Posts

बालकसदृश विश्वास ही सर्वात महत्त्वाची अट असते. बालकाला असा प्रांजळ विश्वास असतो की, त्याला हवी असलेली गोष्ट त्याला मिळेलच, ते बालक त्या गोष्टीची स्वतःहून मागणीसुद्धा करत नाही; त्याला खात्री असते की, जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल तेव्हा ती त्याला मिळेलच. असा अगदी बालकसदृश विश्वास, हीच खरोखर सर्वात महत्त्वाची अट असते. मात्र त्यासाठी आस बाळगणे अत्यंत आवश्यक असते. पण काही माणसांच्या अंतरंगातच श्रद्धा आणि अश्रद्धा, विश्वास आणि अविश्वास यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष चालू असतो; विजयाची खात्री असलेला आशावाद आणि मोठी आपत्ती आली तर काय होईल असा विचार करणारा निराशावाद यांच्यामध्ये संघर्ष चालू असतो….

मुले स्वाभाविकपणे जशी असतात तशीच असतील म्हणजे मोठ्या माणसांनी मुलांना बिघडवले नसेल तर, त्यांना ‘सारे काही चांगलेच घडेल’ असा दुर्दम्य विश्वास असतो. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा त्यांच्याबाबतीत एखादी छोटीशी दुर्घटना घडते तेव्हा याचे पुढे जाऊन काही गंभीर परिणाम होतील का, असला विचार त्यांच्या मनाला कधी शिवतही नाही. सारे काही लवकरच सुरळीत होईल अशी त्यांना अगदी स्वाभाविकपणे खात्री असते आणि ही खात्री इतकी जबरदस्त असते की त्यामुळे तो दुष्परिणामच नाहीसा झालेला असतो.

कोणी एखादा जेव्हा ‘शक्ती’ची आस बाळगतो, ‘ईश्वरा’कडे मदतीची याचना करतो, आणि ती मिळेलच असा ज्याचा अढळ विश्वास असतो तेव्हा, ती मदत मिळणार नाही असे शक्यच नाही, ती खात्रीने मिळणारच. हा विश्वास, हेच खरेखुरे ‘आंतरिक खुलेपण’ (inner opening) असते. काही माणसं सतत याच स्थितीमध्ये असतात. स्वीकारण्याजोगे असे जेव्हा काहीतरी असते तेव्हा, ते स्वीकारण्यास अशी माणसं नेहमी तत्पर असतात. पण असेही काही जण असतात की, जेव्हा काही मिळण्याची वेळ येते, जेव्हा शक्ती अवतरते तेव्हा, ते नेहमीच अनुपस्थित असतात, ते त्या घडीला मिटलेले असतात (ग्रहणशील नसतात.) त्याउलट ज्यांच्यापाशी बालकसदृश विश्वास असतो ते मात्र योग्य वेळी तेथे उपस्थित असतात. आणि आश्चर्य म्हणजे, बाह्यत: दोघांमध्ये कोणताही फरक नसतो. त्या दोघांकडेही समान सदिच्छा असते, समान अभीप्सा असते, काहीतरी कल्याणकारी करण्याची समान इच्छा असते, परंतु ज्यांच्या अंत:करणात सुहास्य विश्वास असतो, ते प्रश्न उपस्थित करत बसत नाहीत, ते आपल्याला काही प्राप्त होईल किंवा नाही, ‘ईश्वर’ आपल्याला प्रतिसाद देईल की नाही अशा शंकाकुशंका मनात आणत नाहीत; त्यांच्या मनात तसा प्रश्नच निर्माण होत नाही… “जे माझ्यासाठी गरजेचे आहे ते मला दिले जाईल; मी जर प्रार्थना केली तर मला प्रतिसाद मिळेल; जेव्हा मी अडचणीत असेन आणि मदतीची याचना करेन तेव्हा मला मदत मिळेल आणि केवळ मदत मिळेल इतकेच नाही तर सर्व गोष्टींची योग्य ती व्यवस्था लावली जाईल.” असा त्यांना विश्वास असतो. असा जर हा उत्स्फूर्त, विनम्र, निःशंक विश्वास असेल तर, त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कार्य अधिक चांगल्या रीतीने घडून येते आणि त्याचे परिणामदेखील अद्भुत असतात. मनाच्या शंका आणि विरोधाभास यामुळेच व्यक्ती सर्व गोष्टी बिघडवून टाकते. अशी व्यक्ती जेव्हा संकटामध्ये असते तेव्हा तिची, एक प्रकारे अशी धारणा तयार होते की, “हे अशक्य आहे! मला हे जमणार नाही. मी आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहे, जी मला नको आहे, ती जर का अजून खालावली, आणि जर तसेच घडले तर, सारे काही अधिकच बिघडून जाईल. मी अशा रीतीने अधिकाधिकच खालावत गेलो तर…” अशा विचारांमुळे, व्यक्ती स्वतःमध्ये आणि जी शक्ती तिने स्वीकारायला हवी त्या शक्तीमध्ये एक प्रकारची भिंत निर्माण करते.

चैत्य पुरुषाकडे मात्र कोणताही विरोधाभास नसलेला, कोणताही तर्कवितर्क नसलेला, कोणतीही छाया नसलेला अद्भुत विश्वास असतो. आणि जेव्हा हा विश्वास असतो तेव्हा, जिला प्रतिसाद मिळणार नाही अशी कोणतीच प्रार्थना असत नाही, आणि प्रत्यक्षात साकार होणार नाही अशी कोणतीच ‘अभीप्सा’ असत नाही.

– श्रीमाताजी [CWM 06 : 403-404]