Posts

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २६

भक्तियोग

प्रेम, भक्ती हे सर्व अस्तित्वाच्या मुकुटस्थानी आहे, अस्तित्वाची परिपूर्ती प्रेमानेच होते; प्रेमानेच अस्तित्व आणि जीवन सर्व प्रकारची उत्कटता, सर्व प्रकारची पूर्णता गाठते आणि पूर्ण आत्मलाभाचा आनंद भोगते. कारण जरी मूळ अस्तित्व हे स्वभावतःच जाणिवेच्या स्वरूपाचे आहे; आणि जाणिवेच्या द्वाराच आपण या अस्तित्वाशी एकरूप होतो, हे खरे असले तरी जाणीव स्वभावतः आनंदरूप आहे आणि आनंदाचे शिखर गाठण्यास प्रेम हे गुरुकिल्लीप्रमाणे उपयोगी पडते.

– श्रीअरविंद
(संदर्भ : योगसमन्वय – सेनापती बापट)
(CWSA 23-24 : 546-547)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २५

भक्तियोग

 

भक्तिपूर्ण मनाच्या द्वारा ईश्वराच्या भेटीसाठी जी साधना केली जाते, तिच्या तीन अवस्था असतात, असे भक्तिमार्गाची व्यवस्था लावू पाहणारे मानतात. पहिली अवस्था म्हणजे श्रवण – ईश्वराच्या नावाचे, त्याच्या गुणांचे आणि या गुणांशी संबंधित असणाऱ्या अशा गोष्टींचे नित्य श्रवण. दुसरी अवस्था म्हणजे मनन – ईश्वराच्या गुणांचे, त्याच्या व्यक्तिरूपाचे, ईश्वराचे नित्य मनन. तिसरी अवस्था म्हणजे ईश्वरावर मन स्थिर करून, ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे. यांद्वारे आणि त्याचबरोबर जर मनोभाव उत्कट असतील, एकाग्रता तीव्र असेल तर, समाधीचाही अनुभव येतो; अशा वेळी मग बाह्य विषयांपासून जाणीव दूर निघून गेलेली असते. परंतु याही सर्व गोष्टी वस्तुतः प्रासंगिक आहेत; मनातील विचार हे पूजाविषयाकडे उत्कट भक्तीने लागले पाहिजेत, हीच एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 574)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २४

भक्तियोग

 

पूर्ण आत्मसमर्पणामध्ये आपले सर्व अस्तित्वच ईश्वराला अर्पण करणे अपेक्षित असते; त्यामुळे अर्थातच त्यामध्ये आपले विचार आणि आपली कर्मे यांचे अर्पणही अपेक्षित असते. असे करताना भक्तियोग हा कर्मयोग व ज्ञानयोगाचे महत्त्वाचे घटक अंतर्भूत करून घेतो, पण तो हे स्वतःच्या पद्धतीने व स्वतःच्या विशिष्ट भावाने करतो. येथेही भक्त त्याच्या कर्माचे आणि त्याच्या जीवनाचे ईश्वराला समर्पण करतो; पण ईश्वरी इच्छेशी आपली इच्छा मिळतीजुळती घेण्यापेक्षा, तो आपल्या प्रेमाचे समर्पण करत असतो. भक्त ईश्वराला आपले जीवन अर्पण करतो म्हणजे तो जे काही असतो, त्याच्यापाशी जे काही असते, तो जे काही कर्म करतो ते सर्व तो ईश्वरार्पण करतो. हे आत्मसमर्पण संन्यासाचे रूप घेऊ शकेल. जेव्हा संन्यासी सामान्य मानवी जीवन सोडून देतो आणि त्याचे सारे दिवस हे पूजाअर्चना, भक्ती किंवा ध्यानसमाधीत व्यतीत करतो, तेव्हा त्याची सारी वैयक्तिक मालमत्ता त्यागून, तो बैरागी किंवा भिक्षू बनतो; ईश्वर हीच ज्याची एकमेव अशी संपदा बनते, ईश्वराच्या सायुज्यतेसाठी आणि इतर भक्तांच्या संबंधांपुरते साहाय्यभूत ठरतील किंवा त्याच्याशी जे निगडित असतील अशा कर्मांव्यतिरिक्तच्या सर्व कर्मांचा तो त्याग करतो; किंवा फार फार तर संन्यासाश्रमाच्या सुरक्षित गढीमध्ये राहून, ईश्वरी प्रकृतीचा आविष्कार असणारी प्रेममय, दयामय, कल्याणमय अशी सेवाकर्मे तो करत राहतो. परंतु पूर्णयोगामध्ये, यापेक्षा अधिक व्यापक असे आत्मसमर्पण असू शकते. पूर्णयोगामध्ये जीवन त्याच्या पूर्णतेसह, विश्व त्याच्या समग्रतेसह, ईश्वराची लीला आहे, असे समजून स्वीकारले जाते; असा भक्त हा स्वतःचे समग्र अस्तित्व ईश्वराच्या ताब्यात देतो. सर्व अस्तित्व म्हणजे तो स्वतः जे काही आहे ते आणि त्याची स्वतःची जी काही मालमत्ता आहे ती सारी, ‘त्या ईश्वराची आहे’ असे समजून, (‘इदं न मम’ या भावनेने) स्वतःकडे बाळगतो. त्या गोष्टी स्वतःच्या आहेत, असे तो मानत नाही. तो सारी कर्मे ईश्वरार्पण म्हणूनच करतो. या व्यापक आत्मसमर्पणात आंतरिक व बाह्य जीवनाचे परिपूर्ण सक्रिय समर्पण होत असते; त्यामध्ये कोणतेही न्यून राहात नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 573-574)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २३

भक्तियोग

 

मानवी मन आणि मानवी जीव, जो अजूनही दिव्य झालेला नाही; परंतु ज्याला दिव्य प्रेरणा जाणवू लागली आहे आणि ज्याला दिव्यतेचे आकर्षण वाटू लागले आहे, अशा मनाला आणि जीवाला, त्यांचे श्रेष्ठ अस्तित्व मिळवून देणाऱ्या ईश्वराकडे वळविणे, हे सर्व योगांचे स्वरूप असते. भावनेच्या दृष्टीने, या ईश्वरोन्मुख वृत्तीचे पहिले रूप असते ते पूजाअर्चेचे. सामान्य धर्मामध्ये हा पूजाभाव बाह्य पूजेचे रूप धारण करतो आणि मग पुन्हा त्याला अगदी बाह्य विधिवत पूजेचे रूप प्राप्त होते. अशा प्रकारची पूजा सामान्यतः जरुरीची असते कारण बहुतांशी मानवसमूह हा त्यांच्या भौतिक मनांमध्येच जीवन जगत असतो; आणि त्यामुळे, कोणतेतरी भौतिक प्रतीक असल्याशिवाय, त्यांना ती गोष्ट अनुभवताच येत नाही. भौतिक-शारीरिक कर्मशक्तीविना आपण इतरकाही जीवन जगत असतो, हे त्यांना जाणवूच शकत नाही.

…हा पूजाभाव सखोल अशा भक्तिमार्गाचा एक घटक म्हणून परिवर्तित होण्याआधी, प्रेमभक्तिरूपी फुलाची पाकळी, तिचे श्रद्धासुमन त्या सूर्याच्या दिशेने, म्हणजे ज्याची पूजा केली जाते त्या ईश्वराच्या दिशेने आत्मोन्नत होण्याची आवश्यकता असते. आणि त्याचबरोबर, जर का तो पूजाभाव अधिक गाढ असेल तर, त्याचे ईश्वराबाबतचे चढतेवाढते आत्मसमर्पण आवश्यक असते. ईश्वराशी संपर्क येण्यासाठी सुपात्र बनावयाचे असेल, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या मंदिरामध्ये ईश्वराचा प्रवेश व्हावा, असे वाटत असेल, आपल्या हृदय-गाभाऱ्यामध्ये त्याने आत्म-प्रकटीकरण करावे असे आपल्याला वाटत असेल, तर या आत्मसमर्पणापैकी एक घटक हा आत्मशुद्धीकारक असणे आवश्यक असते. हे शुद्धीकरण नैतिक स्वरूपाचे देखील असू शकते. परंतु नैतिकतावादी मनुष्याला ज्या प्रकारचे न्याय्य व निर्दोष कर्म अपेक्षित असते, केवळ तसे हे शुद्धीकरण नसते; किंवा जेव्हा आपण योगदशेप्रत येऊन पोहोचतो तेव्हा, औपचारिक धर्मामध्ये ईश्वरी कायद्याचे पालन म्हणून जे सांगितले जाते, त्या अर्थानेही आत्मशुद्धीकरण पुरेसे नसते; तर खुद्द ‘ईश्वर’ या संकल्पनेच्या किंवा आपल्या अंतरंगातील ईश्वराशी जे जे काही विरोधात जाणारे असेल त्या त्या साऱ्याचे विरेचन, त्या साऱ्या गोष्टी फेकून देणे, हे येथे अपेक्षित असते. पहिल्या प्रकारामध्ये आपण आपल्या भावनेची सवय व आपल्या बाह्य कृती या ईश्वराचे अनुकरण असल्याप्रमाणे बनत जातात; तर दुसऱ्या प्रकारामध्ये आपली प्रकृती ही ईश्वराच्या प्रकृतीसारखी बनत जाते. आंतरिक पूजाभाव आणि विधिवत पूजाअर्चा यांचा जो संबंध असतो, तसाच संबंध ईश्वराशी असलेले सादृश्य आणि नैतिक जीवन यामध्ये असतो. ईश्वराशी असलेले हे आंतरिक सादृश्य ‘सादृश्यमुक्ती’मध्ये परिणत होते; या सादृश्यमुक्तीमुळे आपल्या कनिष्ठ प्रकृतीची सुटका होऊन, तिचे ईश्वरी प्रकृतीमध्ये रूपांतरण होते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 572-573)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २२

भक्तियोग

 

भक्तिमार्ग हा परम प्रेम व परम आनंद यांच्या उपभोगाला आपले साध्य मानतो. ईश्वर हा त्याच्या व्यक्तिरूपामध्ये विश्वाचा दिव्य प्रेमी व भोक्ता आहे, या कल्पनेचा उपयोग सामान्यत: भक्तियोगात करण्यात येतो. भक्तियोगामध्ये जग म्हणजे ईश्वराची लीला आहे, या भूमिकेतून पाहिले जाते. आत्मविलोपन व आत्मप्रकटीकरण यांच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जात जात, त्या लीलेच्या शेवटच्या अंकामध्ये, जीवाचा मानवी जीवनात प्रवेश होतो. (असे भक्तियोगामध्ये मानले जाते.) मानवी जीवनाच्या सर्व भावनामय स्वाभाविक संबंधांचा उपयोग क्षणिक, सांसारिक नातेसंबंधासाठी न करता, तो सर्वप्रेममय, सर्वसुंदर, सर्वानंदी ईश्वराच्या संपर्काचा आनंद उपभोगण्यासाठी करावयाचा, हे भक्तियोगाचे तत्त्व आहे. ईश्वराशी नाते जोडता यावे व ईश्वराशी जोडलेल्या नात्याची उत्कटता वाढावी, यासाठीच केवळ या योगात पूजा व ध्यान यांचा उपयोग करण्यात येत असतो. हा योग भावनात्मक संबंधांचा उपयोग करण्यात अत्यंत उदार आहे. तो इतका सर्वंकष आहे की, ईश्वराशी शत्रुत्व किंवा विरोध ही भावना प्रेमाची, तीव्र उतावळ्या प्रेमाची भ्रष्टरूपातील भावना आहे, असे हा योग मानतो आणि ही भावना देखील साक्षात्काराला व मोक्षाला साधन म्हणून उपयोगी पडू शकते, असे या योगामध्ये मानले जाते. भक्तिमार्ग साधारणतः ज्या प्रकारे आचरला जातो, तसा तो आचरला असता, तो जगाच्या अस्तित्वापासून दूर नेणारा ठरतो; भक्तियोगानुसार, भक्त सर्वातीत, विश्वातीत अशा ईश्वरात विलीन होतो.

परंतु येथेही हा एकमेव परिणामच अटळ असतो असे मात्र नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 39)

योगांची चढती शिडी

 

भारतांत अद्यापहि ज्या प्रमुख योगशाखा प्रचलित आहेत त्यांच्या विशिष्ट संकीर्ण प्रक्रिया बाजूस ठेवून त्यांच्या केंद्रवर्ती तत्त्वावर जर आम्ही जोर दिला, तर त्यांची एक चढती शिडी होते असे आम्हांस दिसते. या शिडीची अगदी खालची पायरी शरीर आहे, आणि वैयक्तिक आत्मा व विश्वातीत विश्वरूप आत्मा यांचा प्रत्यक्ष संबंध घडविणारा योग ही या शिडीची सर्वात वरची पायरी आहे.

हठयोग हा शरीर व प्राणकार्ये ही पूर्णत्व आणि साक्षात्काराची साधने म्हणून पसंत करतो; स्थूल शरीर हे हठयोगाचे कार्यक्षेत्र आहे. राजयोग हा भिन्न अंगांनी युक्त असलेले आपले मनोमय अस्तित्व उत्थापन-साधन म्हणून निवडतो; तो सूक्ष्म शरीरावर आपले लक्ष केंद्रित करतो.

कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हा त्रिमार्ग मनोमय पुरुषाची इच्छाशक्ति, हृदय (भावनाशक्ति) किंवा बुद्धिशक्ति घेऊन आरंभ करतो, आणि या शक्तींचे रूपांतर घडवून मोक्षद सत्य (liberating Truth), आनंद व अनंतता या आध्यात्मिक जीवनाच्या अंगभूत गोष्टी प्राप्त करून घेतो. व्यक्तिशरीरांतील मानवी-पुरुष (आत्मा) आणि प्रत्येक शरीरांत राहणारा सर्व नामरूपांच्या अतीत असणारा दिव्य-पुरुष (आत्मा) यांजमध्ये प्रत्यक्ष व्यवहार घडविणे ही या त्रिमार्गाची पद्धत आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 33)

भक्तिमार्ग हा परम प्रेम व परम आनंद यांच्या भोगाला आपले साध्य मानतो. ईश्वर हा व्यक्तिरूपात विश्वाचा दिव्य प्रेमी व भोक्ता आहे, या कल्पनेचा उपयोग सामान्यतः भक्तियोगात करण्यात येतो. भक्तियोगामध्ये जग म्हणजे ईश्वराची लीला आहे या भूमिकेतून पाहिले जाते; आत्मविलोपन व आत्मप्रकटीकरण यांच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जात जात, त्या लीलेच्या शेवटच्या अंकामध्ये, जीवाचा मानवी जीवनात प्रवेश होतो.

मानवी जीवनाच्या सर्व भावनामय स्वाभाविक संबंधांचा उपयोग करून, सर्वप्रेमी, सर्वसुंदर, सर्वानंदी ईश्वराच्या संपर्काचा आनंद भोगावयाचा; सांसारिक नश्वर नात्यांतील भावनासुख टाकून द्यावयाचे हे भक्तियोगाचे तत्त्व आहे. या योगात पूजा व ध्यान हे केवळ साधन आहे; ईश्वराशी नाते जोडता यावे व ईश्वराशी जोडलेल्या नात्याची उत्कटता वाढावी यासाठीच केवळ या योगात पूजा व ध्यान यांचा उपयोग करण्यात येत असतो. हा योग भावनात्मक संबंधांचा उपयोग करण्यात अत्यंत उदार आहे. इतका की, ईश्वराशी शत्रुत्व किंवा विरोध ही भावना ही तीव्र उतावळ्या प्रेमाची भ्रष्टरूपातील भावना आहे असे हा योग मानतो आणि ही विरोधी भावना देखील साक्षात्काराला व मोक्षाला साधन म्हणून उपयोगी पडू शकते असे या योगाचे म्हणणे आहे. सर्वसाधारणत: ह्या भक्तिमार्गाकडे पाहता असे दिसते कि, तो या मार्गातील साधकांना ज्ञानमार्गातील साधाकांप्रमाणेच जगाच्या संसारापासून दूर नेणारा ठरतो; भक्तियोगानुसार, भक्त सर्वातीत, विश्वातीत अशा ईश्वरांत विलीन होतो.

परंतु भक्तिमार्गातहि संसारत्याग करून ईश्वरात विलीन होणे हा परिणाम टाळता येणे शक्य असते. या मार्गात हा परिणाम टाळणारी एक व्यवस्थाही आहे, ती अशी की, दिव्य प्रेम हे ईश्वर आणि साधकाचा आत्मा या नात्यातच प्रकट व्हावे, असा निर्बध नसून; त्याचा व्याप याहूनहि अधिक असतो –

परमात्म्याचे प्रेम व आनंद यांचा समान साक्षात्कार झालेले ईश्वराचे जे भक्त असतात त्यांचा एक मेळा बनतो व या मेळ्यातील भक्तांनी एकमेकांवर दिव्य प्रेम करावें, एकमेकांनी एकमेकांची पूजा करावी असा भक्तिमार्गाचा कटाक्ष असतो.

भक्तिमार्गात आणखीहि एक याहूनहि अधिक व्यापक अशी संसार-त्याग-विरोधी व्यवस्था आहे. भक्ताचा साक्षात्कार असा असतो की, केवळ सर्व प्राण्यात, मानवात व पशूतच नव्हे, तर सर्व रूपधारी वस्तूंत व निर्जिवांतहि भक्ताच्या प्रेमाचा दिव्य विषय असणारा ईश्वर उपस्थित आहे.
भक्तियोगाचे हे व्यापक दर्शन मानवी भावना, संवेदना, सौंदर्यप्रतीति यांचे एकंदर क्षेत्र उन्नत करून त्याला दिव्य पातळीवर नेऊ शकते, या क्षेत्रात सर्वत्र आध्यात्मिकता भरू शकते, हे आपण समजू शकतो आणि मानवता सर्व विश्वभर प्रेम आणि आनंद यांजकडे वाटचाल करण्याचा जो जागतिक परिश्रम करीत आहे तो योग्यच आहे असे भक्तियोगाच्या वरील फळावरून आपण म्हणू शकतो.

– श्रीअरविन्द
(CWSA 23 : 39)

योगपद्धती आणि मानवाच्या सवयीच्या मनोवैज्ञानिक क्रिया यांचा संबंध थोड्याबहुत प्रमाणात विज्ञान आणि निसर्ग यांच्या संबंधासारखा आहे : वाफ किंवा वीज या निसर्ग शक्तीचे स्वाभाविक सामान्य व्यापार आणि याच शक्तीचे विज्ञानघटित व्यापार याचा जो संबध तोच संबध थोड्याफार प्रमाणात मानवाच्या सवयीच्या सामान्य मनोवैज्ञानिक क्रिया आणि योगप्रक्रिया यांचा आहे. विज्ञानाच्या प्रक्रिया ज्याप्रमाणे नियमितपणे केलेले प्रयोग, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि सातत्याने दिसून येणारे परिणाम यांद्वारे विकसित व निश्चित झालेल्या ज्ञानावर आधारित असतात, त्याचप्रमाणे योगाच्या प्रक्रिया पण अशाच ज्ञानावर आधारित असतात.

उदाहरणार्थ राजयोग घ्या. हा योग पुढील आकलनावर व अनुभवावर आधारलेला आहे : आमचे आंतरिक मूळ घटक, आमचे आंतरिक संयोग, आंतरिक नियत कार्ये आणि शक्ती, या सर्वांना एकमेकांपासून अलग करता येते, त्यांचा विलय पण करता येतो, त्यांच्यातून नवे संयोग घडविता येतात; आणि या नव्या संयोगांच्या द्वारा पूर्वी अशक्य असणाऱ्या नव्या कार्यांना त्यांना जुंपता येते. तसेच त्यांचे रूपांतर घडवून आणता येते. आणि निश्चित अशा आंतरिक प्रक्रियांच्या द्वारा त्यांचा नवा सर्वसाधारण समन्वय घडवून आणता येतो. ही राजयोगाची गोष्ट झाली.

हठयोगाची गोष्ट अशीच आहे. हा योग पुढील आकलनावर व या अनुभवावर आधारलेला आहे : आमचे जीवन सामान्यतः ज्या प्राणशक्तीवर आणि प्राणव्यापारांवर आधारलेले आहे, ज्यांचे सामान्य व्यापार निश्चित स्वरूपाचे व अपरिहार्य वाटतात, त्या शक्ती व त्या व्यापारांवर मानवाला प्रभुत्व संपादित करता येते, ते व्यापार बदलता येतात, स्थगितही करता येतात. अशक्यप्राय वाटावे असे परिणाम त्यामुळे घडून येतात आणि ज्यांना या प्रक्रियांमागील तर्कसंगती उमगत नाही त्यांना ते चमत्कारच वाटतात. ही हठयोगाची गोष्ट झाली.

राजयोग आणि हठयोग यांखेरीज जे योगाचे इतर प्रकार आहेत, त्या प्रकारात योगाचे हे वैशिष्ट्य तितकेसे दिसून येत नाही; याचे कारण, दिव्य समाधीचा आनंद प्राप्त करून देणारा भक्तियोग आणि दिव्य अनंत अस्तित्व व जाणीव प्राप्त करून देणारा ज्ञानयोग हे दोन्ही योग राजयोग वा हठयोग या दोन योगांइतके यांत्रिक नाहीत, ते अधिक अंतर्ज्ञानप्रधान आहेत. मात्र त्यांचाही आरंभ हा आम्हातील एखादी महत्त्वाची शक्ती वापरण्यापासूनच होत असतो.

एकंदरीत, योग या सामान्य नावाखाली ज्या पद्धती एकत्र करण्यात येतात, त्या सर्व पद्धती म्हणजे विशिष्ट मानसिक प्रक्रिया आहेत, निसर्गाच्या एखाद्या निश्चित सत्यावर त्या आधारलेल्या आहेत. योगामध्ये, या विशिष्ट मानसिक प्रक्रियाच्या आधारे, सामान्यतः न आढळून येणारे परिणाम व शक्ती विकसित होतात. अर्थात या शक्ती, हे परिणाम, सामान्य व्यापारांत नेहमीच अप्रकट अवस्थेत अंतर्भूत असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 07)