Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ९०

तुम्ही बाह्यवर्ती व्यक्तित्वाबद्दल जे म्हणत आहात ते योग्य आहे. तुमच्या आंतरिक प्रकृतीच्या अंतरंगामध्ये जे आहे तेच तुमच्या बाह्य व्यक्तित्वाद्वारे आविष्कृत झाले पाहिजे आणि (त्यानुसार) त्याच्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. परंतु त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या आंतरिक प्रकृतीचे अनुभव आले पाहिजेत आणि मग, त्यांच्याद्वारे आंतरिक प्रकृतीची शक्ती वृद्धिंगत होते. आंतरिक प्रकृती बाह्यवर्ती व्यक्तित्वावर पूर्णतः प्रभाव टाकू शकेल आणि त्याचा ताबा घेऊ शकेल, अशी स्थिती येईपर्यंत ती वृद्धिंगत होत राहते. आंतरिक चेतना विकसित न होताच, बाह्यवर्ती चेतनेमध्ये पूर्णतः परिवर्तन घडविणे हे खूपच अवघड असते. आणि म्हणूनच हे आंतरिक अनुभव आंतरिक चेतनेच्या विकसनाची तयारी करत राहतात.

(आपल्यामध्ये) एक आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शारीर-चेतना असते; ती बाह्यवर्ती चेतनेपेक्षा अधिक सहजतेने ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेचे ग्रहण करू शकते तसेच ती स्वतःला चैत्य पुरुषाशी सुसंवादी करू शकते. असे घडून येते तेव्हा बाह्यवर्ती प्रकृती म्हणजे आपण स्वतः नसून, ती पृष्ठभागावरील केवळ एक किनार आहे असे तुम्हाला जाणवू लागते आणि मग बाह्यवर्ती प्रकृतीचे संपूर्णपणे रूपांतरण करणे अधिक सोपे होते. बाह्यवर्ती प्रकृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरीही त्यामुळे ज्या तथ्याला बाधा येऊ शकत नाही, ते तथ्य असे की, तुम्ही आता अंतरंगामध्ये जागृत झाला आहात, श्रीमाताजींची शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे आणि तुम्ही त्यांचे खरे बालक असल्याने, तुम्ही सर्व प्रकारे त्यांचे परिपूर्ण बालक होऊन राहणार आहात हे निश्चित आहे. तुम्ही तुमचे विचार आणि तुमची श्रद्धा समग्रतया श्रीमाताजींवर एकाग्र करा म्हणजे मग तुम्ही साऱ्यातून सुरक्षितपणे पार होऊ शकाल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 211)

कर्म आराधना – ३३

‘दिव्य माते’शी तुम्ही जेव्हा पूर्णतः एकात्म पावलेले असाल, तुम्हाला आपण साधन आहोत, सेवक आहोत किंवा कार्य-कर्ते आहोत, अशी स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव न राहता जर, आपण त्या दिव्य मातेच्या चेतनेचा आणि तिच्या शक्तीचा एक शाश्वत अंशभाग आहोत आणि तिचे खरेखुरे बालक आहोत अशी जाणीव होईल, तेव्हा या परिपूर्णत्वाची अंतिम अवस्था येईल. नेहमीच ती ‘दिव्य माता’ तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही ‘तिच्या’मध्ये असाल; तुमचे सारे विचार, तुमची दृष्टी, तुमच्या कृती, तुमचा अगदी श्वासोच्छ्वास आणि तुमच्या साऱ्या हालचाली या ‘तिच्या’पासून निर्माण होत आहेत आणि त्या ‘तिच्या’च आहेत असा तुमचा सततचा, सहज आणि स्वाभाविक अनुभव असेल. तुम्ही म्हणजे तिने तिच्यामधूनच घडविलेली एक व्यक्ती आणि एक शक्ती आहात, लीलेसाठी तिने स्वतःमधूनच तुम्हाला वेगळे केले आहे आणि तरीही तुम्ही तिच्यामध्ये नेहमीच सुरक्षित आहात, तुम्ही तिच्या अस्तित्वाचाच एक भाग आहात, तिच्या चेतनेचाच एक भाग आहात, तिच्या शक्तीचाच एक भाग आहात आणि तिच्या ‘आनंदाचा’च एक भाग आहात; असे तुम्हाला जाणवेल आणि दिसेल आणि तसा तुम्हाला अनुभव येईल. जेव्हा ही स्थिती संपूर्ण असेल आणि तिच्या अतिमानसिक ऊर्जा तुम्हाला मुक्तपणे प्रवाहित करतील तेव्हा तुम्ही ईश्वरी कार्यासाठी परिपूर्ण झालेला असाल. ज्ञान, इच्छा, कृती या गोष्टी खात्रीशीर, साध्या, तेजोमय, उत्स्फूर्त, निर्दोष बनतील; त्या ‘परमेश्वरा’पासून प्रवाहित झालेल्या असतील; अशी अवस्था म्हणजे ‘शाश्वता’चा दिव्य संचार असेल.

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 13]