पष्ट करत आहेत.)

साधकांकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. जर या गोष्टी साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यायोगे येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे समर्पण. आणि या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते ते म्हणजे खात्री, विश्वास आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य राखणे.

अभीप्सा मावळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले, तर त्याचा अर्थ असा की, साधक तेथे स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे – त्याचा अर्थ असा होईल की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा मला आता आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली तर तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?” उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. तोपर्यंत, मला जरी श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्ण सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्याबाबतीत नैराश्यदेखील काही करू शकत नाही; नैराश्य जर का आलेच तर त्यालाच अपयशी होऊन परतावे लागते.

“मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे, अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते तामसिक समर्पण असते. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. एक दृष्टिकोन (तामसिक समर्पणाचा) काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा आहे, आणि अन्य दृष्टिकोन साधकाचा आहे. असा साधक सर्वोत्तम ते सारे काही करतो, परंतु जेव्हा तो काही काळासाठी निष्क्रिय होतो आणि जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीमध्ये विश्वास राखतो आणि साऱ्या गोष्टींमागे श्रीमाताजींचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. आणि त्याच्या या विश्वासामुळे तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकवार साधनेची क्रिया हाती घेतो.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 139-140)

मानसिक परिपूर्णत्व – २३

 

श्रद्धा हा एक सर्वसाधारण शब्द आहे. श्रद्धा म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी, त्याच्या प्रज्ञेविषयी, त्याच्या शक्तीविषयी, त्याच्या प्रेमाविषयी आणि त्याच्या कृपेविषयी जीवाला असणारी खात्री. विश्वास (confidence) आणि भरवसा (trust) हे श्रद्धेचे पैलू आहेत आणि श्रद्धेचा परिणाम देखील आहेत.

विश्वास (confidence) ही अशी एक खात्रीची भावना असते की, ईश्वराला प्रामाणिकपणे साद घातली तर, तो ती ऐकेल आणि मदत करेल आणि ईश्वर जे काही करेल ते भल्यासाठीच करेल.

भरवसा (trust) म्हणजे ईश्वरावर, त्याच्या मार्गदर्शनावर आणि त्याच्या संरक्षणावर मन व हृदयाने संपूर्णपणे विसंबून असणे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 88)

एखाद्या व्यक्तीला चैत्य पुरुषाचा शोध घ्यावयाचा असेल, तर त्या व्यक्तीला चैत्य पुरुषाच्या अस्तित्वाविषयी दृढ विश्वास व श्रद्धा असणे, अपेक्षित आहे. व्यक्ती त्याविषयी जागरुक व्हावयास हवी आणि चैत्य पुरुषाने आपले जीवन हाती घेऊन, आपल्या कृतींना दिशादर्शन करणे हाती घ्यावे ह्यासाठी, व्यक्तीने त्याला संमती दिली पाहिजे. व्यक्तीने प्रत्येक वेळी त्याचा संदर्भ घेऊन, त्याला आपले मार्गदर्शक बनविले पाहिजे. व्यक्ती चैत्य पुरुषाला अधिकाधिक आत्मनिवेदन करत गेली, त्याचे मार्गदर्शन अधिकाधिक घेत राहिली तर, व्यक्ती स्वत:च्या अस्तित्वाच्या विविध गतिविधींविषयी जागरुक होते.

*

प्रश्न : चैत्य पुरुषाच्या संपर्कात येणे ही ‘सोपी गोष्ट’ नाही, असे तुम्ही मला लिहिले आहे. ते कठीण असते, असे तुम्ही का म्हणता? त्यासाठी मी कोठून सुरुवात करू?

श्रीमाताजी : मी ते ‘सोपे नाही’ असे म्हटले कारण तो संपर्क हा आपोआप घडत नाही, तो ऐच्छिक असतो. विचार व कृतींवर चैत्य पुरुषाचा नेहमीच प्रभाव पडत असतो, पण व्यक्तीला क्वचितच त्याची जाणीव असते. चैत्य पुरुषाबाबत सजग होण्यासाठी, व्यक्तीला तशी इच्छा हवी, तिने आपले मन शक्य तितके नि:स्तब्ध केले पाहिजे आणि स्वत:च्या हृदयात खोलवर प्रवेश केला पाहिजे, संवेदना व विचारांच्याही पलीकडे प्रवेश केला पाहिजे. शांत एकाग्रतेची आणि स्वत:च्या अस्तित्वात आत खोलवर उतरण्याची सवय व्यक्तीने लावून घ्यायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे, त्यांना माहीत आहे त्याप्रमाणे, चैत्य पुरुषाचा शोध ही एक सुनिश्चित आणि अतिशय सघन अशी वास्तविकता आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 302) आणि (CWM 16 : 399)

तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, अंधारा काळ हा अपरिहार्य आहे. जेव्हा तुमच्यातील चैत्य सक्रिय असतो तेव्हा कोणत्याही स्पष्ट कारणाविना तुम्हाला एक प्रकारचा आनंद जाणवतो. तो काही काळ तसाच टिकून राहतो आणि परत कोणत्यातरी मानसिक किंवा प्राणिक प्रतिक्रिया उमटतात आणि परत मग तुम्ही त्याच त्या अंधारात जाऊन पडता. हे काही काळ चालत राहणार.

हळूहळू प्रकाशमान दिवस हे अधिकाधिक काळ टिकून राहू शकतील आणि बऱ्याच कालावधीनंतर कधीतरी मग अंधारा काळ येईल आणि तो सुद्धा कमी काळासाठी येईल. अंतिमत: जोवर तो अंधारा काळ पूर्णपणे नाहीसा होत नाही, तोपर्यंत हे असे चालत राहील. तोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवावयास हवे की, ढगांमागे सूर्य दडलेला असतोच, तेव्हा तुम्ही काळजी करण्याचे काही कारण नाही.

तुमच्याकडे एखाद्या बालकाप्रमाणे विश्वास असावयास हवा – हा विश्वास की, कोणीतरी तुमची काळजी घेणारे आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकता.

– श्रीमाताजी

*

जेव्हा अहं-केंद्रितता ही मोठ्या प्रमाणात नाहीशी झालेली असते, तसेच श्रीमाताजींप्रत उत्कट भक्ती असते तेव्हा, चैत्य केंद्र थेट खुले होणे हे अधिक सहजसोपे असते. एक प्रकारची आध्यात्मिक विनम्रता आणि समर्पणाची, विसंबून असल्याची भावना ही आवश्यक असते.

– श्रीअरविंद

*

इच्छावासनांचा परित्याग केल्यामुळे, जेव्हा त्या इच्छावासना व्यक्तीचे विचार, भावभावना, कृती यांचे शासन करेनाशा होतात तेव्हा, आणि पूर्ण प्रामाणिकतेनिशी आत्मार्पण करण्याविषयीची एक स्थिर अशी अभीप्सा व्यक्तीमध्ये उदित होते तेव्हा, कालांतराने चैत्य पुरुष सहसा आपणहूनच खुला होतो.

– श्रीअरविंद
(CWM 14 : 247), (CWSA 32 : 163), (CWSA 30 : 349)