योगपद्धती आणि मानवाच्या सवयीच्या मनोवैज्ञानिक क्रिया यांचा संबंध थोड्याबहुत प्रमाणात विज्ञान आणि निसर्ग यांच्या संबंधासारखा आहे : वाफ किंवा वीज या निसर्ग शक्तीचे स्वाभाविक सामान्य व्यापार आणि याच शक्तीचे विज्ञानघटित व्यापार याचा जो संबध तोच संबध थोड्याफार प्रमाणात मानवाच्या सवयीच्या सामान्य मनोवैज्ञानिक क्रिया आणि योगप्रक्रिया यांचा आहे. विज्ञानाच्या प्रक्रिया ज्याप्रमाणे नियमितपणे केलेले प्रयोग, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि सातत्याने दिसून येणारे परिणाम यांद्वारे विकसित व निश्चित झालेल्या ज्ञानावर आधारित असतात, त्याचप्रमाणे योगाच्या प्रक्रिया पण अशाच ज्ञानावर आधारित असतात.
उदाहरणार्थ राजयोग घ्या. हा योग पुढील आकलनावर व अनुभवावर आधारलेला आहे : आमचे आंतरिक मूळ घटक, आमचे आंतरिक संयोग, आंतरिक नियत कार्ये आणि शक्ती, या सर्वांना एकमेकांपासून अलग करता येते, त्यांचा विलय पण करता येतो, त्यांच्यातून नवे संयोग घडविता येतात; आणि या नव्या संयोगांच्या द्वारा पूर्वी अशक्य असणाऱ्या नव्या कार्यांना त्यांना जुंपता येते. तसेच त्यांचे रूपांतर घडवून आणता येते. आणि निश्चित अशा आंतरिक प्रक्रियांच्या द्वारा त्यांचा नवा सर्वसाधारण समन्वय घडवून आणता येतो. ही राजयोगाची गोष्ट झाली.
हठयोगाची गोष्ट अशीच आहे. हा योग पुढील आकलनावर व या अनुभवावर आधारलेला आहे : आमचे जीवन सामान्यतः ज्या प्राणशक्तीवर आणि प्राणव्यापारांवर आधारलेले आहे, ज्यांचे सामान्य व्यापार निश्चित स्वरूपाचे व अपरिहार्य वाटतात, त्या शक्ती व त्या व्यापारांवर मानवाला प्रभुत्व संपादित करता येते, ते व्यापार बदलता येतात, स्थगितही करता येतात. अशक्यप्राय वाटावे असे परिणाम त्यामुळे घडून येतात आणि ज्यांना या प्रक्रियांमागील तर्कसंगती उमगत नाही त्यांना ते चमत्कारच वाटतात. ही हठयोगाची गोष्ट झाली.
राजयोग आणि हठयोग यांखेरीज जे योगाचे इतर प्रकार आहेत, त्या प्रकारात योगाचे हे वैशिष्ट्य तितकेसे दिसून येत नाही; याचे कारण, दिव्य समाधीचा आनंद प्राप्त करून देणारा भक्तियोग आणि दिव्य अनंत अस्तित्व व जाणीव प्राप्त करून देणारा ज्ञानयोग हे दोन्ही योग राजयोग वा हठयोग या दोन योगांइतके यांत्रिक नाहीत, ते अधिक अंतर्ज्ञानप्रधान आहेत. मात्र त्यांचाही आरंभ हा आम्हातील एखादी महत्त्वाची शक्ती वापरण्यापासूनच होत असतो.
एकंदरीत, योग या सामान्य नावाखाली ज्या पद्धती एकत्र करण्यात येतात, त्या सर्व पद्धती म्हणजे विशिष्ट मानसिक प्रक्रिया आहेत, निसर्गाच्या एखाद्या निश्चित सत्यावर त्या आधारलेल्या आहेत. योगामध्ये, या विशिष्ट मानसिक प्रक्रियाच्या आधारे, सामान्यतः न आढळून येणारे परिणाम व शक्ती विकसित होतात. अर्थात या शक्ती, हे परिणाम, सामान्य व्यापारांत नेहमीच अप्रकट अवस्थेत अंतर्भूत असतात.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 07)