Posts

मानव जे जे काही साध्य करू शकतो ते सर्व काही ज्यांनी साध्य केले आहे, पण तरीही जे समाधानी नाहीत कारण, या जीवनात कधीच गवसू शकणार नाहीत अशा उच्चतर गोष्टींची ते या जीवनाकडून अपेक्षा करतात; अशाच लोकांसाठी ‘पूर्णयोग’ आहे.

ज्यांनी अज्ञाताचा ध्यास घेतलेला आहे आणि जे पूर्णत्वाची आस बाळगतात, भंडावून सोडणारे प्रश्न जे स्वत:ला विचारत राहतात आणि तरीही ज्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, कोणतीही निश्चित अशी उत्तरे त्यांना गवसत नाहीत, अशा लोकांचीच ‘पूर्णयोगा’साठी तयारी झालेली असते.

मानवजातीच्या भवितव्याची ज्यांना काळजी आहे आणि विद्यमान व्यवस्थेबाबत जे समाधानी नाहीत अशा लोकांना हमखासपणे जे प्रश्न पडत राहतात, अशा मूलगामी प्रश्नांची एक मालिकाच असते. ते प्रश्न साधारणपणे असे असतात :

मरायचेच असेल तर व्यक्ती जन्मालाच का येते?

दु:खभोग सहन करण्यासाठीच का व्यक्ती जीवन जगत असते?

जर वियोग होणारच असेल तर व्यक्ती प्रेमच का करते?

चुका करण्यासाठीच व्यक्ती विचार करते का?

चुका करण्यासाठीच का व्यक्ती कृती करते?

याचे स्वीकारार्ह असे एकमेव उत्तर आहे की, गोष्टी जशा असायला हव्यात तशा त्या नाहीत. मात्र हे विरोधाभास अटळ आहेत असे नाही, तर ते सुधारता येण्यासारखे आहेत आणि एक ना एक दिवस ते विरोधाभास नाहीसे होतीलच. जग आज जसे आहे त्यावर काही उपायच नाही असेही नाही.

ही पृथ्वी अशा एका संक्रमणकाळात आहे की, जो काळ मानवाच्या तोकड्या चेतनेला खूप दीर्घ भासतो पण शाश्वत चेतनेच्या दृष्टीने तो एखाद्या परमाणु इतका अल्प असतो. एवढेच नव्हे तर, अतिमानसिक चेतनेच्या अवतरणाबरोबर हा संक्रमणकाळसुद्धा संपुष्टात येईल. त्यावेळी विरोधाभास सुसंवादामध्ये आणि विरोध हा समन्वयामध्ये परिवर्तित होईल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)