Posts

आमच्या हृदयांत गुप्त असलेला आंतरिक मार्गदर्शक, जगद्गुरू हा पूर्णयोगाचा श्रेष्ठ मार्गदर्शक आणि गुरु आहे. हा आंतरिक जगद्गुरू आपल्या ज्ञानाच्या तेजस्वी प्रकाशाने आमचा अंधकार नाहीसा करतो; हा प्रकाश आमच्या ठिकाणी, या आंतरिक जगद्गुरूच्या वाढत्या वैभवाच्या आत्माविष्काराचे रूप घेतो. हा गुरु आमच्या ठिकाणी क्रमाक्रमाने त्याचे स्वाभाविक स्वातंत्र्य, आनंद, प्रेम, सामर्थ्य आणि अमृतत्व अधिकाधिक प्रमाणात व्यक्त करतो. तो आपले स्वतःचे दिव्य उदाहरण आमच्या मानवी पातळीच्या वरती आमचे साध्य म्हणून ठेवतो; त्याचे ध्यान आमची कनिष्ठ प्रकृती करते, आणि अंतिमत: ती ज्याचे ध्यान करते त्याची जणू प्रतिमूर्तीच बनून जाते. तो स्वत:चे अस्तित्व आणि त्याचा प्रभाव आमच्यामध्ये ओतून, विश्वात्मक ईश्वराशी आणि विश्वातीत ईश्वराशी एकरूपता प्राप्त करून देण्याची क्षमता आमच्या ठायीं निर्माण करतो.

या आंतरिक गुरुची कार्यरीती, कार्यपद्धती कोणती असते? तर त्याला कोणतीच एकच एक पद्धती नसते; व सर्व पद्धती ह्या त्याच्याच आहेत हे या प्रश्नाचे उत्तर आहे.

प्रकृतीत ज्या उच्चतम प्रक्रियांची व व्यापारांची पात्रता असेल, त्या प्रक्रियांचे व व्यापारांचे स्वाभाविक संघटन ही त्या गुरूची कार्यपद्धती आहे. क्षुद्रांत क्षुद्र तपशिलाच्या गोष्टी, अगदी महत्त्वशून्य दिसणाच्या क्रिया आणि सर्वात मोठ्या गोष्टी व क्रिया यांच्याकडे या पद्धतीत सारख्याच काळजीने, सारख्याच बारकाईने लक्ष दिले जाते आणि या सर्वांना शेवटी प्रकाशाच्या क्षेत्रात उचलून घेऊन त्यांचे परिवर्तन घडवून आणण्यात येते. कारण ह्या आंतरिक गुरुच्या योगामध्ये उपयोगात येऊ शकणार नाही इतकी कोणतीच गोष्ट क्षुल्लक नाही व मिळवण्यासाठी धडपडावे एवढी कोणतीच गोष्ट मोठीदेखील नाही. जो ईश्वराचा सेवक आणि शिष्य आहे, त्याला गर्व वाहण्याचे, मी मी म्हणण्याचे काहीच कारण नसते; कारण त्याच्यासाठी सर्व काही करण्याची व्यवस्था वरून होत असते. त्याचप्रमाणे या सेवक शिष्याला स्वतःच्या वैयक्तिक दोषांमुळे, स्वतःच्या प्रकृतीतील अडचणींमुळे निराश होण्याचा अधिकार नसतो, कारण त्याच्या ठिकाणी कार्य करणारी शक्ति ही अ-वैयक्तिक (Impersonal) किंवा अति-वैयक्तिक (Superpersonal) आणि अनंत (Infinite) अशी असते.

आमच्या अंतरंगातील गुरू ज्या पद्धतीचा वापर करतो त्याच पद्धतीचा वापर यथाशक्य पूर्णयोगाचा गुरू करत राहील. अर्थात शिष्याची प्रकृती पाहून त्या प्रकृतीला धरूनच पूर्णयोगाचा गुरु त्याला मार्गदर्शन करीत जाईल.

गुरूला तीन साधने उपलब्ध असतात. शिष्याला शिकवण देणे, आपले उदाहरण शिष्यासमोर ठेवणे, आपला मूक प्रभाव शिष्यावर पडेल असे करणे. गुरूने आपली अस्मिता, आपली मते शिष्यावर लादावी, शिष्याने आपले मन मोकळे ठेवून गुरु देईल ते, त्यांत विचार न करतां मान्य करून साठवावे, असा भलता मार्ग शहाणा गुरु सांगणार नाही; तो शिष्याच्या मनात केवळ बीज टाकील, विचाराचे उत्पादनक्षम असे खात्रीचे बीज टाकील आणि शिष्याच्या मनातील ईश्वर त्या बीजाची जोपासना करील अशी श्रद्धा ठेवील. शहाणा गुरु पाठ देण्यापेक्षा, शिष्याच्या आंतरिक शक्ति जागृत करण्याकडे अधिक लक्ष देईल. शिष्याच्या आंतरिक शक्ति, आंतरिक अनुभव स्वाभाविक प्रक्रियेने, मोकळ्या वातावरणात वाढावे असा प्रयत्न करील. तो शिष्याला एखादी कार्यपद्धति शिकवताना हे स्पष्ट करील की, ही पद्धति त्याला एक उपयुक्त उपाय म्हणून, उपयुक्त साधन म्हणून शिकवलेली आहे; तीच उपयोगांत आणली पाहिजे, ती उपयोगात आणलीच पाहिजे असे कोणतेहि बंधन त्याजवर नाहीं; तिला त्याने शिरोधार्य आचारसूत्राचे, ठाम दिनचर्येचे स्वरूप देऊ नये.

शहाणा गुरु या गोष्टीची काळजी घेईल की, शिष्याने त्याला शिकवलेल्या साधनाला मर्यादा घालणाऱ्या भिंतीचे स्वरूप देऊ नये. त्याला शिकवलेली प्रक्रिया त्याने यांत्रिक बनवून ठेवू नये. शहाण्या गुरूचे काम इतकेच राहील की, त्याने शिष्याच्या अंत:करणात दिव्य प्रकाश जागवावा, दिव्य शक्ति तेथे क्रियाशील होईल असे करावे; तो स्वत: या दिव्य प्रकाशाचा व दिव्य शक्तीचा केवळ वाहक असतो, त्यांना वाहून नेणारे केवळ शरीर असतो, त्यांच्या हातातले एक साहाय्यक साधन असतो.

गुरूने दिलेल्या पाठापेक्षा गुरूचे उदाहरण अधिक सामर्थ्यशाली असते; पण, बाह्य कृतीच्या उदाहरणाला किंवा वैयक्तिक शीलाच्या उदाहरणाला फार महत्त्व नसते. या उदाहरणांनाहि त्यांचे स्थान असते, उपयोग असतो; परंतु दुसऱ्याच्या ठिकाणी सर्वात जास्त अभीप्सा उत्तेजित करणारी मध्यवर्ति गोष्ट म्हणजे गुरूच्या ठिकाणी असलेला दिव्य साक्षात्कार, जो त्याचे सर्व जीवन, त्याची आंतरिक अवस्था व त्याच्या सर्व क्रिया नियंत्रित करतो. हा सार्वत्रिक सारभूत घटकाच्या स्वरूपाचा असतो; त्याहून दुसरे सर्व, गुरूच्या वैयक्तिक अस्मितेचा व उपाधीचा (Circumstance) भाग असतो. गुरूच्या अंतरीचा हा क्रियाशील साक्षात्कार साधक-शिष्याच्या अंतरंगाला प्रतीत व्हावयास हवा; साधक-शिष्याने आपल्या प्रकृतीनुसार हा साक्षात्कार स्वत:च्या ठिकाणी निर्माण करून अनुभवावयास हवा; गुरूच्या बाह्य वर्तनाचे अनुकरण करण्याच्या भानगडींत शिष्याने पडू नये; हे अनुकरण शिष्याच्या ठिकाणी सुयोग्य स्वाभाविक फलनिष्पत्ति करण्याऐवजी त्याच्या ठिकाणची निर्माणशक्ति शून्यवत् करील, असाच संभव अधिक आहे.

गुरूच्या उदाहरणाहून त्याच्या अस्मितेचा मूक प्रभाव हा अधिक महत्त्वाचा, सामर्थ्यवान् असतो. गुरूचा शिष्यावर बाह्यवर्ती अधिकार जो असतो त्याला आम्ही प्रभाव म्हणत नाही; गुरूच्या संपर्कात जे सामर्थ्य असते, त्याच्या केवळ उपस्थितीचे जे सामर्थ्य असते, त्याचा आत्मा दुसऱ्याच्या आत्म्याच्या निकट असल्याने त्या दुसऱ्या आत्म्यात, शब्दाचा उपयोग न करता, गुरु आपली अस्मिता व आपली आध्यात्मिक संपत्ति ज्या आपल्या मूक सामर्थ्याच्या बळावर ओततो त्या बळाला ‘प्रभाव’ असे नाव आम्ही देतो. गुरूचे हे सर्वश्रेष्ठ लक्षण आहे. श्रेष्ठ गुरु हा तितकासा पाठ देणारा गुरु नसतो; तो आपल्या भोवतालच्या सर्व ग्रहणशील साधकांमध्ये आपल्या केवळ उपस्थितीने दिव्य जाणीव ओतणारा आणि या दिव्य जाणिवेचीं घटकभूत तत्त्वे, प्रकाश, सामर्थ्य, शुद्धता आणि आनंद ओतणारा असतो.

पूर्णयोगाच्या गुरूचे आणखी एक लक्षण हे असेल की, तो आपल्या गुरुपणाची बढाई मारणार नाहीं; कारण त्याच्या ठिकाणीं सामान्य मानवाचा पोकळ डौल आणि वृथा आत्मगौरव करण्याची भावना असणार नाही. जर त्याला काही काम असेल तर, त्याची भावना अशी असेल की, ते काम ईश्वराने त्याजकडे सोपविलेले काम आहे; तो केवळ ईश्वराच्या इच्छेचा वाहक आहे, पात्र आहे, प्रतिनिधि आहे. आपल्या मानव बंधूंना मदत करणारा मानव, बालांचा नायक (नेता) असलेला एक बाल, अनेक दीप उजळणारा एक दीप, आत्म्यांना जागे करणारा एक जागृत आत्मा आहे असे तो मानील, आणि तो उच्चतम अवस्थेतील असेल तर तो ईश्वराची एक विशिष्ट शक्ति वा रूप असेल आणि तो स्वत:कडे ईश्वराच्या इतर शक्तींना येण्यासाठी हाक देणारा असेल.

– श्रीअरविन्द
(CWSA 23 : 61-62)