Posts

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा त्यासाठीचा सर्वांत सोपा मार्ग आहे.

(योग्य वृत्तीने केलेले कर्म म्हणजे कोणते कर्म?) – असे कर्म की जे इच्छाविरहित किंवा अहंकारविरहित असते – इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेचच नकार देऊन केलेले कर्म हे योग्य वृत्तीने केलेले कर्म असते; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि तिने कार्य हाती घ्यावे म्हणून तिची प्रार्थना करून केलेले कर्म, की ज्यामुळे आंतरिक शांततेप्रमाणेच, कर्मामध्येदेखील तुम्हाला दिव्य मातेची उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल; अशा प्रकारचे ‘दिव्य माते’प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म हे योग्य वृत्तीने केलेले कर्म असते.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 226]

कर्म आराधना – ३३

‘दिव्य माते’शी तुम्ही जेव्हा पूर्णतः एकात्म पावलेले असाल, तुम्हाला आपण साधन आहोत, सेवक आहोत किंवा कार्य-कर्ते आहोत, अशी स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव न राहता जर, आपण त्या दिव्य मातेच्या चेतनेचा आणि तिच्या शक्तीचा एक शाश्वत अंशभाग आहोत आणि तिचे खरेखुरे बालक आहोत अशी जाणीव होईल, तेव्हा या परिपूर्णत्वाची अंतिम अवस्था येईल. नेहमीच ती ‘दिव्य माता’ तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही ‘तिच्या’मध्ये असाल; तुमचे सारे विचार, तुमची दृष्टी, तुमच्या कृती, तुमचा अगदी श्वासोच्छ्वास आणि तुमच्या साऱ्या हालचाली या ‘तिच्या’पासून निर्माण होत आहेत आणि त्या ‘तिच्या’च आहेत असा तुमचा सततचा, सहज आणि स्वाभाविक अनुभव असेल. तुम्ही म्हणजे तिने तिच्यामधूनच घडविलेली एक व्यक्ती आणि एक शक्ती आहात, लीलेसाठी तिने स्वतःमधूनच तुम्हाला वेगळे केले आहे आणि तरीही तुम्ही तिच्यामध्ये नेहमीच सुरक्षित आहात, तुम्ही तिच्या अस्तित्वाचाच एक भाग आहात, तिच्या चेतनेचाच एक भाग आहात, तिच्या शक्तीचाच एक भाग आहात आणि तिच्या ‘आनंदाचा’च एक भाग आहात; असे तुम्हाला जाणवेल आणि दिसेल आणि तसा तुम्हाला अनुभव येईल. जेव्हा ही स्थिती संपूर्ण असेल आणि तिच्या अतिमानसिक ऊर्जा तुम्हाला मुक्तपणे प्रवाहित करतील तेव्हा तुम्ही ईश्वरी कार्यासाठी परिपूर्ण झालेला असाल. ज्ञान, इच्छा, कृती या गोष्टी खात्रीशीर, साध्या, तेजोमय, उत्स्फूर्त, निर्दोष बनतील; त्या ‘परमेश्वरा’पासून प्रवाहित झालेल्या असतील; अशी अवस्था म्हणजे ‘शाश्वता’चा दिव्य संचार असेल.

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 13]

मानसिक परिपूर्णत्व – २१

 

ईश्वराभिमुख झालेले प्रेम हे, ज्याला माणसं प्रेम हे नाव देतात, तशाप्रकारचे नेहमीचे प्राणिक भावना असणारे प्रेम असता कामा नये. कारण ते प्रेम हे प्रेमच नसते, तर ती केवळ एक प्राणिक इच्छा असते, एक प्रकारची स्वीकृतीची सहजबुद्धी असते, मालकीची आणि एकाधिकाराची प्रेरणा असते. हे तर दिव्य प्रेम असतच नाही; पण योगमार्गामध्ये यातील अंशभागाचीही भेसळ होता कामा नये. ईश्वरविषयक प्रेमामध्ये आत्मदान असते, ते कोणत्याही मागणीपासून मुक्त असते; ते शरणागती आणि समर्पणाने परिपूर्ण असते; ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही; मत्सर, अभिमान वा राग यांच्या उद्रेकामध्ये ते गुंतून पडत नाही, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात. आणि त्याच्या बदल्यात दिव्य मातादेखील स्वतःला देऊ करते, पण अगदी मुक्तपणे – आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते.

दिव्य मातेचे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक जाणिवेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना पूर्णत्व आणि परिपूर्तीच्या दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्निर्मिती करते. तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या बाहुंमध्ये घेऊन, ईश्वराकडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. अगदी तुमच्या जडभौतिक अंगापर्यंत तुम्हाला याची संवेदना व्हावी आणि तिने तुमचा ताबा घ्यावा अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. आणि इथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची ! जर तुम्ही खरोखर अशी अभीप्सा बाळगलीत आणि जर ती तुम्हाला साध्य झाली तर, इतर कोणत्याही दाव्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच नाही. आणि जर व्यक्ती खरोखरच अशी अभीप्सा बाळगेल तर, आणि जसजशी व्यक्ती अधिकाधिक शुद्ध होत जाईल, तसतसा आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईल, तसतशी निश्चितपणे व्यक्तीला ती गोष्ट साध्य होईलच.

कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा यांच्यापासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग जेवढी तुमची क्षमता आहे, जेवढे तुम्ही ग्रहण करू शकता, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे; असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 338-339)