Posts

कर्म आराधना – १३

कर्मामध्ये सुव्यवस्था आणि सुमेळ असला पाहिजे. वरकरणी पाहता जी गोष्ट अगदीच सामान्य वाटते ती गोष्टसुद्धा अगदी परिपूर्ण पूर्णतेने, स्वच्छतेच्या, सौंदर्याच्या, सुमेळाच्या भावनेने आणि व्यवस्थितपणाने केली पाहिजे.
*
कर्मामध्ये ‘परिपूर्णते’ची आस बाळगणे ही खरी आध्यात्मिकता.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 305-306)

‘परिपूर्णता’ ही अजूनही एक विकसनशील संकल्पना आहे. निर्मिती जेव्हा तिच्या सर्वोच्च शक्यतांप्रत पोहोचते, तेव्हा ती परिपूर्णता असते, असे नेहमीच म्हटले जाते; पण हे असे नसते. आणि नेमक्या याच संकल्पनेला माझा विरोध आहे. या गोष्टी म्हणजे प्रगतीची केवळ एक पायरी असते. म्हणजे असे की, ‘प्रकृती’ तिच्या शक्यतांच्या अगदी अंतिम मर्यादेपर्यंत जाते आणि जेव्हा तिच्या असे लक्षात येते की, आता पुढे जाता येत नाहीये, मार्ग खुंटला आहे, तेव्हा ती सारेकाही नष्ट करून टाकते आणि पुन्हा नव्याने प्रारंभ करते. याला काही परिपूर्णता म्हणता येणार नाही, कारण परिपूर्णता असेल तर गोष्टी नष्ट कराव्या लागता कामा नयेत. ‘प्रकृती’ने जे काही घडवायला सुरुवात केली होती, ते तिला नष्टवत करावे लागता कामा नये, तेव्हाच परिपूर्णता येईल. ‘प्रकृती’ने जे घडवायला सुरुवात केली होती ते पुरेसे नाहीये किंवा तिला स्वतःला जे घडवायचे होते ते काहीतरी वेगळेच होते, असे जाणवल्यावर तिने ते नष्ट केले नाही, असे आत्ताच्या घडीला तरी एकही उदाहरण दिसत नाही. त्यामुळे ‘प्रकृती’ने आपल्या निर्मितीमध्ये परिपूर्णता संपादन केली आहे, असे म्हणता येणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 15)