आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०९)
‘ईश्वरी उपस्थिती’ आणि ‘दिव्य चेतने’मध्ये प्रवेश करणे आणि त्याने परिव्याप्त होणे हे या योगाचे (पूर्णयोगाचे) उद्दिष्ट आहे; ‘ईश्वरा’वर केवळ ‘ईश्वरा’साठीच प्रेम करणे, आपली प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी मिळतीजुळती करणे, मेळविणे आणि आपली इच्छा, आपली कर्मे, आपले जीवन हे सारे ‘ईश्वरा’चे साधन बनवणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. महान योगी बनणे किंवा अतिमानव (Superman) बनणे (काळाच्या ओघात तसे घडेलही) किंवा अहंकाराच्या शक्तीसाठी, अभिमानासाठी किंवा सुखासाठी ‘ईश्वरा’ला आपलेसे करणे, हे काही या योगाचे उद्दिष्ट नाही. या योगाद्वारे मुक्ती मिळत असली तरीही हा योग ‘मोक्षा’साठी नाही, किंवा यामधून इतरही साऱ्या गोष्टी साध्य होत असल्या तरीपण, त्या गोष्टी हे आपले उद्दिष्ट असता कामा नये. एकमेव ‘ईश्वर’ हेच आपले उद्दिष्ट आहे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)