Posts

आता आपण प्राणिक तपस्येकडे, संवेदनांच्या तपस्येकडे, शक्तिच्या तपस्येकडे वळू. कारण, प्राण हेच शक्तीचे आणि प्रभावशाली उत्साहाचे अधिष्ठान आहे. प्राणतत्त्वामध्येच विचाराला संकल्पाचे स्वरूप येते, त्यामुळे कार्याला गती प्राप्त होते. हेही तितकेच खरे आहे की, वासना आणि विकार, हिंसक आवेग, आणि तितक्याच जोरदार प्रतिक्रिया, बंडखोर वृत्ती आणि निराशा यांचे अधिष्ठान प्राणच असतो. यावर साधारणत: नेहमी केला जाणारा उपाय म्हणजे त्यांचा कोंडमारा करणे, सर्व संवेदना काढून घेऊन त्याची उपासमार करणे. वास्तविक मुख्यतः या संवेदनावरच ‘प्राण’ पोसला जातो आणि सर्व संवेदनाच काढून घेतल्या तर तो झोपी जातो, सुस्त आणि आळशी होऊन जातो. त्याचा जणू (संवेदनारूपी अन्न न मिळाल्याने) भूकबळी जातो.

खरे पाहता, प्राणाचे पोषण होण्यास तीन स्रोत उपलब्ध असतात. सर्वात सुलभ असा स्रोत खालच्या बाजूने असतो : संवेदनांद्वारा येणाऱ्या भौतिक शक्तींपासून त्याचे पोषण होते.

दुसरा स्रोत त्याच्या स्वत:च्याच पातळीवर, प्राणाच्याच पातळीवर असतो. प्राणतत्त्व हे जर पुरेसे व्यापक आणि ग्रहणशील असेल, तर विश्वांतील विविध प्राणशक्तींशी त्याचा संबंध येतो व त्याला शक्ती प्राप्त होते.

शक्तीचा तिसरा स्रोत उच्च पातळीवरून येतो. जेव्हा प्रगतीची उत्कट आकांक्षा असते, तेव्हाच प्राण या स्रोतास अभिमुख होतो. वरून आलेली आध्यात्मिक शक्ती व प्रेरणा यांच्या संचाराने व समावेशामुळे हा स्रोत प्राणापर्यंत येऊन पोहोचतो.

यापेक्षा आणखी एका वेगळ्या शक्तिस्रोताची भर घालण्याचा लोक नेहमीच थोडाफार प्रयत्न करतात. पण त्यांचे बहुतेक सर्व कष्ट आणि दुर्भाग्य यांनाही तो स्रोतच कारणीभूत होत असतो. आपल्या बरोबरीच्या व्यक्तींमध्ये – सामान्यत: दोन व्यक्तींमध्ये – प्राणशक्तीची जी देवाणघेवाण होते त्यालाच लोक चुकून प्रेम असे समजून त्याद्वारा पोषण घेतात. पण वास्तविक ते प्रेम परस्परांच्या देवाणीघेवाणीमध्ये सुख घेणाऱ्या दोन शक्तींमधील केवळ आकर्षण असते.

संवेदनांची उपासमार नको, शुद्धिकरण हवे

आपल्यामधील प्राणतत्त्वाची उपासमार होऊ नये अशी आपली इच्छा असेल, तर संवेदनांचा त्यागही करता कामा नये किंवा त्यांची संख्या अथवा त्यांची तीव्रताही कमी करता कामा नये; संवेदना टाळणेही योग्य नाही, तर विचारपूर्वक व विवेकाने त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे.

संवेदना हे ज्ञानप्राप्तीचे व शिक्षणाचे उत्तम साधन आहे. पण हे कार्य त्याकरवी करून घ्यावयाचे असेल, तर स्व-समाधान आणि सुख याकरता चाललेल्या अज्ञानपूर्ण व अंध प्रयत्नांत, सुखोपभोगाचे एक साधन म्हणून अहंकारीपणाने संवेदनांचा उपयोग करता कामा नये.

कोणताही तिरस्कार किंवा नाखुषी न दर्शविता सर्वकाही सहन करावयास आपली इंद्रिये समर्थ असली पाहिजेत. पण त्याचबरोबर प्राणाच्या निरनिराळ्या उर्मीचे प्रकार, त्यांचे मूळ आणि त्यांचे परिणाम यांबाबत सारासार विवेक करण्याची इंद्रियांना शक्ती येऊन, ती अधिकाधिक विकसित झाली पाहिजेत; ती एवढ्यासाठी की, त्या उर्मी सुसंवाद, सौंदर्य आणि आरोग्य यांना उपकारक आहेत की, शरीर आणि प्राण यांच्या समतोलास व विकासास अपायकारक आहेत, हे इंद्रियांना कळले पाहिजे. भौतिक व प्राणिक जगतातील व्यामिश्रतेसह त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांच्याप्रत पोहोचणे व त्यांचा अभ्यास करणे या दृष्टीने साधने म्हणून या इंद्रियांचा उपयोग केला पाहिजे. असे केले म्हणजेच रूपांतरणासाठी करावयाच्या महान प्रयत्नांत त्यांचे योग्य स्थान इंद्रिये प्राप्त करून घेतील.

प्राणशक्ती दुर्बल करून नव्हे तर, ती ज्ञानयुक्त, सामर्थ्यसंपन्न आणि शुद्ध करूनच व्यक्ती आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या विकासास मदत करू शकते. संवेदनाच वर्ज्य करणे हे, जेवण न घेता स्वत:ची उपासमार करण्याइतकेच अपायकारक आहे. संवेदनांची निवड व नियंत्रण शास्त्रशुद्ध तपाचरणाने आणि फक्त प्राणशक्तीचा विकास व पूर्णता यांसाठीच केली पाहिजे. कारण प्राण हे खूप क्रियाशील, गतिशील असे साधन आहे, ते अस्तित्वाच्या इतर भागांप्रमाणेच प्रगतीसाठी आवश्यक आहे.

प्राणशक्तीला शिक्षण देऊन, तिला अधिक शुद्ध करून, अधिक संवेदनाक्षम बनवून, अधिक सूक्ष्म व अधिक सुसंस्कृत बनवून आपण तिच्या हिंसात्मक व पाशवी वृत्तींवर विजय मिळवू शकू. या गोष्टी म्हणजे वास्तविक अविचारीपणा, अज्ञान आणि अभिरुचीचा अभाव यांच्या निदर्शक आहेत.

प्राणशक्तीवर कोणतेही संस्कार न करता तिला आहे त्याच अवस्थेत सोडून दिले तर ती असंस्कृत, अहंकारी आणि विकृत असते हे खरे आहे परंतु त्याच प्राणशक्तीला संवर्धित करून ज्ञानपूर्ण केल्यानंतर ती सुसंस्कृत, धैर्यशील आणि नि:स्वार्थी होऊ शकते हेही तेवढेच खरे आहे. स्वत:मधील सुखतृष्णेचे रूपांतरण अतिमानसिक विपुलतेसाठी असलेल्या अभीप्सेमध्ये (Aspiration towards Divine) कसे करावयाचे एवढे जरी प्रत्येकाला कळले तरी ते पुरेसे आहे. त्यासाठी प्राणशक्तीला शिक्षण देण्याचे काम चिकाटीने, निष्ठेने व प्रामाणिकपणाने करीत राहिले तर अशी एक वेळ येते की, आपल्या ध्येयाची महानता आणि उज्ज्वलता, यांची तिला खात्री पटल्याने, दिव्य आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्राणशक्ती स्वत:च आपल्या क्षुद्र व भ्रामक अशा संवेदनाजन्य सुखोपभोगांचा त्याग करते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 55)