Posts

विचारशलाका २१

संक्रमणकाळात ‘विचारा’ची आत्यंतिक आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड हा अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या दोन प्रकारच्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून कडवेपणाने चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस (moderate man) उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नव्यामधलेही काहीतरी असे दोन्ही घेऊया. उपरोक्त दोन टोकाच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी, नेमस्त माणूसदेखील काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाला एक सूत्र आणि दैवी प्रतिमा मानून, मध्यममार्गाच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्यांच्या दृष्टीपुढे अशाच प्रकारचा विचार होता.

‘विचार’ केव्हाही एखादे सूत्र ठरवत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. एखादा माणूस जर असे म्हणेल की, प्रबुद्ध (enlightened) युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार त्याला उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस त्याला म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का, याबाबत मी साशंक आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते, नेमकी तशीच सध्याच्या काळात या देशातील माणसे झाली असतील. आपल्या भारतीय सभ्यतेच्या (civilization) वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि त्या सभ्यतेमध्ये नित्य, शाश्वत काय आणि अनित्य, तात्पुरते काय याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आपण गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिन लोकांकडे असू शकतील.”

भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ‘ज्ञानाने’ भारतीय असणे होय, केवळ ‘पूर्वग्रहाने’ नव्हे. मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या पुरुषार्थासाठी तसेच, मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 01 : 499-500]