Posts

तुम्ही जेव्हा योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही अशा निराधार अवस्थेत हवेत लोंबकळत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या गोष्टी तुम्ही बाहेर काढून टाकल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे.

तुम्ही काय होतात याचा विचार करू नका, तर तुम्ही काय बनण्याची इच्छा बाळगता त्याचाच विचार करा; तुम्ही जे प्रत्यक्षात अनुभवू इच्छित आहात त्या विचारांमध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा. ‘ईश्वर’ हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 83-84)

धम्मपद : रस्त्याच्या कडेलासुद्धा एखादे सुंदर सुवासिक फूल उमललेले आढळते, त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशित बुद्धांचे शिष्यदेखील, त्यांच्या बुद्धिप्रकाशाच्या योगे, अंध व अज्ञानी जनसमूहात, चारचौघांमध्ये उठून दिसतात.

श्रीमाताजी : येथे काही चांगल्या सूचना करण्यात आल्या आहेत, उदाहरणार्थ, इतर जणं काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, निष्काळजीपणा यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय निर्मळ फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही इतके त्याज्य काहीच नसते.

व्यक्तीचा भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

तुम्ही जे बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

तुम्ही कोण होतात त्याचा विचार करू नका, तर तुम्ही जे बनण्याची आस बाळगून आहात त्याचाच विचार करा; तुम्ही जे साध्य करू इच्छिता त्यामध्येच पूर्णतः राहा. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा.

– श्रीमाताजी
(CWM 03:84)

विचार शलाका – ३३

 

“खरोखर, ‘ईश्वर’च साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत राहिला नाहीत तर, तुमच्या साऱ्या चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराचा मार्ग खुला करणारा ‘ईश्वर’च असतो.”

 

श्रीमाताजींचे हे विधान इ. स. १९६१ मध्ये जेव्हा प्रथम प्रकाशित झाले तेव्हा, या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणाल्या की, ”व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचे तिच्या जीवनात काही परिणाम होतातच, ते ‘कर्म’ संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’ कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची शक्ती असते; पण यासाठी व्यक्तीने त्याच त्या चुकीची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनंत काळ करत राहील आणि ‘ईश्वरी कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनंत काळ करत राहील, असे व्यक्तीने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नसते.

 

भूतकाळ पूर्णपणे स्वच्छ केला जाऊ शकतो; त्याचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही इतका तो विशुद्ध केला जाऊ शकतो; परंतु व्यक्तीने तिची भूतकालीन अवस्था पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढता कामा नये, या एकाच अटीवर हे होऊ शकते; तुम्ही स्वत: तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनंत काळ निर्माण करत राहता कामा नये.”

 

– श्रीमाताजी

(CWM 09 : 58)