Posts

एकत्व – ०५

दुसऱ्या व्यक्तिच्या जाणिवेमध्ये काय चालू आहे, हे नेमकेपणाने जाणण्यासाठी तुम्ही कधीच त्या व्यक्तिच्या जाणिवेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तुमची जाणीव त्या व्यक्तिमध्ये प्रक्षेपित करावयाची नाही; कारण तसे केलेत तर, तुम्हाला त्या व्यक्तिमध्ये स्वतःचेच दर्शन होईल आणि ते काही स्वारस्यपूर्ण नाही – त्याऐवजी त्या व्यक्तिच्या आतमध्ये असणाऱ्या जाणिवेच्या संपर्कात प्रवेश करावयाचा, उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तिच्या काही गोष्टी पटत नाहीत तेव्हा, तुम्ही अमुक एका गोष्टीकडे अमुक एका पद्धतीने पाहत असता, तर दुसरी व्यक्ती त्याच गोष्टीकडे दुसऱ्याच पद्धतीने पाहत असते. जर माणसं समंजस असतील तर ती भांडत बसत नाहीत. पण जेव्हा माणसं समंजस नसतात तेव्हा, ती भांडाभांडी करायला सुरुवात करतात. तेव्हा, भांडत बसण्यापेक्षा एक चांगली गोष्ट अशी करावयास हवी; ती म्हणजे, दुसऱ्याच्या जाणिवेमध्ये प्रवेश करावयाचा आणि स्वतःला विचारायचे की, तो अमुक अमुक गोष्टी अशा का करत आहे, त्याला असे म्हणायला किंवा करायला लावणारे कोण आहे ? त्याने असा दृष्टिकोन बाळगावा यासाठी, वस्तुमात्रांकडे पाहण्याची त्याची कोणती दृष्टी कारणीभूत आहे, त्या पाठीमागचे आंतरिक कारण काय असेल ? हे खूपच रोचक असते. जर तुम्ही असे कराल, तर तुमचे रागावणे ताबडतोब बंद होईल. पहिली गोष्ट अशी घडेल की, तुम्ही रागावूच शकणार नाही. तेव्हा हा एक फारच मोठा फायदा आहे. आणि दुसरे म्हणजे, जरी दुसऱ्याचे रागावणे चालूच राहिले तरी त्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि नंतर मग, हळूहळू, व्यक्तिने दुसऱ्याशी स्वतः पूर्णतया एकत्व पावण्याचा व त्याद्वारा मग भेदाभेदाच्या, विरुपतेच्या स्पंदनांना रोखण्याचा आणि भांडणं थांबवायचा प्रयत्न करायचा. हे अतिशय उपयोगी ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 424-425)