Posts

आध्यात्मिकता ०९

आपल्या कुटुंबीयांसाठी पैसे कमावणे आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडणे; एक भला आणि नीतिसंपन्न माणूस बनणे; सुयोग्य नागरिक, देशभक्त, देशासाठी कार्यकर्ता बनणे ही गोष्ट, कोणत्यातरी दूरस्थ आणि अदृश्य ‘देवते’च्या शोधार्थ, निष्क्रियपणे ध्यानाला बसण्यापेक्षा अधिक ‘आध्यात्मिक’ आहे, असे आपल्याला अलीकडे वारंवार सांगण्यात येते. परोपकार, जनहित, मानवतेची सेवा या गोष्टींना खऱ्या आध्यात्मिक गोष्टी म्हणून मानण्यात येते. मानसिक आदर्शवाद, नैतिक प्रयत्न, सौंदर्यात्मक विशुद्धता या गोष्टींना आधुनिक मनाद्वारे, आध्यात्मिक गोष्टी म्हणून पुढे केले जाते. आपण उत्तमातील उत्तम आणि सर्वोच्च असे जे काही साध्य करून घेऊ शकत असू तर ते हेच आहे असे दर्शविले जाते. – तथापि त्याचवेळी, एकीकडे वाढता भ्रमनिरास, असमाधान, त्यांच्यातील पोकळपणाची भावना या गोष्टीदेखील वाढीस लागत आहेत.

वरील सर्वच गोष्टींचा निश्चितपणे काही उपयोग आहे, कारण प्रत्येक गोष्टीचे त्याच्या त्याच्या स्थानी त्याचे त्याचे एक मूल्य असते आणि जे लोक या गोष्टींनी समाधानी होतात ते त्याला सर्वाधिक महत्त्व देतात, आणि या गोष्टी म्हणजेच सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या ‘कर्तव्यकर्म’ आहेत, असे मानून त्या धारण करतात, हे स्वाभाविकच आहे.

परंतु आध्यात्मिकता ही या गोष्टींवर अवलंबून नसते, तर ती स्वतःच्या स्वतंत्र पायावर आधारलेली असते आणि आध्यात्मिक चेतनेखेरीज अन्य कोणत्याही पायावर या गोष्टी जोपर्यंत आधारलेल्या असतात आणि आंतरिक आध्यात्मिक अधिष्ठानावर त्या जोपर्यंत रूपांतरित होत नाहीत तोपर्यंत आध्यात्मिकता त्या गोष्टींचा समावेशदेखील स्वत:मध्ये करून घेत नाही. [क्रमश:]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 417]

कर्म आराधना – ४०

मानवतेची सेवा करण्याची कल्पना ही महत्त्वाकांक्षेच्या अत्यंत सामान्य रूपांपैकी एक रूप आहे. अशा प्रकारच्या सेवेविषयी किंवा कार्याविषयी असणारी सर्व आसक्ती ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची खूण असते. ज्या ‘गुरुं’ची अशी समजूत असते की, त्यांच्यापाशी मानवतेला शिकविण्यासाठी एक फार महान सत्य आहे आणि ज्यांना भरपूर मोठा शिष्यवर्ग हवा असतो आणि शिष्य त्यांच्यापासून निघून जातात तेव्हा जे बेचैन होतात किंवा त्यांच्याकडे जो कोणी येईल त्याला पकडून ते त्या व्यक्तीला शिष्य बनविण्याचा प्रयत्न करतात, असे गुरू निःसंदेहपणे अन्य कशाचे नव्हे तर, स्वतःच्या महत्त्वाकांक्षेचे अनुसरण करत असतात.

– श्रीमाताजी
[CWM 03 : 09]