Posts

जर आपली प्रगती समग्रपणे व्हावी अशी आपली इच्छा असेल तर आपल्या चेतनायुक्त अस्तित्वामध्ये आपण एक बलवान आणि शुद्ध मानसिक समन्वय (Mental Synthesis) घडविले पाहिजे की, जे सर्व बाह्य प्रलोभनांपासून आपले संरक्षण करू शकेल, जे आपल्याला इतस्तत: भटकण्यापासून रोखणाऱ्या मैलाच्या दगडाप्रमाणे असेल, जीवनाच्या या हालत्याडुलत्या सागरामधून जे आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवेल.

प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तीनुसार, आवडीनिवडीनुसार आणि आकांक्षांनुसार स्वत:ची मानसिक संरचना घडविली पाहिजे. पण जर आपल्याला ती संरचना खरोखरच जिवंत आणि प्रकाशमान अशी हवी असेल तर तिची घडण आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ईश्वराचे बौद्धिक प्रतिनिधित्व करणाऱ्या संकल्पनेभोवती झाली पाहिजे. तो ईश्वरच आपले जीवन आणि तो ईश्वरच आपला प्रकाश. ही संकल्पना अनेकविध प्रांतांमध्ये, अनेकानेक युगे सर्व महान गुरुंकडून विविध प्रकारे शिकविण्यात आलेली आहे, ती अतिशय उत्कृष्टपणे शब्दबद्ध झालेली आहे.

प्रत्येकाचा आत्मा आणि या विश्वाचा महान आत्मा हे एकच आहेत; (ही ती संकल्पना होय.) आपल्या पूर्वसुरींनी योग्य असेच सांगितले आहे की, आपले मूळ आणि आपण, आपला देव आणि आपण हे एकच आहोत. आणि हे एकत्व म्हणजे एकत्वाचे केवळ कमीअधिक जवळचे, घनिष्ठ नाते आहे असे समजता कामा नये, कारण ते खरोखरच एक आहेत.

जेव्हा माणूस त्या दिव्यत्वाला गवसणी घालू पाहतो तेव्हा तो अप्राप्याच्या दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू इच्छितो, तेव्हा तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसाठा आणि त्याच्याकडील अगदी अंतर्ज्ञानसुद्धा त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नव्हे. तसेच त्याला ही जाणीवसुद्धा नसते की, जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते.

जोपर्यंत त्याच्यामध्ये असलेल्या ह्या ‘आद्या’ विषयी तो जागृत होत नाही तोवर त्याला उत्पत्तीविषयी ज्ञान कसे बरे होईल?

स्वत:ला समजून घेतल्यानेच आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यानेच तो परमशोध लावू शकतो आणि तो आश्चर्यचकित होऊन बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे त्या कुल-प्रमुखाप्रमाणे म्हणू शकतो, “देवाचे घर हे इथेच तर होते आणि मला ते माहीतही नव्हते.” म्हणून, ज्या शब्दांमुळे स्वर्ग आणि पृथ्वी भरून जातात असा तो, भौतिक जगताच्या निर्मिकाचा ”मी सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि सर्व जीवांमध्ये आहे;” हा जो परमबोध आहे तो आपण अभिव्यक्त केला पाहिजे; ते शब्द सर्वांना माहीत करून दिले पाहिजेत.

जेव्हा सर्वांना हे सारे ज्ञात होईल तेव्हा, ज्या दिवसाचे आश्वासन आपल्याला देण्यात आले आहे तो रूपांतरणाचा दिवस आपल्या अगदी नजीक आलेला असेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 40-41)