Posts

विचारशलाका – ०४

व्यक्ती जर ‘ईश्वरा’प्रति विश्वासाने आणि खात्रीपूर्वक आत्मदान करेल तर ‘ईश्वरा’कडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल; आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल, पडदे हटवले जातील. व्यक्तीला हे आत्मदान जरी अगदी एकदम पूर्णत्वाने करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक प्रमाणात करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ‘ईश्वरा’चा संपर्क आणि त्याची अनुभूती वाढत राहील. शंकेखोर मनाची सक्रियता कमी झाली आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, दुसऱ्या कोणत्याच तपस्येची आणि बळाची आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 69]

 

साधक : माताजी, तुम्ही या छायाचित्रामध्ये प्रणाम का करत आहात ? का ? आणि कोणाला ?

श्रीमाताजी : मी ‘सत्या’चे स्वागत करत आहे. त्यासाठी ही आवश्यक अशी मुद्रा आहे. हा भक्तीचा आणि विनम्रतेचा भाव आहे. जेव्हा ‘सत्य’ हेच एकमेव मार्गदर्शक असेल अशा दिवसाची मी अगदी धीराने वाट पाहत आहे. हा भाव महत्त्वाचा आहे. येथे ‘दिव्य सत्य’ समग्रपणे स्थापित व्हावे अशी जर पृथ्वीची इच्छा असेल तर, हा भाव तिने बाळगला पाहिजे. ही एकच गोष्ट आहे की जी या पृथ्वीला वाचवू शकेल. या भूमिकेमध्ये राहायचे आणि ऊर्ध्वगामी अभीप्सा बाळगायची. या वृत्तीने ‘सत्या’समोर नतमस्तक व्हायला या पृथ्वीने शिकलेच पाहिजे. हीच आराधनाही आहे आणि तोच प्रणामही आहे. पृथ्वीने हे शिकलेच पाहिजे, या (प्रणामाच्या) मुद्रेमधून अजूनही अधिक काही, म्हणजे गहनगभीर आणि उदात्त असे काही अभिव्यक्त होते.

[Sweet Mother – Harmonises of Light, Part 01 : 15]

…आजवर जे काही केले आहे त्याच्या तुलनेत, अजूनही जे करायचे बाकी आहे त्याच्या सापेक्षतेची जाण असणे तसेच, ईश्वराच्या कृपेशिवाय व्यक्तीच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही, याची जाणीव असणे म्हणजे ‘आध्यात्मिक विनम्रता’.

-श्रीअरविंद
(CWSA 28 : 432)

कृतज्ञता – ०३

(‘ईश्वरी साक्षात्कारा’साठी जीवन समर्पित करण्याचा निश्चय) या निश्चयाशी निष्ठा राखायची असेल तर व्यक्तीने प्रामाणिक, एकनिष्ठ, विनम्र आणि आत्मनिवेदनाप्रत (consecration) कृतज्ञ असले पाहिजे, कारण हे गुण सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहेत आणि एक स्थिर आणि वेगवान प्रगती ही प्रकृतीच्या उत्क्रांतिमय प्रगतीच्या वेगाचे अनुसरण करण्यासाठी अनिवार्य असते. हे गुण नसतील तर कधीकधी व्यक्तीमध्ये प्रगतीचा आभास निर्माण होऊ शकेल पण तो केवळ बाह्य दिखावाच असेल, ते एक ढोंग असेल आणि पहिल्या वेळीच तो डोलारा कोलमडून पडेल.

‘प्रामाणिक’ असण्यासाठी, अस्तित्वाचे सारे भाग हे ईश्वराविषयीच्या अभीप्सेमध्ये (Aspiration) संघटित झाले पाहिजेत – एक भाग आस बाळगत आहे आणि इतर भाग नकार देत आहेत किंवा अभीप्सेशी प्रामाणिक राहण्याबाबत बंडखोरी करत आहेत, असे असता कामा नये – ईश्वर हा प्रसिद्धीसाठी किंवा नावलौकिकासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी किंवा सत्तेसाठी, शक्तीसाठी किंवा बढाईच्या समाधानासाठी नव्हे तर, ईश्वर हा ‘ईश्वरा’साठीच हवा असला पाहिजे, आत्मनिवेदनाबाबत अस्तित्वाच्या साऱ्या घटकांनी एकनिष्ठ आणि स्थिर असले पाहिजे म्हणजे एक दिवस श्रद्धा बाळगली आणि दुसऱ्या दिवशी, आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत त्यामुळे श्रद्धा गमावली आणि सर्व प्रकारच्या शंकाकुशंकांनी मनात घर केले, असे होता कामा नये. शंका म्हणजे व्यक्तीने ज्यामध्ये रममाण व्हावे असा एखादा खेळ नाही; तर ते एक असे विष आहे की, जे आत्म्याला कणाकणाने क्षीण करत नेते.

आपण कोण आहोत याचे व्यक्तीला अचूक भान असणे आणि आपल्याला कितीही गोष्टी साध्य झालेल्या असल्या तरीही ‘आपण काय असले पाहिजे’ अशी ईश्वराची आपल्याकडून अपेक्षा आहे, तिच्या परिपूर्तीच्या तुलनेत, आपल्याला साध्य झालेल्या गोष्टी व्यवहारतः अगदी नगण्य आहेत, हे कधीही न विसरणे तसेच, ईश्वराचे व त्याच्या मार्गांचे मूल्यमापन करण्यासाठी आपण अक्षम असतो, याची पुरेपूर खात्री असणे म्हणजे ‘विनम्र’ असणे होय.

एखादी व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे तिचे अज्ञान, तिचे समज-गैरसमज, तिचा अहंकार, त्या व्यक्तीचा विरोध, त्या व्यक्तीची बंडखोरी अशा गोष्टी असूनदेखील, परमेश्वराची अद्भुत कृपा त्या व्यक्तीला तिच्या ईश्वरी उद्दिष्टाप्रत अगदी जवळच्या मार्गाने घेऊन जात असते. या अद्भुत कृपेचे कधीही विस्मरण होऊ न देणे म्हणजे ‘कृतज्ञ’ असणे होय.

– श्रीमाताजी
(The Aims And Ideals of The Sri Aurobindo Ashram : 16-17)

सद्भावना – १६

आश्रमात येणाऱ्या दर्शनार्थींचे स्वागत करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींकडे असते त्या व्यक्तींचे आचरण नेहमीच अतिशय विनम्र आणि मृदु असले पाहिजे, अशी श्रीमाताजींची अपेक्षा असते. कोणी उच्च असू दे वा कनिष्ठ, कोणी तरुण असू देत वा वयस्कर, त्यांनी उत्तमोत्तम पोषाख परिधान केलेला असू दे वा अगदी फाटक्या कपड्यातील असू देत, साऱ्यांचे स्वागत सारख्याच सद्भावनेने आणि सदाचाराने झाले पाहिजे. चांगल्या पोषाखातील व्यक्ती आश्रमातील स्वागतासाठी जास्त सुयोग्य आहेत असे मानण्याची काहीच गरज नाही. एखाद्या भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या सामान्य माणसापेक्षा मोटार गाडीतून आलेल्या माणसांची आपण अधिक काळजी घेत आहोत, असे कदापिही घडता कामा नये. आपल्यासारखीच ती देखील माणसं आहेत हे आपण कदापिही विसरता कामा नये आणि आपण श्रेणीच्या सर्वोच्च स्थानी आहोत, असे समजण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.
आणि आपली विनम्रता ही केवळ बाह्य स्वरूपाची असता कामा नये, येथे खरीखुरी विनम्रता, अभिप्रेत आहे. जी आतून आलेली असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 167)

विनम्रतेची आवश्यकता ही एक अशी गोष्ट आहे की जिच्याविषयी नेहमी बोलले जाते पण तिचा अर्थ समजण्यात नेहमीच चूक होते. ती चुकीच्या पद्धतीने घेतली जाते, तिचा अर्थ चुकीचा घेतला जातो आणि तिचा वापरही चुकीचा केला जातो. जर तुम्हाला शक्य असेल तर योग्य रीतीने विनम्र व्हा, परंतु चुकीच्या रीतीने विनम्र होण्यात काही अर्थ नाही, कारण त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र आहे, जर तुम्ही तुमच्या मधून घमेंड नावाचे तण उपटून फेकून देऊ शकाल तर, खरोखरच तुम्ही काहीतरी साध्य केल्यासारखे होईल. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की ही गोष्ट किती कठीण आहे ते? तुमच्या लक्षात येईल की, एक प्रकारच्या आत्मप्रौढीयुक्त आत्म-समाधानाने फुलून गेलेले असल्याशिवाय तुम्ही कोणतीच गोष्ट नीट करू शकत नाही, तुम्हाला चांगले काही सुचत नाही, तुम्ही योग्य अशी कृती करत नाही किंवा त्या समाधानाने आतून फुललेले नसाल (भले तुम्हाला त्याची जाणीवही नसेल) तर तुम्ही किंचितही प्रगती करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला घणाचे घाव घालूनच, आत्मप्रौढी मोडून काढावी लागते. तरीदेखील काही अवशेष शिल्लक राहतातच आणि मग त्यांना मोड यायला सुरुवात होते.

व्यक्तीने त्यावर आयुष्यभर काम करत राहिले पाहिजे आणि या पुन्हा पुन्हा डोके वर काढणाऱ्या तणाला मुळापासून उपटून काढण्यासाठी काम करत राहणे कधीही विसरता कामा नये. कारण ते तण इतक्या बेमालूमपणे तुमच्यामध्ये असते की, तुम्हाला असे वाटते की, ती घमेंड, आत्मप्रौढी तुमच्यामधून निघून गेली आहे आणि तुम्ही स्वत:ला अगदी विनम्र, विनयशील समजत असता आणि म्हणता, “हे मी केलेले नाही, मला जाणवते आहे की, हे ईश्वरी आहे, जर तो ईश्वर नसेल तर मी कोणीच नाही.” आणि लगेचच पुढच्या क्षणी हा असा विचार केल्याबद्दल तुम्ही स्वत:वरच खूप खुष होऊन जाता.

*

प्रश्न : जेव्हा आम्ही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारु लागते आणि त्या तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि त्यातूनच सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सोडवणूक कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असते, निरीक्षण करत असते. आणि मग कधीकधी तो गर्विष्ठ होतो. मग साहजिकच आपल्या प्रयत्नांमधील बरेचसे सामर्थ्य तो काढून घेतो. ही एक अशी सवय आहे की, काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्ती स्वत:कडे पाहत असते.

स्वत:चे निरीक्षण करणे आवश्यकच आहे; परंतु मला वाटते, पूर्णपणे प्रामाणिक असण्याचा, सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे हे त्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी स्वाभाविक असली पाहिजे म्हणजे व्यक्तीने सततच स्वत:चे निरीक्षण करणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, समाधानाने स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट तितकीच ही गोष्टही वाईट आहे; ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच घातक आहेत. व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये, इतकी ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

जेव्हा व्यक्ती ही स्व-केंद्रित राहत नाही, काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार राहत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात ती स्वत:च एक आस बनून जाते तेव्हा ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा आस बाळगणारी व्यक्ती शिल्लक राहत नाही, तर जेव्हा ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव आसच बनून राहते आणि ती पूर्ण एकाग्र आवेगाने झेपावते तेव्हा अशी व्यक्ती खरोखर खूप प्रगत होऊ शकते.

अन्यथा, नेहमीच त्यामध्ये एक प्रकारची क्षुद्र आत्मप्रौढी, एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, आणि एक प्रकारची स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आत शिरकाव करतात आणि सारे काही बिघडवून टाकतात. कठीण असते ते सारे !

*

प्रश्न : विनम्र असण्याची योग्य रीत आणि अयोग्य रीत कोणती?

श्रीमाताजी : ते ओळखणे अगदीच सोपे आहे. जेव्हा माणसांना सांगितले जाते की, ‘विनम्र व्हा’ तेव्हा ती ताबडतोब, ‘दुसऱ्या व्यक्तींसमोर विनम्र व्हायचे’ असा विचार करतात आणि इथेच विनम्रता चुकीची असते. खरी विनम्रता म्हणजे ईश्वरासमोर असणारी विनम्रता ! ही एक अगदी नेमकी अशी, अचूक, एक जिवंत अशी संवेदना असते की, आपण कोणीच नाही, आपण त्या ईश्वराशिवाय काहीच करू शकत नाही, आपल्याला त्या ईश्वराविना काहीच समजू शकत नाही. म्हणजे अगदी एखादा असामान्यपणे बुद्धिमान किंवा सक्षम असला तरीही, दिव्य चेतनेच्या तुलनेत ते काहीच नसते आणि ही जाण व्यक्तीने कायम बाळगली पाहिजे, कारण त्यामुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने ग्रहणशील होऊ शकते – ही अशी विनम्रता ईश्वरासमोर कोणताही आव आणत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 44-45), (CWM 06 : 402), (CWM 05 : 44-45)