Posts

जगाच्या डोळ्यांसमोर भारतामध्ये ‘राष्ट्र’उभारणीचे कार्य अत्यंत वेगाने, अगदी स्पष्टपणे, घडू लागले आहे त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणली गेलेली सामग्री यांमधील वेगळेपण पाहू शकत आहेत. हे राष्ट्र म्हणजे ‘प्रकृती’च्या कार्यशाळेतील कच्च्या मालापासून तयार झालेला नवीन वंश नाही किंवा हे राष्ट्र आधुनिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असेही नव्हे. तर येथील संस्कृती ही, या पृथ्वीवरील महान संस्कृतींपैकी, प्राचीन वंशांपैकी एक आहे; दुर्दम्य प्राणशक्ती, महानतेची, सखोलतेची जणू खाणच, अद्भुत क्षमता असणारी, अशी ही संस्कृती; मानवी संस्कृतीच्या इतर प्रकारांपासून तसेच परकीय वंशप्रकारांपासून सामर्थ्याचे अगणित उगमस्त्रोत स्वत:मध्ये सामावून घेत, आता ती कायमसाठी एका सुसंघटित अशा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये स्वत:चे उन्नयन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. …आमच्या पुरातन कालापासून जो प्रयत्न आजवर आमचा वंश करत होता, तो प्रयत्न आता संपूर्णत: नवीन परिस्थितीमध्ये तो करेल. एखादा जाणकार निरीक्षक त्याच्या यशस्वितेचे भाकीत करू शकेल; कारण जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते दूर करण्यात आले आहेत किंवा ते दूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु आम्ही याही पुढे जातो आणि असा विश्वास बाळगतो की, यश मिळण्याची खात्री आहेच कारण भारताची महानता, भारताची एकात्मता, आणि भारताचे स्वातंत्र्य ही आता संपूर्ण जगाचीच आवश्यकता बनली आहे. ….कितीही प्रचंड आणि वरवर पाहता कितीही दुस्तर संकटे का येईनात, आम्ही त्यामुळे नाउमेद होणार नाही आणि त्या कार्यामध्ये चिकाटीने प्रयत्नशील राहू. ईश्वर आमच्या सोबत आहे आणि या श्रद्धेमुळेच आमचा विजय होईल असा आमचा विश्वास आहे.. आमचा असा विश्वास आहे की, ‘ईश्वर’ आमच्या सोबत आहे आणि त्या श्रद्धेमुळे आम्ही जिंकू. आमचा असा विश्वास आहे की, मानवतेला आमची गरज आहे आणि मानवतेविषयीचे, आपल्या देशाविषयीचे, वंशाविषयीचे, आमच्या धर्माविषयीचे आमचे प्रेम आणि तिची सेवा, आमची अंत:करणे शुद्ध करेल आणि या लढ्यातील कृतीसाठी ती आम्हाला प्रेरित करेल.

– श्रीअरविंद [CWSA 08 : 23-24]

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. आजपासून आपण ते भाषण क्रमश: प्रकाशित करत आहोत.)

१५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस. हा भारतासाठी जुन्या युगाचा अंत आणि नव्या युगाचा प्रारंभ असणार आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर ती आशिया आणि अखिल विश्वासाठी देखील महत्त्वाची आहे. मानवतेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निर्धारित करण्यामध्ये ज्या शक्तीचा मोठा वाटा असणार आहे, अशा एका नव्या शक्तीचा, अकथित अशी क्षमता असलेल्या एका नव्या शक्तीचा, राष्ट्रसमूहांमध्ये प्रवेश होत असल्याचे हे द्योतक आहे.

…माझ्या जीवनामध्ये ज्या जागतिक घडामोडी पाहता याव्यात अशी माझी मनीषा होती, (जरी तेव्हा त्या स्वप्नवत वाटत होत्या) त्या मला आजच्या ह्या दिवशी फळाला येताना दिसत आहेत वा त्यांची सुरुवात तरी झाली आहे किंवा त्या त्यांच्या परिपूर्तीच्या मार्गावरती तरी आहेत.

…या निमित्ताने, माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माझ्यामध्ये ज्या ध्येयांची, आदर्शाची रुजवण झाली होती, त्या ध्येयांचा, आदर्शाच्या सार्थकतेचा प्रारंभ झालेला मला दिसत आहे, अशी व्यक्तीश: मी उद्घोषणा करू शकतो; कारण ही ध्येयधोरणं भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ही ध्येयधोरणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारताचे भावी कार्य आहे, हे असे कार्य आहे की, जेथे भारताने नेतृत्व स्वीकारणे आवश्यकच आहे. कारण मला नेहमीच असे वाटत आले आहे आणि तसे मी सांगत आलो आहे की, भारताचा उदय होतो आहे तो केवळ त्याचे स्वत:चे भौतिक हेतू म्हणजे त्याचा विस्तार व्हावा; महानता, शक्तिसामर्थ्य, समृद्धी ह्या गोष्टी त्याला साध्य व्हाव्यात म्हणून नाही, अर्थात त्याकडेही भारताने दुर्लक्ष करता कामा नये किंवा इतरांप्रमाणे इतरेजनांवर प्रभुत्व संपादन करावे म्हणूनही भारताचा उदय होत नाहीये तर ‘ईश्वरा’साठी, या जगतासाठी, अखिल मानव-वंशाला साहाय्य करण्यासाठी, त्यांचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा उदय होतो आहे. ही ध्येयं आणि आदर्श त्यांच्या स्वाभाविक क्रमाने अशी होती :
१) भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती.
२) आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान, मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे.
३) मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की, जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यत: ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल; ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल.
४) भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणारी साधने ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल.
५) सरतेशेवटी, उत्क्रांतीची एक नवीन पायरी, जी चेतनेचे उच्चतर पातळीवर उन्नयन करून, त्याद्वारे ती – मानवांनी जेव्हापासून विचार करायला आणि व्यक्तिगत परिपूर्णतेची व एका परिपूर्ण समाजरचनेची स्वप्न पाहायला सुरुवात केली तेव्हापासून मानवजातीला अस्तित्वविषयक ज्या अनेकानेक समस्यांनी गोंधळात टाकले होते, अस्वस्थ केले होते – अशा समस्यांचे निराकरण करायला सुरूवात करेल.

(क्रमश:)

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 474 – 475)

(दिनांक ०५ मार्च १९०८)

भारत हा राष्ट्रांचा गुरु आहे. मानवी जिवाला कितीही गंभीर आजार झाला असेना का, तरी त्याला त्यातून बाहेर काढणारा भारत हा धन्वंतरी आहे. जगाचे जीवन पुन्हा एकदा नवीन साच्यात ओतावे आणि मानवी चैतन्याची शांती त्याला पुन्हा एकदा गवसून द्यावी हे भारताचे नियत कार्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 906)

(ऑगस्ट १९०९)

शाश्वत धर्माचा प्रसार हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्या शाश्वत धर्मावर आधारित वंशधर्माचे आणि युगधर्माचे पालन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे….

….आम्ही आमच्या धर्माच्या मार्गापासून ढळलेलो आहोत, आमच्या ध्येयापासून दूर झालेलो आहोत; प्रमादपूर्णतेचे, घोडचुकांचे, धादांत भ्रमाचे, धार्मिक गोंधळाचे बळी ठरलेले आपण, ‘आर्य’ शिक्षण आणि त्याच्या नियामक नीतीतत्त्वांपासून वंचित ठरलो आहोत. ‘आर्य’ वंशकुळातील असूनसुद्धा, जेत्यांच्या वर्चस्वाने आणि दुःखवेदनांचे बळी ठरल्यामुळे, आपण कनिष्ठतेचा कायदा मान्य केला आहे आणि त्यामुळे त्याच्या पाठोपाठ येणारे दास्यत्वदेखील आपण मान्य केले आहे. आपण तगून राहावे, आपला टिकाव लागावा असे वाटत असेल तर आणि या कायम स्वरूपी नरकवासामधून आपली सुटका व्हावी अशी किंचितशी जरी इच्छा आपल्या मनात असेल तर, राष्ट्राची सेवा करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. आणि हे करण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे आर्य चारित्र्याची पुनर्घडण. त्यातून घडणारे ह्या मातृभूमीचे भावी सुपुत्र हे ज्ञानवंत, सत्यनिष्ठ, मानवतावादी, बंधुभावाने प्रेरित झालेले, धैर्यवान, विनम्र असतील. संपूर्ण राष्ट्राला, विशेषत: या देशातील तरुणांना, पुरेसे शिक्षण, उच्च आदर्श आणि ज्यामधून हे आर्य आदर्श उदयाला येऊ शकतील असा कार्याचा मार्ग प्रदान करणे हे आपल्यासमोरील पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. आणि असे करण्यामध्ये जोवर आम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत शाश्वत धर्माचा प्रचारप्रसार करणे म्हणजे नापीक जमिनीमध्ये बी पेरण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 191-192)

(दिनांक : १९ जून १९०९)

प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ‘ईश्वरा’चे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला आमचे असे सांगणे आहे की, “जर तुमची मने युरोपियन कल्पनांनी भारलेली असतील, जर तुम्ही आपल्या जीवनाकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहत असाल, तर वरील ध्येये तुम्ही स्वत:पुढे ठेवू शकणार नाही; ती साध्य करून घेणे तर दूरच. भौतिक दृष्टीने पाहिले असता तुम्ही कोणीच नाही परंतु, आध्यात्मिक दृष्टीने पाहता तुम्ही सर्वकाही आहात. भारतीय मनुष्यच केवळ सर्व गोष्टींवर खरा विश्वास ठेवू शकतो, कोणतेही कार्य करावयास धजतो, सर्वस्वाचा त्याग करू शकतो. पण त्याकरता प्रथम भारतीय व्हा. आपल्या पूर्वजांचा वारसा परत मिळवा. ‘आर्य’ विचार, ‘आर्य’ प्रणाली, ‘आर्य’ शील व ‘आर्य’ जीवन पुन्हा संपादन करा. ‘वेदान्त’, ‘गीता’, ‘योग’ ह्या गोष्टी पुनश्च प्राप्त करून घ्या. केवळ बुद्धीने अथवा भावनेने नव्हे, तर तुमच्या प्रत्यक्ष जीवनात त्या आत्मसात करा, त्यांचे आचरण करा. म्हणजे तुम्ही थोर, समर्थ, बलाढ्य, अजिंक्य आणि निर्भय व्हाल. जगण्याची किंवा मरणाची भीती तुम्हाला वाटणार नाही. अडचण आणि अशक्य हे शब्द तुमच्या शब्दकोषात राहणार नाहीत. कारण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जे सामर्थ्य असते ते शाश्वत असते. बाह्य साम्राज्य मिळविण्यापूर्वी हे तुमचे आत्मसाम्राज्य, आंतरिक ‘स्व-राज्य’ तुम्ही प्रथम परत मिळवा. तुमचे अंतरंग हे ‘मातृदेवते’चे निवासस्थान आहे. तिने तुम्हाला सामर्थ्य प्रदान करावे म्हणून तुम्ही ‘तिची’ प्रार्थना करावी यासाठी ती वाट पाहत आहे. ‘तिच्या’वर निष्ठा ठेवा, ‘तिची’ सेवा करा, तुमच्या सर्व इच्छा ‘तिच्या’ इच्छेशी एकरूप करा. तुमचा वेगळा असलेला अहं राष्ट्राच्या अहंमध्ये विसर्जित करून टाका. तुमचा विभक्त स्वार्थ मानवजातीच्या सेवेत विलीन होऊ द्या. तुमच्या अंत:करणातील सर्व सामर्थ्याचा मूळ स्रोतच हस्तगत करून घ्या. म्हणजे मग सामाजिक दृढता, बौद्धिक श्रेष्ठत्व, राजकीय स्वातंत्र्य, मानवी विचारांचे स्वामित्व, जगाचे नेतृत्व – सर्वकाही तुम्हाला दिले जाईल.”

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 27-28)

(दिनांक : १९ जून १९०९)

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला आम्ही मानतो आणि त्याचे अनुसरण करतो. आमचे मानवतेला असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वाच्या वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक खोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या ह्या आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील; केवळ निसर्गाच्या शक्ती आरामदायक अशा सुखसोयींच्या सेवेत जुंपून ह्या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रीतीने विजय मिळवीत, माणसाचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करत, बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच ह्या समस्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. या कार्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करीत आहे. आणि हा दावा मानवतेच्या भल्यासाठी आहे, यात इंग्लडला सुद्धा वगळलेले नाही, अशा या मानवतेच्या भल्यासाठी भारताने हा दावा प्रस्थापित केलाच पाहिजे.”

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 27)

(दिनांक : १७ सप्टेंबर १९०६)

आपला इतिहास हा इतर लोकांच्या इतिहासापेक्षा अनेक बाबतीत भिन्न राहिलेला आहे. भारतीय लोकांची जडणघडण ही जगामध्ये एकमेवाद्वितीय अशी आहे. विविध जातीजमातींची लोकं एकत्रित आल्यामुळे, त्यांच्यामध्ये अभिवृद्धी होत होत राष्ट्रांचे विकसन होत गेले, ही आधीची प्रक्रिया होती. परंतु, भारत हा केवळ विविध जातीजमातींच्या एकत्र येण्याचे स्थान नसून, तो अशा विकसित राष्ट्रांच्या एकत्र येण्याचे स्थान आहे, की जी राष्ट्र सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या स्वत:च्या वाटांवरून विकसित होत गेली आहेत; त्यांना त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या मूळ जाती आहेत आणि त्यांची त्यांची स्वत:ची अशी खास संस्कृती आहे. त्यामुळे, आगामी भारत राष्ट्राचे चारित्र्य आणि त्याची जडणघडण ही युरोपियन राष्ट्रांपेक्षा भौतिकदृष्ट्या पूर्ण वेगळी असेल; कारण तौलनिकदृष्ट्या विकसनाच्या अगदी अस्पष्ट अशा अवस्थेत असतानाच, अगदी सुरुवातीलाच, या राष्ट्रांच्या एकीकरणाची प्रक्रिया घडून आली होती. आपल्या बुरसटलेल्या विचारसरणीच्या राजकारण्यांना आणि सामाजिक सुधारणावादी लोकांना या वास्तवाचा विचार करण्यासाठी अजून पुरेसा अवधी मिळालेला दिसत नाही आणि अगदी आत्तादेखील, की जेव्हा आम्ही त्याकडे निर्देश केलेला आहे, अगदी शक्य तेवढ्या सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये ती गोष्ट मांडली आहे तरीदेखील, आपल्या बाल्यावस्थेतील राष्ट्रीय जीवनाची ही मूलभूत विशिष्टता ओळखण्यासाठी लागणारा धीर त्यांच्याकडे असेल, अशी आशाच आम्हाला वाटत नाही. ज्याला संघराज्य असे म्हणता येईल अशा दिशेने भारताची राष्ट्रीयत्वाची वाटचाल होत राहील, ती त्याद्वारे मूर्त रूप धारण करेल. ते वेगवेगळे राष्ट्रीयत्व असणाऱ्या, आणि संघटना व आदर्श या दोन्ही बाबतीत स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण घटक जतन करणाऱ्या राष्ट्रांचे एकीकरण असेल. ती राष्ट्रे इतरांमध्ये ज्या विचाराची वा चारित्र्याची उणीव आहे त्यांबाबत त्यांच्याशी संपर्क साधतील आणि सर्व मिळून एकत्रितपणे नागरिक आणि सामाजिक जीवनाच्या दृष्टीने, एकाच वैश्विक साध्याच्या दिशेने प्रगत होतील; ती राष्ट्रं आपापल्या ऐतिहासिक आणि पारंपरिक दिशेने त्याच साध्याप्रत हळूहळू प्रगत होत राहतील. आणि ती अशा रीतीने अनंतपणे आणि त्याचबरोबर तितक्याच अनंतकाळासाठी, एकमेकांच्या जवळजवळ येत असल्याने, जुन्या असो की नव्या, कोणत्याच एकच एक अशा विशिष्ट जीवनरूपामध्ये ती त्यांचे अस्तित्व पूर्णपणे गमावणार नाहीत. महान आणि महाप्रतापी अशा भारत राष्ट्रामध्ये एकत्रित येण्यासाठी भारतातील मुस्लिम, हिंदु, बौद्धधर्मीय, ख्रिश्चन यांनी त्यांचे त्यांचे ‘मुस्लिम’, ‘हिंदु’, ‘बौद्धधर्म’ किंवा ‘ख्रिस्ती’ धर्म सोडून देण्याची आवश्यकता नाही. स्वत:चे आदर्श आणि स्वत:चा समाज यांबद्दलची निष्ठा, तसेच समाजाच्या इतर घटकांच्या आदर्शाबद्दलची व संस्थांबद्दलची सहिष्णुता आणि आदर आणि सर्वांच्या सामायिक नागरीय जीवन व आदर्शाविषयी उत्कट प्रेम व आस्था ह्या गोष्टीच भारताच्या खऱ्या राष्ट्रउभारणीसाठी आता आपण विकसित केल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 168-169)

(डिसेंबर १९०९)

‘आपली माता’ ह्या स्वरूपात आम्हाला देशाचे दर्शन घडत नाही, हा आपला मुख्य अडथळा आहे. आमच्यापैकी बहुतांशी राजकारणी ‘भारतमाते’चे पूर्ण आणि जवळून दर्शन घेण्यामध्ये अक्षम ठरले आहेत. रणजितसिंग किंवा गुरु गोविंद सिंग ह्यांना भारतमातेऐवजी ‘पंचनद्यां’च्या ‘भूमाते’चेच दर्शन झाले. शिवाजीमहाराज किंवा बाजीराव पेशवे यांना भारतमातेऐवजी, ‘हिंदूंची माता’ या स्वरूपात तिचे दर्शन झाले. इतर महाराष्ट्रीय मुत्सद्द्यांनी फक्त ‘महाराष्ट्रातील लोकांची माता’ या स्वरूपातच तिच्याकडे पाहिले. वंगभंगाच्या काळामध्ये, आम्हाला ‘बंगाल-माते’च्या स्वरूपात तिचे दर्शन होण्याचे भाग्य लाभले, ते एकात्मतेचे दर्शन होते आणि त्यामुळे बंगालची भावी एकात्मता आणि प्रगती सुनिश्चित आहे. पण ‘भारतमाते’ची एकात्म प्रतिमा अजूनही साकार व्हायची आहे. आम्ही काँग्रेसमध्ये ज्या ‘भारतमाते’चे स्तुतिगान करायचो, आराधना करायचो ती पाश्चात्त्य पेहरावातील, ब्रिटिश राजवटीची उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली एक दासी होती, एक सखी होती, ती काल्पनिक मूर्ती होती, ती अदैवी (undivine) असा भ्रम होती. खरंच ती आमची माता नव्हती. पण त्याहीवेळी, एका निगूढ, धूसर अशा अंधारात लपून असलेली आमची ‘खरी माता’च आमचा आत्मा व आमचे अंत:करण वेधून घेत होती. ज्या दिवशी आपण भारतमातेची खरीखुरी अखंड प्रतिमा पाहू शकू, जेव्हा तिच्या सौंदर्याने आणि कृपाशीर्वादाने मोहित होऊन, आपण आपली जीवने तिच्या सेवेमध्ये मोठ्या आतुरतेने समर्पित करू, तेव्हा हा अडथळा दूर होईल आणि भारताची एकात्मता, स्वातंत्र्य आणि प्रगती ह्या गोष्टी साध्य करण्यास सोप्या झालेल्या असतील. भाषाभाषांमधील भेद हे तेव्हा आपल्यामध्ये दरी निर्माण करणार नाहीत. हिंदी भाषेचा मध्यस्थ भाषा म्हणून स्वीकार केल्याने, परंतु तरीही आपापल्या प्रादेशिक भाषांचा यथोचित सन्मान केल्याने, आपली अक्षमतेपासून सुटका होईल. ‘हिंदु-मुस्लीम’ संघर्षावरील खराखुरा उपाय शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. ‘माता’ म्हणून देशाचे दर्शन होत नसल्यामुळे, या अडथळ्यांना भेदून जावे ही आस आमच्यामध्ये पुरेशा तीव्रतेने, गांभीर्याने जाणवत नाही. आणि म्हणूनच ते अडथळे भेदण्याचे मार्गही आम्हाला आजवर गवसलेले नाहीत आणि संघर्ष अधिकाधिकच उग्र रूप धारण करत चालला आहे. आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती ‘भारतमाते’च्या खऱ्याखुऱ्या अखंड प्रतिमेची! पण, खऱ्याखुऱ्या दर्शनाऐवजी त्याच्या आभासालाच भुलून, जर का आपण केवळ हिंदुंची माता, किंवा हिंदु राष्ट्रवाद ही कल्पना जोपासली तर आपण पुन्हा एकदा त्याच जुन्या चुकांच्या भक्ष्यस्थानी पडू आणि ‘राष्ट्रवादा’च्या पूर्ण उन्मीलनापासून स्वत:ला वंचित ठेवू.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 225-226)

(इसवी सन : १९०७-१९०८)

राष्ट्र म्हणजे काय? आम्ही पाश्चात्त्य देशांमधील शाळांमध्ये शिकलो आहोत आणि स्वत:च्या सखोल संकल्पना, अधिक सत्य असणारी वाणी विसरून पाश्चात्त्यांची भाषा, त्यांचे विचार यांचे अनुकरण करावयास शिकलो आहोत. पाश्चात्त्यांच्या लेखी, राष्ट्र म्हणजे देश, अमुक एवढ्या जमिनीवर वास्तव्य करणारी काही लाख माणसं, की जी एकच भाषा बोलतात, त्यांनी निवडलेल्या एकाच नियामक सत्तेशी एकनिष्ठ राहत, एकसारखेच राजकीय जीवन जगत राहतात. परंतु, भारताची राष्ट्रीयतेची कल्पना अधिक सत्य आणि अधिक सघन असावयास हवी.

आपल्या पूर्वजांनी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तेव्हा त्यांना वस्तुमात्रांचा एक स्थूल देह दिसला, त्याच्या आत असणाऱ्या सूक्ष्म देहाचा शोध त्यांना लागला, त्याच्याही पलीकडे जात, त्याच्याही पलीकडे अजून एका अधिक खोलवर दडून असलेल्या आणि तिसऱ्या देहाच्याही आतमध्ये असलेला, जीवनाचा आणि त्याच्या रूपाचा ‘स्रोत’ सदासाठी, अचल आणि अविनाशी अशा स्वरूपात तेथे स्थित आहे असे त्यांना आढळून आले. जे व्यक्तित्वाबाबत सत्य आहे तीच गोष्ट सामान्यत: आणि वैश्विक स्तरावर देखील सत्य आहे. जे माणसाबाबत सत्य आहे अगदी तेच राष्ट्राबाबतही सत्य आहे.

देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह, त्याचा ‘अन्नमय कोश’ असतो, किंवा त्याला स्थूल शारीरिक देह असे म्हणता येईल. माणसांच्या समुहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा देह व्यापून जातो आणि ते सारे केवळ त्यांच्या अस्तित्वांद्वारेच या देहामध्ये प्राणाची फुंकर घालतात, तो हा ‘प्राणमय कोश’, म्हणजे राष्ट्राचा प्राणदेह होय. हे दोन्ही देह स्थूल आहेत, ‘माते’चे ते भौतिक आविष्करण असते. स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो, विचार, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसिक आणि भावनिक क्रियाकलाप, आशा, सुख, आकांक्षा, परिपूर्ती, सभ्यता आणि संस्कृती ह्या साऱ्या साऱ्यांतून राष्ट्राचे ‘सूक्ष्म शरीर’ आकाराला येते. मातेच्या जीवनाचा हा भागही असा असतो, जो साध्या डोळ्यांनी देखील दिसतो.

राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या ‘कारण शरीरा’मध्ये जे खोलवर दडलेले अस्तित्व असते त्यामधून उदयाला येतो, युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांमधून जी विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली असते, जी त्या राष्ट्राला इतरांपासून वैशिष्ट्यपूर्ण बनवते. ‘माते’चे हे तीन देह आहेत. परंतु त्या तिन्हीच्याही पलीकडे तिच्या जीवनाचा एक ‘उगमस्त्रोत’ आहे, जो अमर्त्य, अचल असा आहे; प्रत्येक राष्ट्र हे त्याचे केवळ आविष्करण असते, त्या वैश्विक ‘नारायणा’चे, ‘अनेकां’मध्ये वास करणाऱ्या ‘एका’चे ते आविष्करण असते, आपण सर्व जण त्याचीच बालकं आहोत.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 1115-1116)

जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते ह्या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणले गेलेले साहित्य हयांतील वेगळेपण पाहू शकत आहेत. Read more