Posts

(दिनांक : १९ जून १९०९)

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला आम्ही मानतो आणि त्याचे अनुसरण करतो. आमचे मानवतेला असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वाच्या वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक खोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या ह्या आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील; केवळ निसर्गाच्या शक्ती आरामदायक अशा सुखसोयींच्या सेवेत जुंपून ह्या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रीतीने विजय मिळवीत, माणसाचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करत, बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच ह्या समस्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. या कार्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करीत आहे. आणि हा दावा मानवतेच्या भल्यासाठी आहे, यात इंग्लडला सुद्धा वगळलेले नाही, अशा या मानवतेच्या भल्यासाठी भारताने हा दावा प्रस्थापित केलाच पाहिजे.”

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 27)

जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते ह्या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणले गेलेले साहित्य हयांतील वेगळेपण पाहू शकत आहेत. Read more