Posts

विचार शलाका – १७

आपला आदर्श वास्तवात उतरविण्यासाठी म्हणून ज्यांना स्वत:च्या क्षणभंगुर असणाऱ्या अशा संपूर्ण अस्तित्वाचा पुरेपूर लाभ करून घ्यायचा आहे त्यांनी सद्य घडीस स्वत:कडे असलेल्या समाधानाचा त्याग कसा करायचा हे जाणून घेणे ही एक मोठी कला आहे.

यशस्वी व्यक्तींच्या अनेकविध श्रेणी असतात. त्यांच्या आदर्शाच्या कमीअधिक व्यापकतेवर, उदात्ततेवर, जटिलतेवर, शुद्धतेवर, प्रकाशमानतेनुसार त्या श्रेणी ठरतात. एखादी व्यक्ती भंगारमालाच्या व्यवसायात ‘यशस्वी’ होईल तर, एखादी व्यक्ती या विश्वाचा स्वामी म्हणून ‘यशस्वी’ होईल किंवा एखादी व्यक्ती सिद्ध तपस्वी म्हणून ‘यशस्वी’ होईल; ही उदाहरणे अगदी वेगवेगळ्या पातळीवरची असली तरी, या तिन्ही उदाहरणांबाबत, व्यक्तीचे स्वत:वर कितपत समग्रपणे आणि कितपत ठोस प्रभुत्व आहे यावर ते ‘यश’ अवलंबून असते.

…ज्या व्यक्तीच्या इच्छांची परिपूर्ती पूर्णतया झालेली आहे, ज्या व्यक्तीने तिला स्वत:ला जे प्राप्त करून घ्यावयाचे होते ते साध्य केलेले आहे अशी व्यक्ती आणि एखादी अशी व्यक्ती की जिला काहीच साध्य झालेले नाही अशा टोकाच्या दोन व्यक्तींच्या दरम्यान अपरिमित असे मधले टप्पे असतात. ही व्याप्ती खरोखर खूपच जटिल असते कारण केवळ आदर्शाच्या प्राप्तीमध्येच फरक असतो असे नाही तर, खुद्द आदर्शाच्या प्रतवारीमध्ये देखील खूप फरक असतो. काही आकांक्षा या अगदी वैयक्तिक आवडीनिवडी, अगदी भौतिक, भावनिक वा बौद्धिक आवडीनिवडी अशाप्रकारच्या असतात; तर काही अधिक व्यापक, सामूहिक वा उच्चतर ध्येय गाठणे अशा प्रकारच्या असतात आणि काही तर अगदी अतिमानवी म्हणता येतील अशा असतात. म्हणजे अशा की, शाश्वत ‘सत्य’, शाश्वत ‘चेतना’ आणि शाश्वत ‘शांती’ यांच्या भव्यतेमुळे जी शिखरे खुली होतात ती कवळण्याची त्यांची अभीप्सा असते. व्यक्तीने जे ध्येय निवडले आहे त्याच्या व्यापकतेच्या आणि त्याच्या खोलीच्या प्रमाणात व्यक्तीच्या प्रयत्नांची आणि परित्यागाची ताकद असणार, हे सहज समजण्यासारखे आहे. ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे त्याग, त्यांचे स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला, व्यक्तीमध्ये असणाऱ्या त्यागाची आणि आत्मनियंत्रणाची एकत्रित ताकद ह्यांचा परिपूर्ण असा समतोल फारच क्वचित आढळून येतो.

अगदी खालच्या स्तरापासून ते अगदी परमोच्च स्तरापर्यंत पाहिले तरीही फारच कमी वेळेला असा समतोल साधलेला आढळून येतो.

जेव्हा व्यक्तीच्या घडणीमध्ये अशा प्रकारचा परिपूर्ण समतोल आढळून येतो तेव्हा अशी व्यक्ती, या पार्थिव अस्तित्वाचा शक्य तेवढा पुरेपूर लाभ करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 121-122)