Tag Archive for: विचार

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन साक्षात्कार आणि आजवर स्वप्नातही कधी पाहिले नव्हते असे प्रभुत्व संपादन करणे हे आपले काम आहे. काळ, आत्मा आणि जग हे आपल्याला प्रदान करण्यात आलेले क्षेत्र आहे; दृष्टी, आशा आणि सर्जनशील कल्पनाशक्ती या गोष्टी आपल्याला काय करायचे आहे याची आठवण करून देणाऱ्या आहेत; तर इच्छा, विचार आणि परिश्रम ही आपली सर्वार्थाने कार्यक्षम अशी साधनं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती फिरत राहणे हीदेखील त्याची आणखी एक गती आहे.

*

आधी अंतरंगामध्ये असणाऱ्या आत्म्या‌विषयी सचेत व्हा, मग विचार करा आणि तदनंतर कृती करा. सर्वंकष चैतन्यमय विचार हा ज्याची पूर्वतयारी चालू आहे असे एक जग असते आणि सर्व खऱ्या कृती म्हणजे आविष्कृत झालेला विचार असतो. एक सत्य-कल्पना (Idea) दिव्य आत्म-चेतनेमध्ये क्रीडा करू लागली आणि त्यातून हे जडभौतिक जग अस्तित्वात आले.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

मी आज जे करू शकत नाहीये तो, मी भविष्यात जे करणार आहे त्याचा संकेत आहे. अशक्यतेची जाणीव होणे ही सर्व शक्यतांची सुरुवात असते. हे कालबद्ध विश्व म्हणजे एक विरोधाभास होता आणि एक अशक्यता होती; म्हणूनच त्या शाश्वता‌ने स्वतःच्या अस्तित्वामधून हे विश्व निर्माण केले.

*

अशक्यता म्हणजे आजवर प्रत्यक्षात न उतरलेल्या महत्तर शक्यतांची केवळ गोळाबेरीज आहे. प्रगतीचा पुढचा टप्पा आणि अद्यापि पूर्णत्वास न गेलेला प्रवास या गोष्टी अशक्यतेमुळे झाकल्या गेलेल्या असतात.

*

मानवतेने प्रगत व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर सर्व पूर्वकल्पना बाजूला करा. तसे केल्याने, आजवर दुर्लक्षित राहिलेला विचार जागृत होतो आणि तो सर्जनशील बनतो. अन्यथा तो त्याच त्याच यांत्रिक चक्रात पुनरावृत्त होत राहतो आणि तीच त्याची योग्य कृती आहे असे समजण्याची चूक करतो.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

कूए नावाचे एक डॉक्टर होते. ते मानसिक उपचाराने, स्वयंसूचनेने लोकांचे आजार बरे करत असत. अशा रीतीने पुष्कळ लोकांचे आजार त्यांनी बरे केले होते, त्यामुळे डॉक्टर कूए विख्यात झाले होते.

त्यासंबंधी श्रीमाताजींनी एक किस्सा सांगितला होता. त्या सांगतात, माझ्याकडे एक स्त्री येत असे, तिचे केस प्रचंड प्रमाणात गळत असत. आता लवकरच तिला टक्कल पडेल अशी तिची स्थिती झाली होती. त्याच सुमारास कोणीतरी तिला डॉ. कूए यांच्या उपचारप्रणालीची माहिती दिली. तिने तो प्रयोग करायला सुरुवात केली. केस विंचरताना, ती स्वतःच्या मनाशी असा विचार करत असे की, “माझे केस गळणार नाहीत.” पहिल्या एक दोन वेळेला त्याचा काहीच परिणाम झाला नाही पण तिने तो प्रयोग नेटाने चालू ठेवला. प्रत्येक वेळी केस विंचरण्यापूर्वी ती निश्चयपूर्वक “मी माझे केस आता विंचरणार आहे पण ते गळणार नाहीत.” असा विचार करत असे. आणि खरोखरच महिन्याभरात तिचे केस गळणे थांबले. नंतर तिने असा विचार करायला सुरुवात केली की, “आता माझे केस वाढत आहेत.” आणि ती त्यामध्ये कमालीची यशस्वी झाली ; खरोखरच मी तिचे वाढलेले केस पाहिले.

मात्र यातील मेख एवढीच की, अशा प्रकारची विचार-रचना करत असताना, तुमच्या मनाच्या दुसऱ्या भागाने असे म्हणता कामा नये की, “मी तसा विचार करत आहे खरा, पण त्याचा काही उपयोग होईल की नाही कोण जाणे?” तुम्ही जर असा निराशावादी विचार केलात तर अशा विचारांनी तुम्ही तुमचे काम स्वतःच वाया घालविता.

श्रीमाताजी पुढे म्हणतात, लोक चुकीच्या पद्धतीने विचार करण्यात त्यांचा वेळ व्यर्थ घालवतात. त्यांची मानसिक क्रिया ही सर्वसामान्यतः अर्धी निराशावादी आणि अर्धी विघातक असते. त्यांनी जे काही केले आहे त्याचे कसे भयानक त्रासदायक परिणाम घडून येतील आणि कोणकोणत्या वाईट गोष्टी घडू शकतील अशा प्रकारची कल्पना करण्यामध्ये ते त्यांचा बहुतांशी वेळ घालवितात. पण त्याऐवजी त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा सकारात्मक उपयोग केला असता तर साहजिकच त्यांना त्याचे चांगले परिणाम अनुभवास आले असते.

  • श्रीमाताजी (CWM 07 : 04-05)

साधना, योग आणि रूपांतरण – ६७

नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच पावले पडत नाहीयेत असे वाटत राहणे, अशा प्रकारचे साधनेमधील विरामाचे कालावधी अगदी उत्तम साधकांबाबत सुद्धा असतात.

(तुमच्यामधील) भौतिक प्रकृतीमध्ये काही अडचण उद्भवली असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी किंवा पडद्यामागे काही तयारी चाललेली असेल तर त्यासाठी किंवा तशाच काही कारणासाठी अशा प्रकारचे विरामाचे कालावधी येत असतात.

मन आणि प्राण, जे अधिक घडणसुलभ असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा साधनेचे कार्य चालू असते तेव्हा अशा प्रकारचे कालावधी वारंवार येतात आणि जेथे शरीराचा प्रश्न असतो (साधना जेव्हा शारीर स्तरावर चालू असते तेव्हा) ते अनिवार्यपणे येतातच. आणि तेव्हा ते सहसा कोणत्याही दृश्य संघर्षाद्वारे दिसून येत नाहीत तर, पूर्वी ज्या ऊर्जा कार्यरत असायच्या त्या आता अचल आणि जड झाल्याचे जाणवणे (यामधून त्या विरामाच्या कालावधीची जाणीव होते.) मनाला ही गोष्ट फार त्रासदायक वाटते कारण आता सारेकाही संपले आहे, प्रगतीसाठी आपण अक्षम झालो आहोत, अपात्र ठरलो आहोत असे काहीसे त्याला वाटू लागते. परंतु वस्तुतः ते तसे नसते.

तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि (ईश्वरी शक्तीच्या) कार्याप्रति स्वतःला खुले करत गेले पाहिजे किंवा (किमान) तसे करण्याची इच्छा बाळगत राहिली पाहिजे. तसे केल्यास नंतर अधिक प्रगती घडून येईल. अशा कालावधीमध्ये बरेच साधक नैराश्यवृत्तीमध्ये जातात आणि त्यांची भावी (काळा) वरील श्रद्धाच ढळल्यासारखे होते आणि त्यामुळे पुनरूज्जीवनासाठी विलंब होतो, मात्र हे टाळले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 67)

साधना, योग आणि रूपांतरण – ६६

निश्चल-नीरव (silence) स्थितीमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट नाही. मानसिक आणि प्राणिक गतिविधींना बाहेर फेकून दिल्यानेच ते शक्य होते. (मात्र) त्या नीरवतेला, त्या शांतीला तुमच्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी वाव देणे अधिक सोपे असते. म्हणजे तुम्ही स्वतःला उन्मुख करा, खुले करा आणि तिचे अवतरण होण्यासाठी तिला वाव द्या, हे सोपे असते. हे करणे आणि उच्चतर शक्तींनी अवतरित व्हावे म्हणून त्यांना आवाहन करणे या दोन्हीचा मार्ग समानच असतो. तो मार्ग असा की, ध्यानाच्या वेळी अविचल (quiet) राहायचे, मनाशी झगडा करायचा नाही किंवा ‘शांती’ची शक्ती खाली खेचण्यासाठी कोणताही मानसिक खटाटोप करायचा नाही तर, त्यांच्यासाठी (शांतीसाठी किंवा उच्चतर शक्तींनी अवतीर्ण व्हावे म्हणून) केवळ एक शांत आस, अभीप्सा बाळगायची.

मन जर सक्रिय असेल तर तुम्ही मागे सरून फक्त त्याच्याकडे पाहायला आणि त्याला अंतरंगामधून कोणतीही अनुमती न देण्यास शिकले पाहिजे. मनाच्या सवयीच्या किंवा यांत्रिक गतिविधींना अंतरंगामधून कोणताही आधार न मिळाल्यामुळे त्या हळूहळू गळून पडत नाहीत तोपर्यंत असे करत राहायचे. परंतु मनाच्या गतिविधी तरीही सुरूच राहिल्या तर कोणत्याही तणावाविना किंवा संघर्षाविना त्याला सातत्याने नकार देत राहणे ही एकच गोष्ट करत राहिली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 300)

 

साधना, योग आणि रूपांतरण – ६५

मन निश्चल-नीरव करण्यासाठी, येणारा प्रत्येक विचार परतवून लावणे पुरेसे नसते, ती केवळ एक दुय्यम क्रिया असू शकते. तुम्ही सर्व विचारांपासून दोन पावले मागे सरले पाहिजे आणि विचार आलेच तर नीरव चेतना या भूमिकेतून त्यांचे निरीक्षण केले पाहिजे, मात्र स्वतःहून विचार करायचे नाहीत किंवा विचारांबरोबर एकरूप व्हायचे नाही अशा रीतीने त्या विचारांपासून स्वतःला अलग केले पाहिजे. विचार म्हणजे पूर्णपणे बाहेरच्या गोष्टी आहेत, असे तुम्हाला वाटले पाहिजे. तसे झाले तर मग, विचारांना नकार देणे किंवा मनाची अविचलता बिघडवू न देता त्यांना तसेच निघून जाऊ देणे, या गोष्टी सहजसोप्या होतील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

साधना, योग आणि रूपांतरण – ५६

ध्यानाला बसल्यावर मनामध्ये सर्व प्रकारचे विचार येऊन गर्दी करतात, ही जर तुमची अडचण असेल तर ती अडचण विरोधी शक्तींमुळे येत नाही, तर मानवी मनाच्या सर्वसाधारण प्रकृतीमुळे ती अडचण येते. सर्वच साधकांना ही अडचण येते आणि काहींच्या बाबतीत तर ती खूप दीर्घ काळपर्यंत टिकून राहते. त्यापासून सुटका करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. मनात जे विचार येतात त्यांच्याकडे पाहायचे, ते मानवी मनाच्या प्रकृतीचे जे दर्शन घडवीत असतात ते काय आहे याचे निरीक्षण करायचे पण त्या विचारांना कोणतीही अनुमती द्यायची नाही आणि ते अगदी निःस्तब्ध होत नाहीत तोवर त्यांना तसेच प्रवाहित होत राहू द्यायचे, हा एक मार्ग आहे. विवेकानंदांनी त्यांच्या ‘राजयोगा’मध्ये याच मार्गाची शिफारस केली आहे.

दुसरा मार्ग असा की, विचारांकडे ते आपले विचार आहेत असे समजून पाहायचे नाही, तर साक्षी पुरुषाप्रमाणे त्यांच्याकडे अलिप्त राहून पाहायचे आणि त्यांना अनुमती द्यायची नाही. हे विचार म्हणजे जणू काही बाहेरून, प्रकृतीकडून येणाऱ्या गोष्टी आहेत असे समजून त्यांच्याकडे पाहायचे. मनाचा प्रदेश ओलांडून पलीकडे जाणाऱ्या वाटसरूंप्रमाणे ते विचार आहेत अशी जाणीव मात्र तुम्हाला अवश्य झाली पाहिजे. ज्यांच्याशी तुमचा कोणताही संबंध असत नाही आणि ज्यांच्यामध्ये तुम्ही स्वारस्यही दाखवीत नाही अशा वाटसरुंप्रमाणे ते आहेत अशा रीतीने तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

अशा प्रकारे या मार्गाचा अवलंब केला असता, सहसा असे घडते की, कालांतराने मन दोन गोष्टींमध्ये विभागले जाते. मनाचा एक भाग म्हणजे प्रकृतीचा जो भाग असतो आणि जो निरीक्षणाचा विषय असतो, त्यामध्ये विचार इतस्ततः ये-जा करत असतात, भरकटत असतात. आणि दुसरा भाग, मनोमय साक्षी होऊन पाहत राहतो आणि तो पूर्णपणे अविचल व शांत असतो. कालांतराने मग तुम्ही निश्चल-नीरवतेकडे (silence) प्रगत होऊ शकता किंवा प्रकृतीच्या त्या भागालासुद्धा अविचल (quiet) करू शकता.

आणखी एक तिसरी पद्धतदेखील आहे. ती सक्रिय पद्धत आहे. यामध्ये विचार कोठून येत आहेत ते तुम्ही पाहायला सुरुवात करता आणि तुम्हाला असे आढळते की, ते विचार तुमच्यामधून येत नाहीयेत तर, ते विचार बाहेरून तुमच्या मस्तकामध्ये प्रवेश करत आहेत. अशा वेळी, म्हणजे तुम्हाला ते विचार आत येत असल्याचे लक्षात आले तर, त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना पूर्णपणे बाजूला फेकून दिले पाहिजे.

कदाचित हा सर्वात कठीण मार्ग आहे आणि सर्वच त्याचा अवलंब करू शकतील असे नाही. पण जर या मार्गाचा अवलंब करता आला तर निश्चल-नीरवतेकडे घेऊन जाणारा तो सर्वात नजीकचा आणि परिणामकारक मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 301-302)

विचारशलाका ३८

 

(श्रीमाताजी येथे ‘विचार’ व्यापक करण्याच्या एका मार्गाबद्दल सांगत आहेत.)

 

समजा, तुमच्याबरोबर कोणी दुसरी एखादी व्यक्ती आहे.  ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तेव्हा तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी त्या व्यक्तीला सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हो, तुम्ही जर भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.

पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी तुम्ही जर स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहातो आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेतो. हो, तो मला तसे का बरे म्हणाला असेल?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही प्रयत्न करत तिथेच थांबून राहता.

दुसरा माणूस मात्र बोलतच असतो, नाही का? – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.

तो काय म्हणतो आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि मग, तुमच्याशी तो तसा का बोलत आहे, याचे तुम्हाला आकलन होते.

आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला आधी जे माहीत होते ते आणि आत्ता जे समजले ते या दोन्ही गोष्टी जर शेजारी शेजारी ठेवल्यात तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोन्हींचा समेट घडविणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.

स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

तुम्ही जर एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे होणार नाही. त्याउलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवू शकाल. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!

– श्रीमाताजी [CWM 05 : 218-220]

विचारशलाका ३०

 

चेतना आणि ज्या माध्यमांमधून चेतना व्यक्त होते ती साधने या दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

त्या साधनांचा विचार करुया : मानसिक अस्तित्वामधून ‘विचार’ निर्माण होतात, भावनिक अस्तित्वामधून ‘भावना’ निर्माण होतात, प्राणिक अस्तित्वामधून ‘कार्यकारी शक्ती’ निर्माण होते आणि शारीरिक अस्तित्व ‘प्रत्यक्ष कृती’ करते.

प्रतिभावान माणसाला काहीही दिले तरी, त्यापासून तो काहीतरी सुंदर असे बनवून दाखवेल कारण तो प्रतिभाशाली असतो. पण त्याच प्रतिभावंताला तुम्ही एक परिपूर्ण असे साधन द्या, तो त्यापासून काहीतरी अद्भुत असे करून दाखवेल. एखादा महान पियानोवादक अगदी खराब झालेल्या पियानोमधूनसुद्धा काहीतरी उत्तम संगीत निर्माण करेल पण त्याला जुळवलेला, उत्तम असा पियानो द्या, तो त्यापासून अधिकच सुंदर असे काही संगीत निर्माण करेल. या दोन्ही बाबतीत चेतना एकसारखीच असते पण तिच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या साधनाची आवश्यकता असते. – अगदी त्याचप्रमाणे मानसिक, प्राणिक, आंतरात्मिक आणि शारीरिक क्षमता असलेल्या देहाची साधन म्हणून आवश्यकता असते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 40]