Posts

मी याआधीही सांगितले आहे की, भांडणतंटे, एखाद्याशी संबंध तोडून टाकणे हा साधनेचा भाग असू शकत नाही; ज्या संघर्षाविषयी आणि मतभेदांविषयी तुम्ही बोलत आहात ते म्हणजे बाह्य जगामध्ये, प्राणिक अहंकार (vital ego) जसे परस्परांना भिडतात, तसलाच प्रकार आहे. …एका साधकाचे दुसऱ्या साधकाशी जे संबंध असतात त्या नात्यामध्ये सुसंवाद, सदिच्छा, सहिष्णुता, समता या आवश्यक अशा आदर्श गोष्टी आहेत. व्यक्तीने सगळ्यांमध्ये मिसळलेच पाहिजे असे नाही, पण जर का व्यक्ती आपलीआपली एकटीच राहात असेल तर तो एकांतवास फक्त साधनेसाठीच असला पाहिजे, इतर कोणत्या प्रेरणा त्यामागे असता कामा नयेत; तसेच त्यात श्रेष्ठत्वाची किंवा इतरांविषयीच्या तिरस्काराची भावनादेखील असता कामा नये.

…एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने जर त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये कोणत्याही कारणाने, अवांछित प्राणिक भावना उदयाला येत असल्याचे आढळले तर, जोपर्यंत तो किंवा ती या दुर्बलतेवर मात करत नाही तोपर्यंत, एक विवेकी बाब म्हणून, तो किंवा ती त्या संगतीपासून स्वतःला निश्चितपणे दूर करू शकतात. परंतु सार्वजनिक संबंध तोडून टाकणे, संबंध वर्ज्य करण्याचे अवडंबर करणे, या व अशासारख्या गोष्टींचा समावेश आवश्यक बाबींमध्ये करण्यात आलेला नाही. इतर भावनांप्रमाणेच विश्वासघाताच्या भावनांवरदेखील मात केली पाहिजे. या गोष्टींबाबत पुष्कळसा वैचारिक गोंधळ असतो; कारण त्यामध्ये प्राणिक गोष्टींचा शिरकाव होतो आणि गोष्टींकडे पाहण्याच्या योग्य दृष्टिकोनामध्ये बाधा निर्माण होते. शुद्ध आध्यात्मिक प्रेरणेतून, प्रामाणिकपणे केली जाणारी गोष्टच फक्त योगसुसंगत असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 347-348)

मला भांडणे मंजूर नाहीत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये आणि दोन्ही बाजू या सारख्याच चुकीच्या असतात, हे तुम्ही कायम लक्षात घेतले पाहिजे. आपल्या भावना, अग्रक्रम, पसंती-नापसंती, आपले आवेग यांवर काबू राखणे ही येथील (आश्रमातील) अनिवार्य अशी शिस्त आहे.

*

व्यक्तीने भांडणाला स्वतःहून सुरुवात केली नसली तरी भांडण करणे हे नेहमीच चुकीचे असते.

*

जेव्हा तुम्ही भांडणाला सुरुवात करता तेव्हा, तुम्ही जणू काही ईश्वरी कार्याविरोधात युद्ध पुकारता.

*

हो, भांडणे करणे ही अगदी दुःखद गोष्ट आहे – त्यांच्यामुळे कार्यामध्ये भयंकर बाधा येते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टच अधिक कठीण होऊन जाते.

*

व्यक्तीला स्वतःच्या दोषांबद्दल वाईट वाटणे हे, एक वेळ गरज पडल्यास, स्वतःच्या दोषांमध्ये सुधारणा करण्याच्या संकल्पाचे दृढीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

परंतु इतरांच्या दुराचरणामुळे व्यक्तीला स्वतःला अपमानित झाल्यासारखे वाटणे, याचा आध्यात्मिक जीवनाशी किंवा ईश्वराच्या सेवेशी काही संबंध नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 262-264)