Posts

विचार शलाका – १०

प्रकृती गुप्तपणे विकास पावत आहे. तिच्या ठिकाणी जे दिव्य ईश्वरी तत्त्व दडलेले आहे ते शोधून काढण्याच्या व त्याची परिपूर्ती करण्याच्या दिशेने प्रकृतीचा गुप्तपणे विकास घडून येत आहे; या विकासाच्या योगाने ‘ते’ दिव्य तत्त्व अधिकाधिक स्पष्ट होत आहे, …मन, प्राण, शरीर ही आपल्या प्रकृतीची सर्व रूपे प्रकृतीच्या उपरिनिर्दिष्ट विकासाची साधने आहेत; परंतु मानव म्हणजे मन, प्राण, शरीर एवढेच अस्तित्व नव्हे, त्यांच्या पलीकडे पण तो आहे आणि त्याचे ते पलीकडले जे अस्तित्व आहे, ते त्याच्या पूर्णत्वाची गुरुकिल्ली आहे; तेथून जो प्रकाश येतो त्या प्रकाशात मानवाला त्याच्या अस्तित्वाचे उच्च व विशाल सत्यरूप समग्रतेने दिसू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 617)

मनुष्यप्राण्यामध्ये नेहमीच दोन प्रकारच्या प्रकृती असतात; एक आंतरिक प्रकृती म्हणजे आत्मिक व आध्यात्मिक, जी ईश्वराच्या संपर्कामध्ये असते; आणि दुसरी बाह्य प्रकृती म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक. ह्या बाह्य प्रकृतीचे भरणपोषण अज्ञानामध्ये झालेले असते आणि ही प्रकृती दोष, अपूर्णता, अशुद्धता यांनी भरलेली असते. आणि त्यामुळेच साधनेमध्ये गोष्टी अचानक एका निमिषार्धात बदलू शकत नाहीत.

आंतरिक अनुभूती वाढत जाते, विस्तारत जाते आणि बाह्य प्रकृतीला ती अधिकाधिक व्यापत जाते. पण जोवर ती अनुभूती बाह्य प्रकृतीला पूर्णतया व्यापत नाही तोवर कोठेतरी अपूर्णता शिल्लक राहतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89-90)

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे, असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये – दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याची व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याची आणि अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याची – प्रकृतीची इच्छा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 502)