Posts

मांजरीचे एक छोटेसे पिल्लू होते. मांजरीने त्याला तोंडात धरलेले होते. पण अचानक त्या पिल्लाने तिच्या तोंडातून बाहेर उडी मारली आणि ते पिल्लू विंचवाबरोबर खेळू लागले. पिल्लाने त्या विंचवाबरोबर खेळण्याला मांजरीचा विरोध होता; पण त्याने तिचे काही ऐकले नाही. आणि मग विंचवाने त्याच्या स्वभावाप्रमाणे मांजरीच्या त्या पिल्लाला दंश केला. ते किंचाळले, ओरडू लागले.

ते धावतपळत आईकडे आले आणि त्याने तिला त्या विंचवाविषयी सर्वकाही सांगितले.

तेव्हा मांजरीने विचारले, ”मग तू मला सोडून का पळालास?”

विरोधी शक्ती या विंचवाप्रमाणे असतात. त्या खरोखरच अनिष्ट असतात. मात्र तुम्ही जर त्यांच्याकडे लक्ष दिले नाहीत किंवा त्यांचे ऐकले नाहीत तर, त्या विरोधी शक्तींचा नाश करता येणे शक्य असते. विरोधी शक्ती जेव्हा चुकीच्या सूचना देतात तेव्हा माणसांनी सातत्याने त्यांना नकार दिला पाहिजे. नाहीतर मग या विरोधी शक्ती सर्वच गोष्टींचा विनाश घडवून आणतील…

राग, तिटकारा, अगणित इच्छावासना आणि त्यासारख्या अनेक वायफळ गोष्टींच्या माध्यमातून, या विरोधी शक्ती माणसांच्या मेंदूपर्यंत कशा जाऊन पोहोचतात ते मला माहीत आहे. सर्वप्रथम, राग पायांना पकडतो, मग हळूहळू तो वर नाभीपर्यंत जाऊन पोहोचतो, तेथून हृदयापर्यंत आणि सरतेशेवटी मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यातून माणसांचे अतोनात नुकसान होते. एकदा का राग मेंदूपर्यंत गेला की मग, माणसाला स्वत:वर ताबा ठेवणे कठीण होऊन बसते. म्हणून तो आत येण्यापासूनच त्याला अडवले पाहिजे. म्हणजे मग त्यावर मात करणे सोपे होते.

– श्रीमाताजी
(Mother you said so : 11.01.63)

व्यक्ती जर दुर्बल नसेल तर ती कधीच हिंसक होणार नाही. दुर्बलता आणि हिंसा या दोन गोष्टी हातात हात घालून जातात. आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, जो माणूस खरोखर बलवान असतो तो कधीही हिंसक नसतो. हिंसा ही नेहमीच कोठेतरी दुर्बलता असल्याचे लक्षण असते. एखादा पीळदार स्नायू असणारा दणकट माणूस स्वतःच्या सर्व ताकदीनिशी दुसऱ्या एखाद्या माणसाला ठोसे लगावत असतो, तेव्हा ते पाहिल्यावर आपण मनात म्हणतो की, “तो माणूस किती बलवान आहे.” पण हे खरे नाही. त्याच्याकडे भलेही पीळदार स्नायू असतील पण तो नैतिकदृष्ट्या दुर्बल असतो. त्यामुळे तो येथे बलवान तर दुसरीकडे दुर्बल असू शकतो. आणि बहुधा हे असेच घडते.

…क्षोभ, हिंसा, क्रोध या गोष्टी नेहमीच निरपवादपणे दुर्बलतेच्या द्योतक असतात. आणि विशेषतः व्यक्ती जेव्हा त्या भरात वाहवत जाऊन, नको नको ते बोलते, तेव्हा ते खरोखरच भयानक मानसिक दुर्बलतेचे – मानसिक आणि प्राणिक (mental and vital) दुर्बलतेचे लक्षण असते – भयानक दुर्बलतेचे लक्षण असते. तुम्ही असे असाल तर, कदाचित या जगातील सगळे अपमान तुम्हाला ऐकावे लागतील, लोक तुम्हाला शक्य तेवढ्या मूर्खपणाच्या सगळ्या गोष्टी सांगत राहतील; मात्र तुम्ही जर कमकुवत नसाल तर, त्याकडे बघून बाह्यतः तुम्ही हसणारही नाही कदाचित, कारण हसणे ही काही प्रत्येक वेळीच चांगली गोष्ट असते असे नाही, पण खोलवर, आत तुम्ही हसत असता आणि ती गोष्ट तशीच जाऊ देता, ती गोष्ट तुम्हाला स्पर्श करत नाही… साधी गोष्ट आहे, तुम्ही जर तुमच्या मनाला शांत राहण्याची सवय लावून घेतली असेल आणि तुम्हाला जर का तुमच्या अंतरंगात असलेल्या सत्याची जाणीव असेल तर, तुम्ही काहीही ऐकून घेऊ शकता (आणि तरीही त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही.) एखादा हलकासा तरंगदेखील उमटत नाही; सारे काही अगदी अचल, शांत, स्थिर असते. आणि आपण मगाशी बोललो तसे, आपल्यामध्ये असणारा साक्षी जर या साऱ्या हास्यास्पद गोष्टींकडे पाहत असेल, तर तो त्याकडे पाहून नक्कीच हसतो.

पण दुसऱ्या व्यक्तीने स्वत:चा सारा राग, स्वत:चा उद्रेक तुमच्यावर काढला असेल तेव्हा जर, तुमच्यामध्येही तुम्हाला काही तरंग जाणवले तर… (सुरुवातीला कधीकधी होते असे…) अचानकपणे तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देता, आणि तुम्हीही त्याच्यासारखेच चिडता, रागावता; तेव्हा निश्चितपणे असे समजा की, तुम्हीसुद्धा त्याच्या इतकेच कमकुवत आहात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 372-373)