Posts

या जन्मात तुमच्या प्राणतत्त्वाचे परिवर्तन झाले आहे की नाही यावर, तुमची मरणोत्तर स्थिती काय असेल हे पुष्कळसे अवलंबून असते. तुम्ही स्वतः म्हणजे जर अस्ताव्यस्त प्रेरणांचे एक मिश्रण असाल, तर मृत्युसमयी, ज्यावेळी तुमची चेतना मागे सरून पार्श्वभूमीमध्ये जाते, त्यावेळी तुमच्यातील भिन्नभिन्न व्यक्तिमत्त्वे अलग अलग होतात आणि त्यांना साजेसे वातावरण मिळावे म्हणून ती व्यक्तिमत्त्वे घाईघाईने इकडेतिकडे तसे वातावरण शोधण्याची धडपड करतात. एखादा भाग त्याला अनुकूल मनोवृत्तीच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमध्ये शिरू शकतो, दुसरा एखादा भाग एखाद्या प्राण्यामध्येही शिरू शकतो. पण जो भाग ईश्वरी उपस्थितीविषयी जागृत असतो तो भाग केंद्रीय आंतरात्मिक अस्तित्वाशी संलग्न राहू शकतो. पण जर तुम्ही पूर्णतः सुसंघटित झालेले असाल; तुमचे एकजिनसी, अखंड व्यक्तित्वामध्ये परिवर्तन झालेले असेल, आणि क्रमविकासाच्या ध्येयप्राप्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असाल तर तुमच्या मृत्युनंतरही तुम्ही जागृत राहाल आणि तुमच्या अस्तित्वाचे सातत्य टिकवू शकाल…

…(परंतु) बहुतांशी सर्वसामान्य माणसं ही त्यांच्या देहाशी इतकी एकजीव झालेली असतात की शारीरिक विघटनानंतर त्यांच्यातील स्वतःचे असे काहीच टिकून राहत नाही. पण अगदी काहीच टिकून राहत नाही असेही नाही – प्राणिक आणि मानसिक द्रव्य नेहमीच शिल्लक राहते पण ते शारीरिक व्यक्तिमत्त्वाशी एकरूप नसते. आणि जे शिल्लक राहते त्यावर बाह्य व्यक्तिमत्त्वाचा कोणताही स्पष्ट ठसा नसतो कारण बाह्य व्यक्तिमत्त्व हे इच्छा, आवेग यांच्या गोंधळात संतुष्ट असते; शारीरिक कार्यांच्या संलग्नतेमुळे आणि सहकार्यामुळे तयार झालेली ती एक तात्पुरती संघटनात्मक एकता असते आणि जेव्हा ती कार्ये संपून जातात तशी त्यांची ही वरकरणी-एकतादेखील साहजिकपणेच संपुष्टात येते. फक्त जर का विविध भागांना एक प्रकारची मानसिक शिस्त लावण्यात आली असेल आणि सर्वांना समान मानसिक आदर्शाचे अनुसरण करण्यास शिकविण्यात आले असेल तर तेथे एक प्रकारचे खरोखरीची व्यक्तिविशिष्टता (genuine individuality) असू शकते की ज्यामध्ये या पार्थिव जीवनाची स्मृती साठून राहते आणि मग ती स्मृती (मृत्युनंतरही) जाणीवपूर्वक टिकून राहू शकते. कलाकार, तत्त्वज्ञानी आणि इतर विकसित व्यक्ती की, ज्या सुरचित, व्यक्तित्वसंपन्न झालेल्या असतात आणि ज्यांच्या प्राणिक अस्तित्वाचे काही प्रमाणात रूपांतर झालेले असते अशी अस्तित्वं (मरणोत्तरही) टिकून राहू शकतात, कारण त्यांनी आपल्या बाह्य चेतनेमध्ये चैत्य अस्तित्वाचे थोडेफार प्रतिबिंब उमटविलेले असते; हे चैत्य अस्तित्व मूलतः अमर्त्य असते आणि केंद्रवर्ती अशा दिव्य संकल्पाभोवती अस्तित्वाची क्रमाक्रमाने घडण करत नेणे हे त्याचे उद्दिष्ट असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 144-146)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १२

हठयोग

 

योगशास्त्रानुसार, संपूर्ण जडभौतिक देह आणि त्याची सर्व कार्य, तसेच सगळी मज्जासंस्था यांना व्यापून असणाऱ्या प्राणांच्या पाच प्रकारच्या हालचाली असतात. हठयोगी श्वसनाची बाह्य प्रक्रिया थांबवितो आणि एक प्रकारे ती किल्ली, प्राणाच्या या पाच शक्तींवर नियंत्रण निर्माण करण्याचा मार्ग खुला करते. हठयोगी या प्राणाच्या आंतरिक क्रिया संवेदनपूर्वक जाणू लागतो. तसेच तो स्वतःच्या संपूर्ण शारीरिक जीवनाविषयी आणि कृतींविषयी मानसिकदृष्ट्या देखील जागरूक होतो. तो आपला प्राण आपल्या शरीराच्या सर्व नाड्यांमधून किंवा नाडी-प्रवाहांमधून फिरवू शकतो. नाडीसंस्थेची जी सहा चक्रे अथवा स्नायुग्रंथिमय केंद्रे आहेत, त्यांच्या कार्याविषयी तो जागृत होतो आणि त्यांचे सद्यस्थितीत जे मर्यादित, सवयीनुसार, यांत्रिक कार्य चाललेले असते; त्या प्रत्येकाचे कार्य या मर्यादांच्या पलीकडे जावे म्हणून, ती केंद्रे तो खुली करू शकतो. थोडक्यात सांगावयाचे तर, हठयोगी शरीरातील प्राणावर पूर्ण हुकमत चालवू शकतो; सूक्ष्मतम नाडीगत प्राणावर तसेच स्थूलतम शारीर अवयवातील प्राणावर तो सारखीच हुकमत चालवू शकतो…

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 535)

या जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे अस्तित्वाची आणि चेतनेची एक वास्तविकता आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ आत्म्यात, चैतन्यात संघटित आहेत पण चेतनेच्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या आत्म्याविषयी आणि मन, प्राण, देह यांतील वास्तविकतेविषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे हा विभक्त जाणिवेचा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या आत्म्याची, स्वत:मधील व सर्वांमधील दिव्यत्वाची जाणीव होणे शक्य आहे. Read more