Posts

विचारशलाका १३

केवळ सद्यकालीन मानवी सभ्यतेचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे असे नाही तर, या जगाचेच रक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि ते निश्चितपणे केले जाईल. परंतु काही जणांची जशी इच्छा आहे किंवा ते कल्पना करतात तितक्या सहजतेने किंवा तितक्या लवकर किंवा ते कल्पना करतात तशा पद्धतीनेच ते होईल असे मात्र नाही. सद्यकालीन सभ्यतेमध्ये निश्चितपणे परिवर्तन झालेच पाहिजे पण ते परिवर्तन विध्वंसानंतर होईल का अधिक महान सत्याच्या पायावर आधारित एका नवीन रचनेद्वारे ते परिवर्तन होईल, एवढाच काय तो प्रश्न आहे. …आशावाद किंवा निराशावाद हे काही सत्य नसते, तर या गोष्टी म्हणजे मनाच्या प्रवृत्ती असतात किंवा स्वभावाच्या भावावस्था असतात. आणि म्हणूनच आपण सारेजण, अतिआशावादी किंवा अतिनिराशावादी न राहता, “थोडे थांबूया आणि बघूया काय होते ते.”

*

तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीच हा काळ मोठ्या कष्टाचा आहे हे मला माहीत आहे. संपूर्ण जगासाठीच तो तसा कष्टप्रद आहे; सर्वत्र गोंधळ, त्रास, विस्कळीतपणा आणि अव्यवस्था ही सर्वसाधारणपणे सगळ्यांचीच स्थिती आहे. भावी काळात येऊ घातलेल्या चांगल्या गोष्टींची ही तयारी चाललेली आहे किंवा त्या गोष्टी एका पडद्याआड विकसित होत आहेत आणि जागोजागी सर्वत्र वाईट गोष्टी मात्र ठळकपणाने दिसून येत आहेत. एकच गोष्ट करायला हवी आणि ती म्हणजे तग धरून राहायचे. प्रकाशाची घटिका येत नाही तोपर्यंत तग धरून राहायचे.

– श्रीअरविंद [CWSA 35 : 221 & 222]

*

जगाच्या सद्यकालीन परिस्थितीमध्ये ‘ईश्वरा’प्रति निरपवाद निष्ठा ही एक अपरिहार्य आवश्यकता बनली आहे.

– श्रीमाताजी [CWM 14 : 156]