‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २६
पूर्णयोगामध्ये समग्र जीवन हे, अगदी बारीकसारीक तपशिलासहित रूपांतरित करायचे असते, ते दिव्यत्वामध्ये परिवर्तित करायचे असते.
इथे कोणतीच गोष्ट निरर्थक नसते आणि कोणतीच गोष्ट क्षुल्लक नसते. “जेव्हा मी ध्यानधारणा करत असेन, जेव्हा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असेन किंवा (आध्यात्मिक) चर्चा ऐकत असेन तेव्हा मी प्रकाशाभिमुख अशा उन्मीलित स्थितीत राहीन आणि प्रकाशाप्रत आवाहन करेन; पण जेव्हा मी फिरायला बाहेर पडेन किंवा मी जेव्हा मित्रांना भेटेन तेव्हा मात्र हे सारे विसरून गेलो तरी चालेल,” असे तुम्ही म्हणू शकत नाही. जर तुम्ही अशा तऱ्हेचाच दृष्टिकोन ठेवलात तर त्याचा अर्थ असा होईल की, तुम्ही तसेच अरूपांतरित राहाल आणि मग तुम्ही ईश्वराशी खरेखुरे एकत्व कधीच साधू शकणार नाही. फार फार तर तुम्हाला उच्चतर जीवनाची थोडीफार झलक पाहायला मिळेल. परंतु तुम्ही नेहमीच ईश्वरापासून विभक्त राहाल.
तुमच्या ध्यानावस्थेत किंवा तुमच्या आंतरिक चेतनेमध्ये तुम्हाला काही अनुभव आले किंवा काही साक्षात्कार झाले तरीही तुमचे शरीर आणि तुमचे बाह्य जीवन मात्र तसेच अपरिवर्तित राहिलेले असेल. शरीर आणि बाह्य जीवन यांची अजिबात दखल न घेणारे असे आंतरिक प्रदीपन (illumination) हे फारसे उपयोगाचे नाही, कारण असे आंतरिक प्रदीपन जगाला ते जसे आहे तसेच सोडून देते. आजवर हे असेच घडत आले आहे. ज्यांना अगदी महान आणि शक्तिशाली साक्षात्कार झाला होता त्यांनीदेखील, आंतरिक शांतीमध्ये आणि स्थिरतेमध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या जगापासून स्वतःला विलग केले होते; या जगाला आहे त्या परिस्थितीत सोडून दिले होते, त्यामुळे, दुःखकष्ट, मूर्खपणा, मृत्यू आणि अज्ञान यांवर कोणताही परिणाम न होता, त्या गोष्टी तशाच कायम राहिल्या; त्यांचे या भौतिक जगतावरील सार्वभौमत्व तसेच अबाधित राहिले. जे अशा तऱ्हेने या जगापासून विलग झाले होते त्यांच्यासाठी, या गडबडगोंधळापासून सुटका करून घेणे, अडचणींकडे पाठ फिरविणे आणि अन्यत्र एखादी आनंदी अवस्था शोधणे हे, सुखकर असू शकेल; पण ते या जगाला आणि जीवनाला आहे तशाच असुधारित आणि अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात; आणि त्यांच्या स्वतःच्या बाह्य चेतनेलादेखील ते अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात, आणि त्यांचे शरीरदेखील जसे होते तसेच, पुनरुज्जीवित न झालेल्या अवस्थेत ते सोडून जातात. परंतु जेव्हा या भौतिक जगात त्यांना परत यावे लागेल तेव्हा ते अगदी सामान्य माणसापेक्षादेखील सामान्य असू शकतात; कारण त्यांनी भौतिक वस्तुमात्रांवरील त्यांचे प्रभुत्व गमावलेले असते आणि त्यामुळे, त्यांचा जीवनव्यवहार विसंगत होण्याची तसेच येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येक शक्तीच्या दयेवर अवलंबून असण्याची शक्यता असते.
ज्यांचा हाच आदर्श आहे, त्यांच्यासाठी तो चांगला असू शकेल. परंतु हा आपला योग नाही. कारण आपल्याला या विश्वावर दिव्य विजय प्राप्त करून घ्यायचा आहे; या विश्वातील सर्व घडामोडी, गतीविधींवर विजय मिळवायचा आहे आणि इथेच त्या ‘ईश्वरा’चा साक्षात्कार घडवायचा आहे. परंतु ‘ईश्वरा’ने येथे राज्य करावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यापाशी जे काही आहे, आपण जे काही आहोत, आपण येथे जे काही करत असतो ते सारे ईश्वरार्पण केले पाहिजे. एखादी गोष्ट कमी महत्त्वाची आहे किंवा ‘बाह्य जीवन आणि त्याच्या आवश्यकता या दिव्य जीवनाचा भाग असू शकत नाहीत,’ असा विचार आपण करून चालणार नाही. आपण जर असा विचार केला तर आपण आजवर जेथे आहोत तेथेच राहू आणि मग या बाह्य जगतावर आपण कधीच विजय मिळवू शकणार नाही, चिरस्थायी असे आपण काहीही केलेले नसेल.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 24-25)