Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१४)

(एका साधकाने ‘मी लग्न करू का?’ असा प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारला होता, तेव्हा त्याच्या लग्नास संमती देण्यात आली. ती का दिली याचे कारण श्रीअरविंदांनी त्याला पत्राने कळविले आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…)

आध्यात्मिक जीवनासाठीची संपूर्ण तयारी होण्यापूर्वीच व्यक्तीने लौकिक जीवनाचा त्याग करणे उपयोगाचे नाही. असे करणे म्हणजे विविध घटकांमधील (मन, प्राण, शरीर यांमधील) संघर्षाला आमंत्रण देऊन, तो टोकाला नेऊन त्याला तीव्र करण्यासारखे आहे आणि ते पेलण्याची (तुमच्या) प्रकृतीची अजून तयारी झालेली नाही.

तुम्ही आध्यात्मिक ध्येय नजरेसमोर ठेवून, त्याद्वारे कर्मयोगाच्या वृत्तीने, क्रमाक्रमाने, तुमच्या जीवनाचे सुशासन करण्याचा प्रयत्न करत, तुमच्यामधील प्राणिक घटकांना काही अंशी जीवनानुभवांद्वारे आणि शिस्तीद्वारे वळण लावले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 543)

तुमची लौकिक जीवने, तुमच्या ऐहिक आवडीनिवडी यांचा मेळ घालणे, जीवनातील अडीअडचणी, यशापयश, ह्या साऱ्यांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी दोघांनी सहचर बनणे – हा विवाहसंस्थेचा खरा पाया आहे पण हे एवढेच पुरेसे नाही ह्याची तुम्हाला जाणीव आहेच.

दोघांच्या संवेदना एकसारख्या असणे, दोघांची सौंदर्यविषयक अभिरुची सारखीच असणे, त्याचा एकत्रित आस्वाद घेणे, दोघांना एकसमान गोष्टी भावणे, परस्परांनी परस्परांच्या माध्यमातून व परस्परांसाठी जीवन जगणे हे उत्तम आहे, ते आवश्यकही आहे परंतु ते पुरेसे नाही.

गहनतर अशा भावनांमध्ये एकत्व असणे, जीवनाच्या सर्व आघांतामध्येदेखील परस्परांबद्दलची न डळमळणारी आपुलकी व तोच हळुवारपणा, संवेदनशीलता कायम राखणे, दुःखनिराशा, क्षोभ यांसारख्या क्षणीदेखील एकमेकांच्या सोबत असणे, कायमच आणि प्रत्येक प्रसंगांमध्ये आनंदी, अगदी आनंदी, एकत्र असणे; प्रत्येकच परिस्थितीत परस्परांविषयी समचित्त, शांत आणि आनंदी असणे – हे सारे चांगले आहे, चांगलेच आहे, आवश्यकही आहे परंतु ते पुरेसे नाही.

या सगळ्याच्या पलीकडे, जन्म, देश, भोवताल, शिक्षण या परिस्थितीपासून सर्वस्वी स्वतंत्र, त्यांच्या अतीत, एक चिरंतन प्रकाश, आपल्या अस्तित्वाचे परमोच्च सत्य, आपल्या अंतरंगांत खोलवर, केंद्रस्थानी, तसेच आपल्या अस्तित्वाच्या शिखरावर विराजमान असते. हे परमोच्च सत्यच आपल्या आध्यात्मिक विकासाचे उगमस्थान आहे, कारण आहे आणि स्वामी आहे. तेच आपल्या जीवनांना चिरस्थायी अशी दिशा देत असते; ह्याच सत्याकडून आपली नियती ठरवली जाते; ह्या सत्यचेतनेच्या ठायीच आपण एकत्व पावावयास हवे. अभीप्सा आणि आरोहण यांबाबतीतही परस्परांत एकत्व असणे, आध्यात्मिक मार्गावर दोघांनी समान गतीने वाटचाल करणे, हे चिरस्थायी अशा एकत्वाचे गुपीत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 236-37)