Posts

विचारशलाका १८

 

एकदा का तुम्ही आंतरिक रूपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जिवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत (subconscient) प्रवास केलात तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात.

 

आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

 

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (तसे असेल तर ते जास्तच घातक असते.) किंवा असे काही लोक असतात की, जे इतरांच्या संपर्कात आल्यावर भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

 

तुम्ही जेव्हा सदिच्छा बाळगता, तेव्हा तुम्ही बाह्यत: या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की, या गोष्टी वारंवार वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

 

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे आता तुम्हाला कळू लागते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

 

तुमच्याकडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष (psychic being) जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशेला वळविण्यासाठी एखादा संकेत, कोणती तरी मदत, एखादा आधार पुरविण्यात येतो.

 

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जिवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करायला सुरुवात केलीत तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू (अज्ञातात) कोणीतरी, सगळेमिळून सर्वकाही घडवत आहेत असे तुम्हाला वाटू लागते. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळदेखील तुम्हाला दिसू लागते : “अरे! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर’’, “अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे’’; “खरंच, माझी आजी अशी होती’’, “माझे आजोबाही असे होते;” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

 

तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकता, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या बेड्या तुम्ही तोडून टाकाल आणि तुमच्या मार्गावरून तुम्ही अगदी मुक्तपणे पुढे जाल. तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 261-262]