Posts

विचारशलाका १७

साधक : ज्याला स्वत:ची शारीरिक अवस्था सुधारण्याची इच्छा आहे, ज्याला उपचाराचा परिणाम दिसून यावा असे वाटते किंवा जो स्वत:च्या शारीरिक कमतरतेवर उपाय करू पाहतो त्याने काय केले पाहिजे? जो बदल घडून येणे अपेक्षित आहे त्याच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित करून, त्याने स्वत:ची इच्छाशक्ती उपयोगात आणावी की, केवळ ते घडून येईलच अशा खात्रीने जगत राहावे की, ‘ईश्वरी शक्ती’ योग्य वेळ आली की, योग्य मार्गाने अपेक्षित तो परिणाम घडवून आणेलच असा विश्वास बाळगावा?

श्रीमाताजी : एकच गोष्ट करण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत आणि त्यातील प्रत्येक मार्ग हे भिन्नभिन्न परिस्थितीमध्ये परिणामकारक ठरतात. यापैकी कोणती पद्धत तुम्हाला लागू पडेल, हे तुमच्यामध्ये विकसित झालेल्या चेतनेवर आणि कोणत्या स्वरूपाच्या शक्ती तुम्ही कार्यरत करू शकता यावर अवलंबून आहे.

तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात किंवा तुमच्यामध्ये अपेक्षित बदल घडून आला आहे अशा चेतनेमध्ये तुम्ही राहू शकता आणि तुमच्या आंतरिक रचनाशक्तीद्वारे बाह्य अवस्थेमध्ये देखील हळूहळू तो बदल घडवून आणू शकता. किंवा त्या गोष्टींवर परिणाम करू शकतील अशा शक्ती कोणत्या याची दृष्टी जर तुम्हाला असेल, तुम्ही जर ते जाणून घेऊ शकलात आणि त्या हाताळण्याचे कौशल्य जर तुमच्यापाशी असेल तर तुम्ही त्यांना खाली बोलावू शकता आणि ज्या भागांमध्ये कार्य होणे आवश्यक आहे तेथे त्या शक्ती उपयोगात आणू शकता; असे केलेत तर त्या शक्तीद्वारे तो बदल घडवून आणला जाईल. किंवा तुम्ही तुमची समस्या ‘ईश्वरा’समोर मांडलीत आणि त्यावर उपाय करावा म्हणून ‘ईश्वरी शक्ती’वर पूर्णपणे भरवसा ठेवून विनवणी केलीत तर, तेव्हाही तो बदल घडवून आणला जाईल.

पण जरी तुम्ही यांपैकी काहीही केलेत, कोणतीही प्रक्रिया अवलंबलीत आणि त्याबाबतचे आत्यंतिक कौशल्य व शक्तीदेखील तुम्हाला प्राप्त झालेली असली तरीदेखील, त्याचे फळ मात्र तुम्ही त्या ‘ईश्वरा’च्या हाती सोपविले पाहिजे. तुम्ही नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत परंतु तुमचे ते प्रयत्न सफल होणार का निष्फळ होणार हे ‘ईश्वरा’च्या हाती असते. तेथे तुमची वैयक्तिक शक्ती खुंटलेली असते; जर परिणाम दिसून आला तर तो परिणाम तुमच्यामुळे नसून, ‘ईश्वरी शक्ती’मुळे घडून आलेला असतो.

तुम्ही असे विचारले आहे की, ‘ईश्वरा’कडे अशा प्रकारच्या गोष्टींची मागणी करणे योग्य आहे का? नैतिक दोषांचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’ची विनवणी करण्याच्या तुलनेत, शारीरिक अपूर्णतेचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे अधिक बरे. अर्थात, तुम्ही कशाचीही मागणी करत असाल, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी, अगदी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करत असतानादेखील, किंवा तुमचे ज्ञान उपयोगात आणतानादेखील किंवा शक्तीचा वापर करत असतानादेखील तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे की, त्याचा परिणाम दिसून येणे ही गोष्ट ‘ईश्वरी कृपे’वर अवलंबून असते.

एकदा तुम्ही ‘योगमार्ग’ स्वीकारलात की, मग तुम्ही जे काही कराल ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने केले पाहिजे. “मी माझ्यामधील अपूर्णता घालविण्याचे यथाशक्य सर्व प्रयत्न करत आहे, मी माझ्यापरीने सर्वाधिक प्रयत्न करत आहे, मी माझ्यामध्ये सुधारणा व्हावी अशी आस बाळगत आहे पण त्याच्या फलनिष्पत्तीसाठी मी स्वत:ला पूर्णत: त्या ईश्वराच्या हाती सोपवत आहे;” असा तुमचा भाव असला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 96-97]

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय?

श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे म्हणून ? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून?

परंतु, योगमार्ग स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत : तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का ? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

ईश्वराविषयीची तळमळ, अभीप्सा (Aspiration) हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे.

पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करावयाचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत राखायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते एकाग्रतेची, ईश्वरावरील एकाग्रतेची ! ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांसाठी समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ईश्वराच्या ठिकाणी एकाग्रता करणे आवश्यक असते.

हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या जाणिवेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, अगदी तळाशी जाऊन बसा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यात एक अग्नी तेवत आहे. तोच तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व, तोच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची अन्य केंद्रदेखील आहेत, उदाहरणार्थ, एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये)! प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र असा प्रभाव असतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (पुरुष) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामधूनच उत्पन्न होतात – रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)