साधना, योग आणि रूपांतरण – २४८
मानसिक रूपांतरण
आपल्याला आपल्या बुद्धीकडून योग्य विचार, योग्य निष्कर्ष, वस्तु व व्यक्ती यांच्याबद्दलचे योग्य दृष्टिकोन, त्यांच्या वर्तणुकीबद्दलचे किंवा घटनाक्रमाबद्दलचे योग्य संकेत मिळत आहेत किंवा नाहीत हे पाहण्याची तसदी लोक घेत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात आणि त्या कल्पनाच सत्य आहेत असे मानून ते त्यांचा स्वीकार करतात. किंवा मग, त्या कल्पना त्यांच्या स्वतःच्या असल्यामुळे त्या कल्पनांचे अशा व्यक्ती अनुसरण करतात. आपल्या मनाची चूक झाली आहे हे लक्षात आले तरीही, ते त्या गोष्टीला फारसे महत्त्व देत नाहीत किंवा आधीपेक्षा मानसिकदृष्ट्या अधिक काळजीपूर्वक वागण्याचा प्रयत्नही ते करत नाहीत.
प्राणिक क्षेत्रामध्ये लोकांना हे माहीत असते की, नियंत्रणाविना स्वतःच्या इच्छावासना किंवा आवेग यांच्या मागे धावता कामा नये. ते काय करू शकतात आणि त्यांनी काय करावे किंवा त्यांना काय करता येणे शक्य नाही किंवा त्यांनी काय करू नये यामध्ये फरक करण्यासाठी आवश्यक असणारा विवेक किंवा नैतिक दृष्टिकोन त्यांच्यापाशी असला पाहिजे हे त्यांना माहीत असते. परंतु बुद्धीच्या प्रांतामध्ये मात्र अशा प्रकारची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही.
माणसांनी आपल्या बुद्धिमत्तेचे अनुसरण करावे असे म्हटले जाते. त्यामुळे माणसं त्यांच्या कल्पना, मग त्या योग्य असू देत वा अयोग्य असू देत त्या बाळगत राहतात, त्या ठासून सांगत राहतात. असे म्हटले जाते की, बुद्धी ही मनुष्याचे सर्वोच्च साधन आहे आणि त्यामुळे त्याने विचार केलाच पाहिजे आणि त्यानुसार त्याने आचरण केले पाहिजे, (असे अपेक्षित असते.) परंतु हे तितकेसे खरे नाही. प्राणाला मार्गदर्शन करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जशी आंतरिक प्रकाशाची आवश्यकता असते तशीच आवश्यकता बुद्धीलादेखील असते.
बुद्धीच्याही वर असणारी अशी जी गोष्ट आहे तिचा व्यक्तीने शोध घेतला पाहिजे आणि खऱ्या ‘ज्ञाना’च्या त्या स्रोताच्या कार्यासाठी बुद्धी ही फक्त मध्यस्थ झाली पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 13)