Tag Archive for: भावना

श्रीमाताजी आणि समीपता – २६

साधक : आज सकाळी ‘क्ष’च्या मार्फत मी श्रीमाताजींना पत्र पाठविले. परंतु मला त्यांच्याकडून अजूनपर्यंत उत्तर मिळाले नाही. माझ्या हातून काही चूक घडली का? त्यांचा एकेक शब्द ऐकण्यासाठी मी अगदी व्याकुळ झालो आहे.

श्रीअरविंद : अशा प्रकारच्या भावनांना नेहमी नकारच दिला पाहिजे. ईश्वराबरोबर असलेले नाते, श्रीमाताजींबरोबर असलेले नाते हे प्रेमाचे, श्रद्धेचे, विश्वासाचे, खात्रीचे, समर्पणाचे असले पाहिजे. या व्यतिरिक्त असणाऱ्या कोणत्याही अन्य प्राणिक सामान्य प्रकारच्या नात्यामुळे साधनेला विरोधी असणाऱ्या प्रतिक्रिया निर्माण होतात; इच्छावासना, अहंकारी अभिमान, अपेक्षा, बंडखोरीची भावना आणि तत्सम अज्ञानी राजसिक मानवी प्रकृतीच्या साऱ्या अस्वस्थता या गोष्टी निर्माण होतात आणि त्यांच्यापासून सुटका करून घेणे हे तर साधनेचे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 450-451)

विचारशलाका ३०

 

चेतना आणि ज्या माध्यमांमधून चेतना व्यक्त होते ती साधने या दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

त्या साधनांचा विचार करुया : मानसिक अस्तित्वामधून ‘विचार’ निर्माण होतात, भावनिक अस्तित्वामधून ‘भावना’ निर्माण होतात, प्राणिक अस्तित्वामधून ‘कार्यकारी शक्ती’ निर्माण होते आणि शारीरिक अस्तित्व ‘प्रत्यक्ष कृती’ करते.

प्रतिभावान माणसाला काहीही दिले तरी, त्यापासून तो काहीतरी सुंदर असे बनवून दाखवेल कारण तो प्रतिभाशाली असतो. पण त्याच प्रतिभावंताला तुम्ही एक परिपूर्ण असे साधन द्या, तो त्यापासून काहीतरी अद्भुत असे करून दाखवेल. एखादा महान पियानोवादक अगदी खराब झालेल्या पियानोमधूनसुद्धा काहीतरी उत्तम संगीत निर्माण करेल पण त्याला जुळवलेला, उत्तम असा पियानो द्या, तो त्यापासून अधिकच सुंदर असे काही संगीत निर्माण करेल. या दोन्ही बाबतीत चेतना एकसारखीच असते पण तिच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या साधनाची आवश्यकता असते. – अगदी त्याचप्रमाणे मानसिक, प्राणिक, आंतरात्मिक आणि शारीरिक क्षमता असलेल्या देहाची साधन म्हणून आवश्यकता असते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 40]