Posts

मांजरीचे एक छोटेसे पिल्लू होते. मांजरीने त्याला तोंडात धरलेले होते. पण अचानक त्या पिल्लाने तिच्या तोंडातून बाहेर उडी मारली आणि ते पिल्लू विंचवाबरोबर खेळू लागले. पिल्लाने त्या विंचवाबरोबर खेळण्याला मांजरीचा विरोध होता; पण त्याने तिचे काही ऐकले नाही. आणि मग विंचवाने त्याच्या स्वभावाप्रमाणे मांजरीच्या त्या पिल्लाला दंश केला. ते किंचाळले, ओरडू लागले.

ते धावतपळत आईकडे आले आणि त्याने तिला त्या विंचवाविषयी सर्वकाही सांगितले.

तेव्हा मांजरीने विचारले, ”मग तू मला सोडून का पळालास?”

विरोधी शक्ती या विंचवाप्रमाणे असतात. त्या खरोखरच अनिष्ट असतात. मात्र तुम्ही जर त्यांच्याकडे लक्ष दिले नाहीत किंवा त्यांचे ऐकले नाहीत तर, त्या विरोधी शक्तींचा नाश करता येणे शक्य असते. विरोधी शक्ती जेव्हा चुकीच्या सूचना देतात तेव्हा माणसांनी सातत्याने त्यांना नकार दिला पाहिजे. नाहीतर मग या विरोधी शक्ती सर्वच गोष्टींचा विनाश घडवून आणतील…

राग, तिटकारा, अगणित इच्छावासना आणि त्यासारख्या अनेक वायफळ गोष्टींच्या माध्यमातून, या विरोधी शक्ती माणसांच्या मेंदूपर्यंत कशा जाऊन पोहोचतात ते मला माहीत आहे. सर्वप्रथम, राग पायांना पकडतो, मग हळूहळू तो वर नाभीपर्यंत जाऊन पोहोचतो, तेथून हृदयापर्यंत आणि सरतेशेवटी मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यातून माणसांचे अतोनात नुकसान होते. एकदा का राग मेंदूपर्यंत गेला की मग, माणसाला स्वत:वर ताबा ठेवणे कठीण होऊन बसते. म्हणून तो आत येण्यापासूनच त्याला अडवले पाहिजे. म्हणजे मग त्यावर मात करणे सोपे होते.

– श्रीमाताजी
(Mother you said so : 11.01.63)

(साधकाने कोणती वृत्ती बाळगावी याचे श्रीरामकृष्ण परमहंस यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग हा माकडाच्या पिल्लाचा आहे. हा मार्ग वैयक्तिक प्रयत्नांवर आधारित आहे. तर दुसरा मार्ग हा मांजराच्या पिल्लाचा मार्ग. हा समर्पणाचा मार्ग आहे. त्याचा संदर्भ येथे देण्यात आला आहे.)

‘मांजराच्या पिल्लाच्या वृत्तीचे अनुकरण करा,’ हे सांगणे खूप सोपे आहे परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे तितकेसे सोपे नाही, हे लक्षात घ्या. एकदा का मांजराच्या पिल्लाची वृत्ती धारण केली की मग कोणतेही व्यक्तिगत प्रयत्न करायला नकोत, असे तुम्ही समजता कामा नये. कारण मनुष्य हा काही मांजरीचे पिल्लू असू शकत नाही. तुमच्यामध्ये असे अगणित घटक असतात की, ज्यांना फक्त स्वतःवरच विश्वास ठेवण्याची सवय झालेली असते, त्यांना त्यांचे स्वतःचे काम करायचे असते. (मांजराच्या पिल्लाप्रमाणे) स्वतःला सर्व परिस्थितीमध्ये ‘ईश्वरा’वर सोपवून देण्याहून अधिक अवघड असते ते याच घटकांवर नियंत्रण ठेवणे! ते खूपच अवघड असते.

मानवी मनाचे अद्भुत कार्य नेहमीच चालू असते; या मनाला निरीक्षण करणे, टिका करणे, विश्लेषण करणे, शंका उपस्थित करणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, उदाहरणार्थ “हे असे केले तर बरे होईल का?” “तसे केले तर अधिक बरे होईल ना?” इ. इ. गोष्टी खूप आवडत असतात. आणि मग हे असे चालूच राहते, अशावेळी मग तो मांजराच्या पिल्लाचा दृष्टिकोन कुठे जातो? परंतु मांजराचे पिल्लू मात्र विचार करत बसत नाही. ते विचारादी गोष्टींपासून मुक्त असते आणि त्यामुळे त्याला तसे वागणे खूप सोपे असते.

तुम्ही कोणताही मार्ग अनुसरा, परंतु जोपर्यंत तुम्ही ‘ईश्वरा’शी तादात्म्य पावत नाही तोपर्यंत व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच असते. त्या तादात्म्याच्या क्षणी मात्र, जीर्ण वस्त्रं गळून पडावीत त्याप्रमाणे सारे प्रयास गळून पडतात, तुम्ही जणू काही एक वेगळीच व्यक्ती बनता. एकेकाळी जे तुम्हाला अशक्यप्राय वाटत असे, ते आता तुम्हाला शक्य होते आणि ते केवळ शक्यच होते असे नाही, तर ते तुमच्यासाठी अपरिहार्य बनते, कारण तुम्ही त्याविना इतर काही करूच शकत नाही. तुम्ही सतर्क, शांत राहिले पाहिजे, आणि आंतरिक प्रेरणेची प्रतीक्षा केली पाहिजे; बाह्य प्रतिक्रियांमधून तुम्ही कोणतीही कृती करता कामा नये; सातत्याने, नियमितपणे, ‘वरून येणाऱ्या’ प्रकाशाद्वारेच तुमचे संचालन झाले पाहिजे. इतर कोणत्याही प्रेरणेने कृती न करता, तुम्ही केवळ त्याच प्रकाशाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन कृती केली पाहिजे. विचार करायचा नाही, प्रश्न उपस्थित करायचे नाहीत, “मी हे करू की ते करू ?” असे विचारायचे नाही, तर केवळ जाणून घ्यायचे, पाहायचे आणि ऐकायचे. कोणताही प्रतिप्रश्न न करता, कोणतीही शंका उपस्थित न करता, तुम्ही आंतरिक विश्वासाने कृती केली पाहिजे कारण, आता तो निर्णय हा तुमच्याकडून आलेला नसतो, तर तो ‘वरून आलेला’ असतो. ही गोष्ट एखाद्याच्या बाबतीत लवकर घडेल किंवा दुसऱ्या एखाद्याला मात्र यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागेल – ते त्या त्या व्यक्तीच्या पूर्वतयारीवर, तसेच इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. तोपर्यंत तुम्ही आस बाळगली पाहिजे आणि ती आस चिकाटीने बाळगली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही धीर सोडता कामा नये किंवा धैर्य खचू देता कामा नये. कदाचित हजाराव्या वेळी तुम्हाला परिणाम झालेला आढळून येईल हे जाणून, गरज पडली तर एकच गोष्ट हजार वेळादेखील पुन्हा पुन्हा केली पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 94-95]